प्रवेश - १
(स्थळ - डॉक्टर नरेश काळे यांच क्लिनिक. ते मानसोपचार तज्ञ आहेत. खुर्चीत कसल्यातरी नोट्स काढत बसले आहेत. हातातली फाईल बाजूला ठेवून ते फोन उचलतात. )
डॉ. काळे - नंदिता, अजून किती पेशंट आहेत? …. बर मग पाठवून दे त्यांना आत.
(केबिन च दार उघडून डॉ. वसुंधरा सबनीस आत येतात. साधारण पन्नाशीच्या, सुखवस्तू दिसणाऱ्या आणि हुशार जीवशास्त्रज्ञ असलेल्या. त्यांच्या हालचालीत अस्वस्थता जाणवते. डॉ. काळे त्यांना बसण्याची खूण करतात, त्या बसतात. अजूनही अस्वस्थच आहेत. डॉ. काळे त्यांना पाणी देतात. त्या नको म्हणतात.)
डॉ. काळे - बोला, काय करून शकतो मी तुमच्यासाठी?
डॉ. वसुंधरा - डॉक्टर, मी माझ्या मुलाची केस घेऊन तुमच्याकडे आले आहे. मी डॉ. वसुंधरा सबनीस.
डॉ. काळे - ओह! म्हणजे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. वसुंधरा सबनीस तुम्हीच का?
डॉ. वसुंधरा - होय, मीच. माझा मुलगा भास्कर, भास्कर सबनीस पण एक हुशार जीवशास्त्रज्ञ आहे. लंडन मध्य शिक्षण पूर्ण करून चार महिन्यांपूर्वी इथेच माझ्याबरोबर काम सुरु केलय त्याने.
डॉ. काळे - अरे वा, आपल्या मुलाने आपले काम पुढे चालवावे यासारखा आनंद नाही, भाग्यवान आहात डॉक्टर.
डॉ. वसुंधरा - हं… आम्ही दोघं मिळून जीवशास्त्रात क्रांती करेल असं एक अत्यंत महत्वाचं संशोधन करत आहोत. आता तर अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. दिवसरात्र प्रयोगशाळेत काम सुरु आहे. पण… पण काही दिवसांपासून भास्कर … भास्कर जरा विचित्रच वागतोय. हा भास्कर कुणीतरी वेगळाच आहे … सुरुवातीला मला वाटलं कामाच्या ताणामुळे असं होत असेल. आमचे प्रयोग, त्यातून सध्या मिळत असलेली निरीक्षण, त्या प्रयोगांची गोपनीयता, जागरणं या सगळ्याने खूप ताण येऊ शकतो मनावर. मला समजतं ते, पण हे ते नाही, काहीतरी वेगळच आहे.
डॉ. काळे - नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला, सांगू शकाल?
डॉ. वसुंधरा - नेमकं म्हणजे … पूर्वी आमच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल आमची अनेकदा चर्चा व्हायची. तो त्याचे अंदाज, निरीक्षणे सांगायचा, माझं मत विचारायचा. पण आता असं काहीच होत नाही. विषय निघाला कि तो एकदम सावध होतो. तो … तो संशयी झालाय, माझ्याशी बोलतच नाही, एकटाच प्रयोगशाळेत बसून काम करत असतो. तिथे कुणीच गेलेलं त्याला चालत नाही. त्याच्या कागदपत्रांना हात लावलेलाही चालत नाही. कालचा त्याचा चेहरा, आवाज आठवला कि अजूनही काटा येतो अंगावर. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. अदिती बाजूला उभी होती. बराच वेळ शब्दही बोलला नव्हता, पण मग एकदम कर्कश आवाजात ओरडला,- 'माझा विश्वास नाही तुम्हा कोणावरच. तुम्ही सारे माझं संशोधन चोरायला टपला आहात. पण मी माझं मोलाचं काम तुमच्या हाती नाही लागू देणार ..... कधीच नाही.'
अजून आठवतोय तो चेहरा- डोळ्यात संशय, भीती आणि राग. अदिती एकटक त्याच्याकडे पाहत होती.
डॉ. काळे - एक मिनिट डॉक्टर, अदिती… ?
