Tuesday, 26 January 2016

काहीबाही

तोंडामध्ये बोट, डोळे टीव्ही मध्ये गढलेले,
पसाऱ्यातले खेळ, मनोरे रचून पुन्हा पडलेले
घड्याळातले मिनिट परंतु, जरा पुढे ना सरणारे,
प्रत्येक घरी, कुणीतरी, काहीबाही करणारे

लगबग करुनी, टेबलवरती, नवे पदार्थ रचलेले,
मंद दिवे नि संगीतही, कुणी गजरा माळून सजलेले
चाहूल येता, पाउल दारी, उगा सारखे पळणारे
प्रत्येक घरी, कुणीतरी, काहीबाही करणारे

भल्या थोरल्या घरात डोळे आकाशात हरवलेले,
उशा, चादरी, फुले, तसबिरी पुन्हा पुन्हा बदललेले
वर्षभरातील प्रेम द्यावया, मनही आसुसणारे
प्रत्येक घरी, कुणीतरी, काहीबाही करणारे

ध्येय, कर्तव्य पूर्तीसाठी दूर पक्षी उडालेले
भेटीसाठी आस लावूनी एकमेकां विरहलेले
सांज सावळी होता पंख त्यांचेही फडफडणारे
आणि प्रत्येक घरी, कुणीतरी, काहीबाही करणारे