Tuesday, 24 November 2015

पसारा

खरंच सांगतो, आमच्या आईला मुळीच नाही कळत
सतत आवरायची घाई, जरा टी पी नाही खपत

घरी आल्या आल्या म्हणते, इथे आयडी कार्ड टांगा
भिरकावून नेम साधण्यात मज्जा नाही का सांगा?

गणवेश लावा हेंगरला किंवा घाला नीट घडी,
राहिला समजा खुर्चीवरच, तर काय होईल जगबुडी?

दूधच आधी प्यायचे हे तीच का ठरवणार,
मग केक, बिस्कीट, लाडू चा नंबर कधी लागणार?

डबे म्हणे आल्या आल्या सिंक मध्ये हवे,
आम्ही काय उरल्या भाजीसाठी लगेच ओरडे खावे?

मागे लागून एक दिवस आवरून घेते टेबल, खण
दुसऱ्या दिवशी सापडत नाही, काहीच जुन्या जागेवर

आईचा चेहरा हसरा दिसतो; थोडे दिवसच- काय?
जागेवरच्या वस्तू हळूहळू पसरतात हात पाय 

मात्र कधीतरी एक दिवस, मलाही हुक्की येते,
बूट गणवेश जातो जागी, दूधही गट्ट होते.

गृहपाठ पूर्ण करायला, घेतो वही जरा वेळाने
मग जवळ घेऊन आई पापाच घेते लाडाने