डॉ. वसुंधरा - हो अदिती. तीही जीवशास्त्राची एक हुशार विद्यार्थिनी आहे. दोन महिने झाले असतील तिला येउन. तिची मेहनत आणि हुशारी पाहूनच मी तिला आमच्या मुख्य संशोधनात सहभागी करून घेतलं. काम करता करता ती भास्करच्या खूप जवळ आली. भास्करने एक दिवस मला सर्व सांगितलं. माझी परवानगी नसण्याचं काही कारणच नव्हतं. मी आनंदाने दोघांचा साखरपुडा करून टाकला. आता वाटतं तीच चूक झाली माझी.… नंतर हळूहळू सगळं बदलत गेलं. प्रयोगशाळेतील भास्करच्या नोट्स हरवू लागल्या, फाईली एक दिवस गायब तर दुसऱ्या दिवशी पुन्हा जागेवर. भास्करची चिडचिड वाढू लागली. कुणीतरी संशोधन चोरायला बघतंय असं त्याच्या मनाने घेतलं. एक दिवस त्याने अदितीला त्याच्या नकळत काही नोट्स घेताना पाहिलं. खूप संतापला होता भास्कर त्या दिवशी ...
डॉ. काळे - भास्करच वागणं याच्यानंतर … ?
डॉ. वसुंधरा - होय, मला वाटतं त्यानंतरच भास्करच वागणं बदलायला लागलं … त्याचा संशय रास्त होता. मलाहि तिचा संशय आला. ही खरंच अस काही करत नसेल न? नवीन संशोधनाचे श्रेय मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असलेले कितीतरी लोक आमच्या क्षेत्रात सापडतील तुम्हाला. पण तेवढ्यावरच थांबलं नाही हे. त्याचा संशय वाढतंच गेला. त्याने स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतले जणू. एक विठोबा सोडला तर कुणालाही आत घेत नाही तो. अदितीला प्रयोगशाळेत यायला बंदी घालणं समजू शकते मी, पण मी? माझ्यावरही संशय? विश्वासघात तिने केला, पण शिक्षा मात्र मी आणि माझा भास्कर भोगतो आहे. काही कळेनास झालंय मला. मला मदत करा आणि माझ्या भास्करला यातून बाहेर काढा.'
(त्या बोलायच्या थांबतात, डोळ्यात पाणी आहे.)
डॉ. काळे - तुम्हाला काय वाटतं? अदिती विरुद्ध काही पुरावा आहे की सारे याच्या मनाचे खेळ आहेत?
डॉ. वसुंधरा - सुरुवातीला तशी वाटली नाही ती, अतिशय हुशार मुलगी आहे, पण आजकाल कुणाचा भरवसा देता येत नाही.. प्रसिद्धीचा मोह फार वाईट असतो डॉक्टर! पण त्यासाठी ती माझ्या मुलाचा बळी देणार असेल, तर तसं मी कधीही होऊ देणार नाही.. भास्करच्या पाठी मी उभी आहे.. कागदपत्रे सुरक्षित राहावीत म्हणून पोलीस संरक्षण मागवते म्हटलं मी भास्कर ला पण तू यात पडू नकोस म्हणाला, त्याचा माझ्यावरही विश्वास नाही हो... डॉक्टर त्याला यातून बाहेर काढा. त्याला परत माणसात आणा... (डोळे पुसतात)
डॉ. काळे - असा धीर सोडू नका. मी नक्की भेटेन भास्करला.
प्रवेश - २
(दुसरा दिवस. स्थळ - डॉ. सबनीसांचा बंगला. एक नोकर आवराआवरी करीत आहे. इकडे तिकडे पाहत पत्रे, कागद आवरत आहे. बेल वाजते. नोकर दचकतो, हातातले कागद खिशात कोंबतो आणि दरवाजा उघडतो.)
विठोबा - कोन आलंय सांगू बाईसायबांना?
डॉ. काळे - मी डॉ. काळे, बाईसाहेबांनीच बोलावलंय मला इथे.
विठोबा - जी, बाईसायबांनी सांगितलं हुतं तुमी येनार ते. बसा मी पानी आनतो. (आत जायला वळतो)
डॉ. काळे - साहेब आहेत का घरी?
