Friday, 6 February 2015

माणसांचे साचे

प्रत्येकाला साच्यात बसवायची
आपण का करतो घाई?
हो आहे शांत पण
म्हणून काय कधी बोलणारच नाही?

एखाद्यावर ठेवतो आपण
समजूतदारापणाचे ओझे
वहातच राहायचे?
मनातच ठेवायचे का कायम  प्रश्न अडचणीचे?

 स्वभाव विनोदी आहे त्याचा
आपण लावतो लेबल
दाखवायचे नेहमी हसूच त्याने?
आणि अश्रू गिळायचेच का केवळ?

भोळा असेल तो
असेल त्याचा सार्या जगावर विश्वास
म्हणून फसतच राहायचे कायम?
विचारायच्या नाहीत कधीच शंका, वाटून अविश्वास?

कष्टाळू आहे म्हणून एखाद्याने फक्त
राबायचे राब राब,
सहन करायची मनमानी?
आणि विचारायचा नाही कधीच जाब?

कणखर म्हणून उभे राहायचे
आला जरी भूकंप,
वाट पहायची मोडायची?
मात्र त्याला वाकायचा नाही का विकल्प?

यंत्र नाही ते, जे करील मान्य
सार्या अपेक्षा आणि साचे,
वागावे कि कधी स्वछंदपणे
मोडून बंध अपेक्षांचे

देव नाही, माणूस आहोत आपण
गुण दोष वाही
आणि देवालाही देवपण काही
नेहमी झेपलेले नाही



3 comments: