Sunday, 29 May 2016

तिला उडायचंय

घरट विणता विणता, गुंतलेत तिचे पंखही
जोर लावता तुटतील का धागे, अन नाजुकसे बंधहि?
बावरलेल्या तिच्या मनाला, एकदा धाडस करायचंय
तिला उडायचंय

घरट्यामध्ये आहे ऊब, जगही तिच्या ओळखीचं
गृहीत स्थान तिचं साऱ्यांच्या सवयीचं अन सोयीचं
पण स्वतःसाठी आकाशात तिला वेगळं स्थान मिळवायचंय
तिला उडायचंय

आकाशाचा दिसतो तुकडा, जणू घालतो रोजच साद
घे भरारी नवी म्हणे तो, आसमंत हा अमर्याद
तुकड्याबाहेरचं खुलं आकाश, तिलाही आपलं म्हणायचंय
तिला उडायचंय


Monday, 2 May 2016

दुबळा क्षण

खंबीरपणा जपत असतो,
एक शिलेदार झुंजत असतो

परंतु एका दुबळ्या क्षणी,
शस्त्र टाकतो, पडतो रणी

का ते कळत नाही
उत्तर काही मिळत नाही

दुःखाश्रुंना येतो राग
स्वतःलाच ते देती डाग

कोण आरोपी, गुन्हेगार?
यात नसतो अर्थ फार

उलटायलाच लागते पान,
साद घालतो वर्तमान

एकासाठी जड बोजे,
वाटून घेता हलके ओझे

म्हणून एक निश्चय करावा,
दुबळा क्षण वाटून घ्यावा