विठोबा - नाई जी, ते तिकडे शालेत हायेत
डॉ. काळे - शाळेत? हा हा प्रयोगशाळेत?
विठोबा - हा जी, शालेतच असत्यात आजकाल. जेवन बी तिथेच घेत्यात. लई महत्वाच काम करत्यात ते. कंदी कंदी तर झोपत्यात बी तिथंच.
डॉ. काळे - मग त्यांना जेवण खाण, चहा पाणी कोण देतं?
विठोबा - हा मीच द्येतो की. जेवन, चहा, पत्र बित्र सारं मीच देतो नेऊन. बैसायबांना सांगतो तुमी आल्याचं.
(आत जातो. डॉ. काळे हॉल मध्ये इकडे तिकडे पाहत असतात. हॉल मध्ये अनेक मानचिन्हे, मानपत्रे लावलेली आहेत. एखादे हातात घेऊन न्याहाळतात. कौतुकाने मान हलवतात. तेवढ्यात डॉ. वसुंधरा आत येतात.)
डॉ. वसुंधरा - या डॉक्टर, बसा ना. (हताश सुरात) मी खूप समजावलं भास्कर ला पण तो तुम्हाला भेटायला तयारच नाहीये. म्हणतो, माझा कुणावरच विश्वास नाही.
डॉ. काळे - काही हरकत नाही, मला अंदाज होताच. आपण असे करू, त्तुम्ही त्याला सांगा, मी काहीही प्रश्न विचारणार नाही. त्याने केवळ यावे. माझ्यामुळे त्याला त्रास होतोय असे वाटले तर खुशाल निघून जावे, मला काही वाटणार नाही'.
(तेवढ्यात भास्कर दारातून आत येतो. त्याची संशयी नजर सगळीकडे भिरभिरत असते. डॉक्टरांना पाहून रागारागाने परत जाण्यासाठी वळतो.)
विठोबा - (बाहेर पाण्याचे ग्लास घेऊन येतो) मालक, तुमचा बी च्या इथंच आणू काय?
(भास्कर नाही म्हणून निघून जाणार तेवढ्यात)
डॉ. वसुंधरा - हो आण. भास्कर अरे जरा बस की इथे आमच्याबरोबर, (त्याला खुर्चीवर बसवतात) किती ओढलेला दिसतोय चेहरा तुझा. काळजी करू नकोस, यांना सांग सगळं.' (त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. त्याबरोबर तो दचकतो. खांद्यावरचा हात झटकून टाकतो. खुर्ची मागे करून झटकन उभा राहतो)
भास्कर - (जवळ जवळ किंचाळून) हात लाऊ नकोस मला तू लांब जा, कुणी जवळ यायचं नाही माझ्या. जातो मी... (जायला उठतो)
डॉ. वसुंधरा - नाही नाही, तू जाऊ नकोस, मीच जाते हव तर (आत निघून जातात)
डॉ. काळे - हेल्लो, मी डॉ. नरेश काळे. प्रथम तुमचं अभिनंदन भास्कर (हात पुढे करत) परदेशात उच्च शिक्षण घेऊनही तुम्ही इथे काम करायचा निर्णय घेतलात. सोपं नाही ते.
(भास्करचा चेहरा थोडा निवळतो.)
भास्कर - (हळू हळू बोलू लागतो) डॉक्टर मला माहित आहे ममीने तुम्हाला का बोलावलंय ते. तिला वाटतंय मला भास होतायत. पण तसं नाहीये, मला पक्की खात्री आहे. परवा माझ्या प्रयोशाळेतील एक महत्वाची फाईल नाहीशी झाली. माझं संशोधन चोरण्याचा प्रयत्न चालू आहे. (इकडे तिकडे पाहत घाईघाईने ) मी बघितलंय, मी नसताना माझं काम, माझी निरीक्षणे, माझे निष्कर्ष पहायचा प्रयत्न करतेय ती. माझं श्रेय लाटायचंय तिला.
डॉ. काळे - पण कोणाला?
