Sunday, 11 December 2016

सुट्टी?

म्हणतेय खरी, एक दिवस ती स्वतःपुरती जगेल
कितीही येवोत हाका, ती खुशाल लोळत पडेल
दूध, पेपर, बाई, कुरियर वाजवोत कित्ती बेल
नाईलाजानेच जरी, कुणीतरी दार उघडेल
करेल कानाडोळा - 'नाश्ता, भूक' आरोळ्यांकडे
'आज काय स्पेशल' तीच विचारेल, पाहत किचन कडे
अंघोळ पांघोळ आटोपून सरळ पायात घालेल चपला
नाटक, व्याख्याने, वाचनालय धरेल मार्ग आपला
मत्रिणींबरोबर भेटायचा खास बेत करेल,
'वाट बघू नका' सांगेल घरी आणि बाहेरच जेवेल
आनंदाने दमून भागून घरी येईल परत
म्हणेल, 'हुश्श! दमले बुआ', चहा मागेल कडक
पर्स टाकेल सोफ्यावर, चप्पल काढून वाटेत
फोनवरती मारेल गप्पा, पाय पसरून मजेत
... पण स्वप्नरंजनानंतरचंही आत्ताच दिसतंय स्पष्ट
पसारा, गोंधळ, साठलेलं काम, तीच जुनी गोष्ट
रुसवा, नाराजी पाहता पाहता, तिचा जिरतो स्वच्छंदी बाणा
आणि सुटीबरोबर फ्री गिफ्ट जणू, उगाच अपराधीपणा...