Monday, 22 December 2014

गाडी शिकायला हवी

नवीन शहरात वाटली हौस नवी नवी
पुण्यात आले आता , गाडी शिकायला हवी

तो म्हणे ताई, सारखा आरसा नका पाहू
डोळे ठेवा रस्त्यावर, तेव्हा पुढे जाउ.

मागून येणार्यांना सरळ जाऊ द्या पुढे
गाडी ठेवा मधोमध नजर रस्त्याकडे

धडे घेउनि त्याचे, दिली मी परीक्षा,
वाटे रिक्षा शोधण्याची नको आता शिक्षा

लायसन आले घरी, सारी आनंदली
फोटो आयडी प्रूफ ची तरी, नक्की सोय झाली

गाडी काढली बाहेर धदकत्या काळजाने
पहिला ठोका चुकविला धावणाऱ्या मांजराने

रस्त्यावर मुले माणसे, कुत्रे आणि बोके
सतवायला होते मागच्या गाड्यांचेहि भोंगे

जरा वेग घेत होते पण सिग्नल ला झाली घाई
मागचा बाईक वाला म्हणे, चला पुढे, या सिग्नलला कोणी थांबत नाही

तेवढ्यात एक पुणेरी 'स्कार्फ' आरशावर धडकला
वर म्हणे उजवीकडे आरसा कशाला लावला?

झाला ट्राफिक चा गोविंदा, आम्ही आपले खडे,
मागून येणारे मात्र गेले फुटपाथ वरून पुढे

मनात म्हटले बास झाले, आज पहिलाच तर दिवस
उतरून म्हटले काकूंना, जरा सरकाल तर घेईन म्हणते रिवर्स

मोठ्या कष्टाने वाट काढून गाडी आणली घरी
पर्यावरणाचा विचार करता पब्लिक वहानच बरी