भास्कर - (ऐकलं ना ऐकलंस करत घाईघाईने पण हळू आवाजात बोलत राहतो) डॉक्टर विश्वास ठेवा माझ्यावर, मला होताहेत ते भास नाहीयेत. माणसाच्या मेमरीमधील ज्ञान अमर ठेवण्यासाठी संशोधन करतोय मी. तुम्हाला कल्पना आहे, हा प्रयोग यशस्वी झाला तर काय होईल? मेंदूच्या मज्जासंस्थेमध्ये साठवलेले ज्ञान दुसरीकडे स्थलांतरित करता येईल. मग माणूस मेला तरी त्याचं ज्ञान जिवंत राहील. कायमचं. पण हा ... हा माझा क्रांतिकारक शोध तिला आयता हवा आहे आणि तोही स्वतःच्या नावावर. मी ते कधीच होऊ देणार नाही. कोणावरच आता विश्वास नाहीये माझा.... कोणावरच. मी खरं सांगतोय डॉक्टर, अगदी खरं (डॉक्टरांचा हात हातात घेतो. आतल्या दाराशी कोणाचीतरी चाहूल लागते, तिकडे सावधपणे पाहात, मोठ्याने ) आणि हे असंच चालू राहिलं, तर पोलिसात जाईन मी, पोलीस आणीन इथे, मला नाही पर्वा कुणाची. पण ही अशी चोरी नाही चालवून घेणार.
(तेवढ्यात डॉ. वसुंधरा स्वतः चहाचे कप घेऊन येतात आणि त्या येताच बोलणं थांबतं. चहाचा कप घेऊन भास्कर निघून जातो. तो जातो त्या दिशेने दोघे बघत राहतात. )
प्रवेश - ३
(स्थळ - डॉ. काळे यांची केबिन. डॉक्टर विचारमग्न अवस्थेत बसले आहेत.)
डॉ. काळे - (मनात) भास्कर म्हणतो त्यात खरंच काही तथ्य असेल? की सगळे भास? आणि 'ती' कोण? अदिती? तिच्याशी एकदा बोलायला हवं. पण खरंच अस काही कुणी करत असेल, तर यात मी एकटा काय करू शकणार आहे? कोणाचीतरी मदत लागेल. (त्यांच्या टेबलावरचा फोन वाजतो, ते उचलतात) हा बोल नंदिनी, कोण? इन्स्पेक्टर चौधरी? पण पेशंट? बरं ... बरं पाठव त्यांना आत.
इन्स्पेक्टर चौधरी - (आत येतात.) हेल्लो डॉक, ओळखलंस का?
डॉ. काळे - अर्रे श्रीकांत तू? ये ये अर्रे किती दिवसांनी ... आज कसं काय येणं केलं बुआ? आजच तुझी आठवण काढत होतो, इन फॅक्ट आत्ताच, १०० वर्ष आयुष्य आहे तुला.
इन्स्पेक्टर चौधरी - फेक फेक तू, पण हरकत नाही, आज मी तुझ्याकडे काही खास कामासाठी आलोय.
डॉ. काळे - काम? आणि माझ्याकडे? काय बुआ?
इन्स्पेक्टर चौधरी - डॉ. वसुंधरांनी मला पाठवलंय तुझ्याकडे. त्यांच्या प्रयोशाळेसाठी त्यांना एक्सट्रा सिक्युरिटी हवी आहे.
डॉ. काळे - अरे मग मी काय करणार त्यात?
इन्स्पेक्टर चौधरी - त्यांना काही गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत. सिक्युरिटी हवीय पण पोलिस तुझ्या सांगण्यावरून आलेत असं भासवायचंय. त्यांच्या मुलाचा त्यांच्यावर विश्वास नाहीये पण तुझ्यावर आहे म्हणे. त्यामुळे त्या म्हणत होत्या की ...
डॉ. काळे - अरे पण मी का पोलीस बोलवीन, आणि तेही तिकडे?
इन्स्पेक्टर चौधरी - त्यांचं म्हणणं आहे, तू काल भास्करला भेटून गेला आहेस, त्याचा विश्वास संपादन केला आहेस. तो काल तुलाच सांगत होता ना, पोलीस बोलवीन म्हणून? तुझ्या सांगण्यावरून पोलीस आलेत असं कळलं तर तो विश्वास ठेवेल, नाहीतर नको नको ते आरोप करेल. मी खूप वर्षांपासून डॉ. वसुंधरांना ओळखतो. मुलाचा अविश्वास त्यांना फार लागलाय पण त्याच बरोबर प्रयोगशाळा, त्यातील कागदपत्रे, निरीक्षणे सुरक्षित राहावीत असंही त्यांना वाटतंय, म्हणून हा मार्ग. त्यातून तू भास्करशी बोलू शकलास तर...
