Friday, 3 December 2021

6. कलेसाठी जाहिरात की..

 आपल्याला आवडतात बुवा जाहिराती. छोट्याशा, चटपटीत, फार पाल्हाळ न लावता चटकन मुद्दा मांडून मोकळ्या होणाऱ्या. कळीची ओळ डोक्यात गुणगुणायला लावणाऱ्या. पण आजकाल प्रेक्षकांना त्यांची किंमतच नाही जणू! मालिका बघताना जाहिराती सुरु झाल्या की हे लोक उठून राहिली साहिली कामं करायला स्वयंपाकघरात जातात, कधी कुणाला फोनच लावतात तर कधी चक्क निसर्गाच्या हाकेला ओ देऊन येतात. जाहिराती काय रिकाम्या भिंतींना दाखवायच्या आहेत? पण चतुर जाहिरातदारांनी यावरही उपाय शोधून काढलेला आहे म्हटलं! तुमच्याही लक्षात आलंच असेल की...

मालिका सुरु असते. दोन मैत्रिणी बोलत असतात; एक मैत्रीण दुसरीला सल्ला विचारते आणि दुसरी फारच सविस्तरपणे सल्ला देऊ लागते. मग तो शाम्पू असेल तर त्यात काय काय आहे, त्याने केस कित्ती मऊ होतात वगैरे. तो दागिना असेल तर त्या प्रकारात अमक्या ज्वेलर्सकडे कित्ती variety आणि offers आहेत इ. पडद्यावर ठळकपणे ती वस्तू आणि त्या कंपनीचा लोगो व्यवस्थित दिसेल याची काळजी घेतलेली असते. प्रथम आश्चर्य वाटतं पण मग आपल्या लक्षात येतं, break मध्ये पळून जाणाऱ्या प्रेक्षकांना बेसावध गाठून गनिमीकाव्याने आपले product त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची ही नवी क्लुप्ती आहे. तुम सेर तो हम सवासेर! आजकाल तर कलेशी जवळची बांधिलकी मिरवणारे चित्रपटही अनेकदा आपल्या गोटात जाहिरातींना असा चंचूप्रवेश देताना दिसू लागले आहेत. शेवटी कलेच्या अभिव्यक्तीसाठीही पैसा पुरवतात ते जाहिरातदारच ना!

पण या असल्या जाहिराती आपल्याला नाही बाबा मंजूर. खरं सांगायचं तर असल्या जाहिरातींमागे प्रायोजकांचे चातुर्य असले तरी जाहिरातकर्त्यांचे कौशल्य नसते. संवाद लिहिणारे पडले मालिका किंवा चित्रपट लेखक; त्यांचे इमान त्यांच्या मूळ कलाकृतीशी. त्यामुळे जाहिरात म्हणून संवादांमध्ये product ची नुसती सरळधोपट भलावण असते. ना कसली सांकेतिकता ना गंमत. अशा वेळी विशिष्ट वस्तू किंवा कंपनीचा लोगो पडद्यावर केवळ दिसला तर मूळ कलाकृतीला फारशी बाधा येत नाही; पण तिची जाहिरात जेव्हा संवादात उतरते तेव्हा मात्र प्रेक्षकांचा रसभंग होऊ लागतो, मग तो प्रेक्षक मूळ कलाकृतीचा असो वा कुणी जाहिरात प्रेमी.

एके काळी कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद बराच गाजला होता म्हणे. आज आपली कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचवायची तर कलाकारासाठी प्रायोजक महत्वाचा, आणि प्रयोजकासाठी जाहिरात. पण आता मूळ कलाकृतीतच शिरू पाहणाऱ्या जाहिराती बघता ‘कलेसाठी जाहिरात की जाहिरातीसाठी कला’ असा नवा वाद सुरु होईल की काय अशी शक्यता वाटते.