Wednesday, 24 February 2016

माणसांची भाषा

'कसलं करतोस, मी मोर, मोर?
आहे का तुझ्या पंखात जोर?'

'काय कारायचीये टणक पाठ,
कासवा, कधी राहिलायस का ताठ?'

'कोकीळ पिलू तू काळं किरट,
पाहिलंयस कधी स्वतःचं घरट?'

'आ वासलेली आळशी मगर,
आहे का तुला जगाची खबर?'

कळत असती माणसांची भाषा,
प्राण्यांची झाली असती निराशा

विसरून जाउन आपले गुण
राहिले असते कुढून, बुजून

पण स्वतःमध्ये काहीतरी खास,
हा निसर्गावर त्यांचा गाढ विश्वास

माणसं मात्र खाजवीत आयाळ,
आपलीच पिलं करतात घायाळ 

Wednesday, 17 February 2016

गावाकडे

गावाकडचा दादा, शाळेत जातो कित्ती लांब
खाकी चड्डी, पांढरा शर्ट एवढाच त्याचा युनिफोर्म
मळकी चप्पल, हाती सायकल, तिला दप्तर- डब्बा,
एकट्याने जायची, यायची त्याला असते मुभा.

गावाकडची ताई, तिचे लांबच लांब केस,
घासून घासून धुते तोंड, एवढा मोठ्ठा फेस
मेचींग फ्रॉक, मेचींग बांगड्या, कानामधले डूल,
रोज शोधून केसांमध्ये त्या रंगाचे फूल.

गावाकडचा मामा, त्याचा मळकट सदरा लेंगा,
सारी वाडी येतो फिरून टाकत लांब ढांगा
कधी कैरी, कधी चिक्कू, घेऊन येई खाऊ,
पिशवी वरती तुटून पडती सारे बहिण भाऊ

गावाकडच्या मामीची सगळ्यांवर बारीक नजर
घर, वाडी, अंगण, विहीर फिरत असते भरभर
जेव्हा जरा होते दूर, तिच्या कामांची गर्दी,
हातांवरती आमच्या रंगते कुंपणावरची मेंदी

गावाकडच्या आजोबांचा आवाज खणखणीत
काळ्याकुट्ट अंधारालाही ते मुळीच नाही भीत
दंड-बेटकुळ्या, नि श्लोक त्यांचे मित्रही करतात पारख
हा दिगुचा, हि धनीची, आजोबा करून देतात ओळख

गावाकडची आजी, तिचे सुरकुतलेले हात,
तूप, मेतकुट घालून भरवते मऊ मऊ भात
सारेच विसरते ती, तिला दिसतही नाही स्पष्ट,
पण जवळ घेऊन रोज सांगते एक तरी गोष्ट.

अभ्यास करून वर्षभर थकून जातो जीव
मे महिन्यालाच येते शेवटी आम्हा मुलांची कीव
लाड, खाऊ, खेळ, सौंगडी वाढतच नेतो रंगत,
अशी करतो सुट्टीमध्ये आम्ही गावाकडे गम्मत