डॉ. काळे - (विचार करत) ठीक आहे, यात तोटा काहीच नाही, माझ्या पेशंट ला कदाचित थोडी मनःशांतीच मिळेल, मी बोलिन भास्करशी फोनवर. शिवाय तुझंही लक्ष तिथे असेल तर मलाही बरं वाटेल, एवढा महत्वाचा प्रयोग सुरक्षित राहायलाच हवा.
(टेबलावरचा फोन वाजतो. डॉ. काळे तो उचलतात)
डॉ. काळे - हा बोल नंदिता, कोण?... अदिती? ओके ... ठीक आहे, ५ मिनिटांनी पाठव तिला आत.
(इन्स्पेक्टर चौधरी निरोप घेऊन निघून जातात. अदिती आत येते. तरुण, हुशार मुलगी, पण चेहऱ्यावर काळजी आहे)
अदिती - डॉक्टर, मी अदिती. मी डॉ. वसुंधरा सबनिसांच्या प्रयोगशाळेत सहायक म्हणून काम करते. तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मला-
डॉ. काळे - या या बसा ना, बोला मी काय करू शकतो तुमच्यासाठी?
अदिती - भास्कर ला भेटलात ना तुम्ही? त्याच संदर्भात काही सांगायचंय मला. दोन महिने झाले असतील, डॉ. सबनीसांच्या लॅब मध्ये काम सुरू केल्याला. हे काम मिळाल्यावर खूप खुश होते मी. माझा आवडता विषय आणि डॉ. वसुंधरां सारख्या तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन. माझं आणि भास्करच ट्युनिंग हि छान जमलं होतं. डॉ. वसुंधरांच्या आराखड्याप्रमाणे आम्ही दोघे रात्रंदिवस काम करायचो. साहजिकच आम्ही कायम एकत्र असायचो. आम्ही ... आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो कळलंच नाही. भास्कर माझ्याबरोबर जास्त वेळ घालवतोय, त्याच्या प्रयोगांबद्दल ममींपेक्षा जास्त माझ्याशी चर्चा करतोय हे हळूहळू ममींना जाणवायला लागलं. त्यांनी आमचा साखरपुडा करून दिला खरा पण मला वाटतं, मी त्यांना मनापासून कधीच आवडले नाही. मी इतक्या थोड्या वेळात भास्करच्या इतकं जवळ जाणं हे त्यांना सहन झालं नसावं. खरंतर आम्हा दोघांनाही त्यांच्याबद्दल खूप आदर आहे... होता. पण जेव्हा केवळ असूयेपोटी त्यांनी भास्करचे कान माझ्याविरुद्ध फुंकण्यास सुरुवात केली. माझ्यावर संशोधन-चोरीचे खोटे आरोप केले. तेव्हा मी सावध झाले.
डॉ. काळे - (सावधपणे) पण मला तर अस कळलं की भास्करने स्वतः तुला नोट्स काढताना पहिल?
अदिती - तसं नाहीये ते, मी आमचं रुटीन काम करत होते, आधीच्या रात्री मी लवकर झोपले त्यामुळे रात्री भास्करने घेतलेली निरीक्षण मी तपासून पाहत होते, तेव्हाच ती दोघ आली. ममींनी त्याचे कान आधीच फुंकले असणार .... मला तिथे पाहून त्याला धक्का बसला, त्याने माझ्यावर नाही नाही ते आरोप केले ... म्हणे मी केवळ या शोधाचं श्रेय मिळावं म्हणून त्याच्या आयुष्यात आले... आणि अस बरंच काही. मला प्रयोगशाळेत यायची बंदी केली त्याने. I was shocked. तेव्हा मला अंदाज आला, ही बाई काय करू शकते. तुम्हाला माहीत नसेल डॉक्टर, भास्करने खूप मेहनतीने हा प्रयोग आखला आहे, पण ममींना त्यात माझा नाही त्यांचा सहभाग हवाय, यशात वाटा हवाय. गेल्या बऱ्याच वर्षात डॉ. वसुंधरांच्या नावावर कोणतेही नवीन संशोधन नाहीये. या शोधाची नितांत गरज आहे त्यांना. त्यांना पक्के माहित आहे, भास्कर त्याचे संशोधन दुसऱ्या कोणाच्याही नावाने प्रसिद्ध होऊ देणार नाही. कधीच नाही. म्हणून अश्या मार्गाने त्या प्रयत्न करतायत.
