'आजपासून ठरलं ' यांनी घरात शिरता शिरताच घोषणा केली. 'हं ' मी मनात म्हटलं, आज काय नवीन? 'ऐकलंस का वैशु, मला कोमट पाणी आण जरा लिंबू आणि मध घालून.' 'काय?' मी जवळ जवळ ओरडलेच. आज गरमागरम चहाच्या ऐवजी चक्क लिंबू पाणी आणि तेही कोमट? 'काय हो, बरे आहात न?' 'येस, बरा आहे, आजपासून ठरलंय माझं- मी diet चा एक प्लान फॉलो करणार आहे. वैशु, आपली आजकालची जीवनपद्धती, राहणीमान यांचा विचार करता आपण गरजेपेक्षा खूप जास्त खातो, असं नाही तुला वाटत?' ' तुमचं आजकालचं वजन पाहता नक्कीच वाटतं' मी मनात म्हटलं. 'हा सगळा चुकीच्या आहाराचा परिणाम आहे. पूर्वीची माणस अशी सुटलेली दिसायची नाहीत कारण सात्विक आहार. आपण हल्ली सारखा चहा पितो, त्यातून किती साखर पोटात जातेय याची कल्पनाही नसेल तुला.' हि कल्पना यांना आल्याची कल्पना मला खरोखरच न आल्यामुळे मी नकळत पुढे केलेला चहा तितक्याच नकळत संपवून यांनी कप खाली ठेवला. 'तू पण तुझी कॉफी जर कमीच कर. आमच्या ऑफिसातला तो नायर ५किमीची marathon पळाला. गेल्या महिन्यापर्यंत केवळ गाडी ते लिफ्ट आणि लिफ्ट ते त्याचं टेबल एवढंच चालायचा. त्याने रेस पूर्ण केली, विचार कशी?' 'कशी?' माझी दिवसभरातील एकमेव विसावा असलेली कॉफी काढल्यामुळे आलेला राग न दाखवता मी आज्ञाधारकपणे विचारले. 'diet plan, हे बघ मी त्याची एक कॉपी काढून आणली आहे तुला दाखवायला. 'बापरे' मी जरा घाबरतच ती लिस्ट हातात घेतली.
'ते बघ' लिस्ट मधील एक एक गोष्ट समजावून सांगत हे बोलू लागले, 'सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी, मग केवळ एक फळ. पण कोणतेही नाही हं, वजन वाढवणारी फळे वर्ज. आंबे, केळी, सीताफळ, सफरचंद चालणार नाहीत.' 'अहो पण मग आणखी कुठली फळे असतात?' मी न राहवून विचारले. मुंबईत लहानाची मोठी झाल्यामुळे फळवाल्याच्या गाडीवर सामान्यतः जी फळे दिसतात तेवढीच माहित. 'डाळिंब फार चांगलं तब्येतीला. तू असं करत जा, सकाळी चहाच्या ऐवजी डाळींबाचा ज्यूस पीत जाईन मी.' 'अहो पण मग दाणेच खा न डाळिंबाचे.' मी म्हणत होते, पण तो पर्यंत यांचा उत्साह लिस्ट मधील पुढच्या गोष्टीकडे वळला होता. ' मग नाश्ता बरं का वैशु …. ' 'म्हणजे? अजून नाश्ता आहे?' मी बोलून गेले. 'अग, शरीराला कॅल्शियम नको का मिळायला? हे बघ नाश्त्याला गाईच्या दुधाबरोबर कोर्नफ्लेक्स, साखर नाही, वाटल्यास थोडा मध. नो पोहे, उपमा. बघ, तुझं सकाळचं काम किती कमी करतोय मी.' 'खरंच ' मी म्हणाले, माझ्या डोळ्यासमोर गाळण्यात डाळिंबाचे दाणे चिरडून खाली ग्लासात थेंब थेंब पडणारा रसाभिषेक भक्तिभावाने पाहणारी मी दिसू लागले. 