डॉ. काळे - पण हे केवळ तुझं म्हणणं आहे, त्याला पुरावा काय?
अदिती - पुरावा मी भास्कर ला दिलाय. तुम्ही विचारू शकता त्याला. भास्करच्या निरीक्षणांची अक्खी फाईल मी ममींच्या रूम मध्ये पहिली आहे, जशीच्या तशी कॉपी केलेली. त्यांच्या स्वतःच्या अक्षरात. भास्करने पहिलीये ती, त्यामुळेच तर तो इतका अस्वस्थ झालाय. सख्ख्या आईचा विश्वासघात फार लागलाय त्याच्या मनाला.... खूप ... खूप त्रास झाला त्याला आणि आता कोणावरच विश्वास नाही त्याचा. फक्त अविश्वास आणि संशय… असेच चालू राहिले तर तो कामच करू शकणार नाही आणि सारे काही डॉ. वसुंधरांच्या हातात आयते जाईल. आणि ते ... ते चुकीचे ठरेल. डॉ. वसुंधरांची हि दुसरी बाजूहि तुम्हाला माहित असावी म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. प्लीज आम्हाला मदत करा.
(अदिती निघून जाते. डॉ. काळे विचारात पडतात)
डॉ. काळे - (मनात) काय खरं आणि काय खोटं काहीच कळेनासं झालंय. डॉ. वसुंधरा आणि अदिती दोघी एकमेकींवर आरोप करताहेत. भास्करचाही कुणावरतरी संशय आहे हे नक्की. आणि कुणीतरी काहीतरी चुकीचं करतंय... पण कोण? कोण? भास्करशी पुन्हा एकदा बोलायला हवं (फोन हातात घेतात)
डॉ. काळे - हॅलो, भास्कर सबनीस? मी डॉ. काळे बोलतोय. तिकडे जवळ कोणी नाही ना तुमच्या? मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय.
(बराच वेळ फोनवर बोलत राहतात)
डॉ. काळे - मग तुम्ही म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे. पुरावेही तेच सांगताहेत.... हो हो, इन्स्पेक्टर चौधरींवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांचे पोलीस असू द्यात तिकडे, इतकं महत्वाचं संशोधन सुरक्षित ठेवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे .... आणि मी सांगतो तसं करा. त्रास करून घेण्यापेक्षा त्यांना समोरासमोर जाब विचारा. तुम्हाला सारं माहीत आहे हे समजल्यावर त्या नाही हिम्मत करणार... no no not at all ... डॉ. वसुंधरा जरी आधी इथे आल्या असली तरी माझे पेशंट तुम्ही आहात. आणि तुमची काळजी घेणं हे माझं पाहिलं कर्तव्य आहे. घाबरू नका, वाटलं तर पोलिसांची भीती घाला. त्यांनी मान्य केलं तर कदाचित सगळेच प्रश्न सुटतील. सगळा ताण बाजूला ठेवून तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करता येईल. नका करू काळजी, मी आहे तुमच्या बरोबर. (फोन ठेवतात, आणि समाधानाने सुस्कारा सोडतात)
प्रवेश - ४
(स्थळ - डॉ. काळे यांचं घर. सकाळी नुकतेच उठून चहा घेत, पेपरवाचन चालू आहे. मध्यंतरी २ वर्षांचा काळ लोटला आहे. )
डॉ. काळे - (पेपर वाचत) ओ हो हो, तरुण वैज्ञानिक भास्कर सबनीस यांना जीव शास्त्रातील संशोधनाबद्दल सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार? वा वा ऐकलंस का ग? मी तुला मागे सांगितलं होतं ना या केस बद्दल?
सौ. काळे - तो तरुण डॉक्टर, ज्याचं संशोधन चोरायचा प्रयत्न त्याची आईच करत होती तो ?
डॉ. काळे - अगदी बरोबर. माझा सल्ला ऐकला त्याने, आणि हे बघ, इतका मानाचा पुरस्कार पटकावला. त्या वेळी योग्य निर्णय घेतला नसता, तर कुठे असता हा गुणी वैज्ञानिक?
सौ काळे - मी तर ऐकलं होतं, डॉ. वसुंधरांनी अचानक संशोधनातून संन्यासच घेतला म्हणे.
डॉ. काळे - काय करणार? इतक्या मानाच्या स्थानावर असताना दुर्बुद्धी सुचली, नाही म्हटलं तरी स्वतःला स्वतःची लाज वाटली असणार. एक बरं झालं, फार गाजावाजा न होता ते प्रकरण संपलं. तेवढा सुज्ञपणा दाखवला सगळ्यांनी. नाहीतर किती नाचक्की झाली असती.
सौ. काळे - आहेत का हो त्या अजून?
डॉ. काळे - नाही मला वाटतं. सहा महिन्यांपूर्वी गेल्या त्या.... असो ज्याचं श्रेय त्याला मिळालं आणि त्यासाठी आपला थोडा हातभार लागला हेच समाधान.
(उठतात, इतक्यात बाहेर कुरियरवाला येतो, त्याच्याकडून पत्रे घेऊन सही करतात, तो निघून जातो. सगळी पत्रे घेऊन खुर्चीवर बसतात. एक पत्र उघडत)
डॉ. काळे - प्रॅक्टिस सोडल्यापासून पत्रही कमी झाली नाही? पण अजूनही टाईप केलेल्या पत्रांपेक्षा असं हाती लिहिलेलं पत्र आधी वाचावंसं वाटतं हे खरं. (पत्र वाचू लागतात. आवाज अदितीचा)
अदिती - (पत्रातून) नमस्कार डॉक्टर, मी अदिती, मिसेस अदिती भास्कर सबनीस. तुम्हाला कदाचित कळले असेल, आमचे संशोधन पूर्ण झालेय. भास्करच्या पेपरला मेडिकल जर्नल मध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. लवकरच त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते मानपत्र ही मिळणार आहे. आमच्या शोधामुळे मेंदूच्या मज्जासंस्थेतील ज्ञान स्थलांतरित करता येईल अशी शक्यता निर्माण झालीये. उंदारांवरील प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवलाय.… हो, पण माणसावरचा मात्र कुणाला माहीतही नाही … आश्चर्य वाटलं? काही गोष्टी तुम्हाला सांगायला हव्यात. तुम्हाला आठवत असेल, मी तुमच्याकडे भास्करची बाजू मांडायला आले होते, तेव्हा जे काही बोलले ते खरेच होते. भास्करच्या शोधावर माझा ठाम विश्वास होता. पण नंतर हळूहळू मला त्यातील फोलपणा जाणवायला लागला. तुम्ही त्याचाशी बोललात, तुमच्या सल्ल्याप्रमाणे भास्कर ममींशी स्पष्ट बोलला. त्यांना समोरासमोर जाब विचारला, त्यांच्या तोंडावर तो त्यांना चोर म्हणाला. ते ऐकून ममी कोसळल्याच. त्यानंतर ममींनी अंथरूण धरलं ते कायमचंच. तो धक्का, ती मानहानी त्या सहनच करू शकल्या नाहीत. मी आणि भास्कर पुन्हा एकत्र काम करू लागलो. तेव्हा हळूहळू भास्करच्या बुद्धिमत्तेचा तोकडेपणा माझ्या लक्ष्यात येऊ लागला. तो जरी लंडनला जाऊन शिकून आला होता, तरी नवीन विचार मांडण्याची त्याची क्षमता नव्हती. सर्व प्रयोग माझ्या हुशारीने मी पुढे चालवत होते. आता तुम्ही म्हणाल कि तो हुशार नसता, तर मुळात हा शोध कसा लावू शकला? तर आता नीट ऐका- हे संशोधन त्याचं नव्हतं, कधीच नव्हतं. ते