'पुढे?' मी विचारले, ' जेवणाचे काय?' 'थांब, हे पहा, सकाळी अकराच्या सुमारास थोडी भूक लागते आपल्याला, तेव्हा मिड मोर्निंग नाश्ता म्हणून गाजर, काकडी असं काहीतरी देत जा डब्यात. आणि मग नेहमीसारखी पोळी भाजी. संध्याकाळी आल्यावर मोड आलेली कडधान्य खात जाईन आणि मग रात्री फक्त भाकरी आणि पालेभाजी नो भात.' संध्याकाळी चिवडा, लाडू, कचोरी, बाकरवडी, बटाटेवडा किंवा अगदीच काही नाही तर चिप्स, वेफर्स यांची जागा चक्क मोड आलेल्या कडधान्यांनी घेतलेली पाहून गहिवरूनच आले मला. 'एवढ्याने भागेल का तुमचं?' मी न राहवून विचारले, ' आणि अक्ख्या दिवसात चहा नाही? असं एकदम सगळं बंद करण्यापेक्षा हळूहळू कमी करत आणलत तर?' 'हेच हेच, तुम्ही बायका पाय मागेच खेचा. आता मी ठरवलंय, त्यात बदल नाही.' हे निश्चयाने म्हणाले, 'उद्यापासून लिफ्ट सुद्धा वापरणार नाहीये मी, रोज पाच वाजता उठून मोर्निंग वॉक. तू सुद्धा यायचं आहेस माझ्याबरोबर.' 'पाच? नको हो' माझा स्वर फारच केविलवाणा झाला असावा कारण नंतर यांनी फार ताणून धरले नाही. तेवढ्यात कन्यारत्न क्लासमधून आणि चिरंजीव फुटबॉल खेळून वर आले. आणि मग जिम लावावी कि घरीच व्यायाम करावा यावर तिघांचा परिसंवाद सुरु झाला.
माझ्या डोक्यात गृहिणी सुलभ calculations सुरु झाली होती. डाळींबाचा ज्यूस नाही का, किलो दोन किलो डाळिंब आणून ठेवायला हवीत. गाजर, काकड्या आणि हो जास्तीची कडधान्य सुद्धा. दुधवाल्याला उद्यापासून गाईचे दुध सांगायला हवे. या निमित्ताने कोर्नफ्लेक्स ची हि खरेदी होणार. पालेभाज्या आणून निवडून ठेवायला हव्यात. आणि रात्री भाकरी म्हणजे तेही पीठ दळून आणायला हवं. भाकरीला हल्ली फारच चांगले दिवस आलेत म्हणायचे. पूर्वी भाकरी म्हणजे गरिबांचं अन्न म्हणून नाकं मुरडायचे लोक. लगेच पिशव्या घेऊन बाहेर निघाले. आईबरोबर बाहेर पडायचे आणि तेही भाजी आणायला म्हणजे चिरंजीवांना मोठेच संकट, त्यामुळे ते जिम मध्ये वेट लिफ्टिंग करायला पळाले. कन्यारत्नाला खूप म्हणजे खूपच अभ्यास होता त्यामुळे त्या स्मार्ट फोनवरूनच रिसर्च करण्यात बिझी होत्या. तास झाला असला तरी आत्ताच ऑफिसमधून आल्याचे अहोंचे कारण ताजेच होते, शिवाय मुलांबरोबरची चर्चा झाल्यावर आता टीव्ही वर योग आणि योग्य आहारविषयक कार्यक्रम बघणे त्यांना क्रमप्राप्तच होते. त्यामुळे राहता राहिले मीच, मी जिम मधेही जात नाही, अभ्यासही करत नाही आणि टीव्ही बघायला मला अक्खा दिवस मोकळाच असतो त्यामुळे पिशव्या घेऊन मीच बाहेर पडले. यामुळे माझा वॉक तर होईलच पण वेट उचलल्यामुळे स्नायूही बळकट होतील याचीही यांनी आठवण करून दिली.