सुरु केलं होतं डॉ. वसुंधरांनी. भास्कर इतक्या बुद्धिमान जीवशास्त्रज्ञाचा मुलगा, पण भरीव असं काहीच करू शकला नव्हता आणि नसता त्यामुळे ममींनी त्याला आपल्याबरोबर कामाला घेतलं. मी ममींच्या खोलीत पाहिलेली फाईल त्या प्रयोगाच्या आराखड्याची मूळ फाईल होती, ज्याची नक्कल भास्करने करून घेतली होती. ममींचे प्रयोग पहात असताना एक विकृत विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला. ममींचं संशोधन त्याला हवं होतंच पण त्यांच्या मेंदूतील सारं ज्ञानच घेता आलं तर? कितीतरी कीर्ती, प्रतिष्ठा त्याला एकट्याला मिळाली असती, पुढेही. त्याच्या मनात योजना तयार होऊ लागली. आधी स्वतःला भास होत आहेत असा समज त्याने करून दिला. आम्ही दोघीही त्याच्या नाटकाला फसलो. आम्हा दोघींच्या मनात एकमेकांविषयी संशय निर्माण करण्यात तो यशस्वी झाला. पण तुम्हीही फसलात तेव्हा तो खरा जिंकला. तुमचा सल्ला त्याच्यासाठी विनिंग शॉट ठरला. तुमच्या सल्ल्याप्रमाणे तो ममींशी बोलला आणि त्या अंथरुणाला खिळल्या, बाजूला झाल्या. सर्व त्याच्या मनासारखं होत होतं. त्यांच्या जिवंतपणीच प्रयोग पूर्ण होणं गरजेचं होतं कारण मृत्युनंतर त्यांचा मेंदू निकामी झाला असता. वैज्ञानिक, सामाजिक नियमांच्या विरुद्ध माझ्या मदतीने ममींच्या मेमरीतील ज्ञान त्याने स्वतःच्या मेंदूत स्थलांतरित केले. या प्रयोगानेच डॉ. वसुंधरांचा बळी घेतला. ममींची सारी बुद्धी, सारं ज्ञान आता त्याचं झालं. त्याने संशोधन पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. पुढचं सगळं तुम्हाला माहित असेलच. पण यश आलंय ते ममींच्या संशोधनाला, त्यांच्या प्रतिभेला. भास्कर केवळ एक चोर आहे, संधीसाधू चोर ... स्वतःच्या आईच्या मेंदूतील आठवणी, ज्ञान आता तो स्वतःच्या मेंदूत घेऊन वावरतो आहे. पण त्याची कुवत नाहीये, त्याला आता झेपत नाहीये ते ... त्याच्या मेंदूत दोन व्यक्तींच्या आठवणी आहेत, त्याचा त्रास हळूहळू वाढतोच आहे. अधून मधून झटके येतात त्याला. डॉक्टरांनी 'split personality' असं निदान केलंय. अचानक हा आजार कसा उद्भवला, कोणाला काहीच कळत नाहीये, पण मला माहीत आहे. आम्ही केलेल्या अमानवी प्रयोगाची फळं आहेत ही. राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालाय खरा, पण तो घेणं कदाचित त्याच्या नशिबातही नसेल. कदाचित हीच त्याची शिक्षा आहे. पण माझं मन मला आतल्या आत खातंय. या खोटेपणात माझाही सहभाग आहे हे मी विसरू शकत नाही. हे सारं सिद्ध करण्यासाठी पुरावा काहीच नाही खरंतर... हे मी कुणाशी बोलू शकत नाही पण नाही बोलले तर वेड लागेल मला. म्हणून तुमच्याजवळ कबुली द्यायचीये मला. त्यानेतरी शांत वाटेल कदाचित, thanks - अदिती.
(डॉक्टरांच्या हातून पत्र गळून पडते आणि हताशपणे ते खुर्चीवर कोसळतात आणि नजर शून्यात जाते. सौ काळे त्यांच्याजवळ येतात त्यांना जागं करायचा प्रयत्न करताहेत आणि पडदा पडतो.)
No comments:
Post a Comment