दुसरा दिवस उजाडला, नेहमीपेक्षा थोडा लवकरच. यांच्या पाचच्या गजराने मला जाग आली. आमच्याकडे सर्वांनाच कानाचा थोडा त्रास आहे. सिलेक्टेड गोष्टीच त्यांना ऐकू येतात. त्यामुळे गजर ऐकून उठून मग यांना उठवणे या कामावरही माझीच नेमणूक झाली होती. तेवढ्यात आठवले, उठल्यावर लिंबू पाणी. यांच्या चेहऱ्यावर 'चहा … चहा …. ' असे स्पष्ट लिहिलेले मला दिसत होते पण ठरल्याप्रमाणे लिंबू पाणी घेऊन बूट घालून ते बाहेर पडले. चला आता डाळींबाचा ज्यूस. मी स्वयंपाकघराकडे वळले. अर्धवट पेंगलेल्या डोळ्यांनी डाळिंब सोलणे, दाणे काढणे आणि मग ज्यूस, हे काही सोपे नाही. गरजूंनी खात्री करून घ्यावी. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत असतो. दुध तापवणे, डब्यासाठी भाजी चिरणे, फोडणीला टाकणे, कणिक भिजवणे आणि पोळ्या या फास्ट ट्रेनच्या आड असे वेळखाऊ मालगाडी काम आले कि सगळा तालच बिघडतो. हे येईपर्यंत ओट्यावर दोन डाळींबाची कत्तल होऊन अर्धा ग्लास ज्यूस तयार झाला होता. त्याचबरोबर माझा मार्बलचा ओटा, शेगडी, भिंत यावर लाल शिंतोड्यांची कलाकृती आणि माझ्या हातावर चिकट राप हे साईड इफेक्ट्स सुद्धा प्रेक्षणीय होते. ज्यूस पिउन झाल्यावर हे अंघोळीला गेले.
तोवर कन्यारत्न उठले. तिची सकाळची शाळा, त्यातून आज शुक्रवार म्हणजे डब्यात काहीतरी खास हवे. 'आई, सगळ्याजणी किती छान काय काय आणतात, नुडल्स, पास्ता, पिझा'. असे बरेच वेळा ऐकून झाल्यामुळे मी इडलीचे पीठ आणून ठेवले होते. गरम गरम वाफाळत्या इडल्या काढत असतानाच हे आवरून आले. एक क्षण इडलीचा मोह नक्कीच झाला असणार पण दुधात बेचव कोर्नफ्लेक्स खाणेच आज नशिबी होते न. आजच तुला इडली करायची होती, अश्या नजरेने माझ्याकडे पाहून अनिच्छेने कोर्नफ्लेक्सचा चमचा यांनी तोंडात घेतला. तोवर चिरंजीवही उठून आले. त्याचे तंत्र यांच्या उलट. 'माझ्या उंचीच्या मानाने अजून थोडे वजन वाढले पाहिजे असे काल सांगत होते सर, माझ्या प्रोटीन शेक मध्ये एक बनाना पण घाल आज' अशी सूचना देऊन ते बाथरूम मध्ये घुसले. गरजेप्रमाणे वजन वाढवणे, कमी करणे, पौष्टिक असूनही चविष्ट असणे, नवीन वेगळे असणे आणि तरीही पटकन बनणे हे सारे गुणधर्म असणाऱ्या पदार्थाचा शोध कोणी लावला तर कित्ती छान होईल असा विचार सकाळ भर माझ्या मनात घोळत होता. डाळिंब सोलताना, ज्यूस काढताना, ओटा पुसताना, इडली बनवताना, कोर्नफ्लेक्स दुधात ओतताना आणि प्रोटीन शेक घुसळतानाही. हे सर्व होईपर्यंत सात वाजून गेले आणि तरीही पोळीभाजीचा पत्ताच नव्हता. शिवाय गाजर, काकडीचे काप करणे बाकीच होतेच. मुरारबाजीच्या आवेशाने या विरांगनेने मग साऱ्या कामांचा फडशा पडला. भरभर डबे भरून वेळेवर सगळ्यांना बाहेर धाडले. आणि मग सकाळपासून खुणावत असलेला कॉफीचा मग आणि वर्तमानपत्र हातात घेऊन निवांत बसले. सकाळचे सत्र तरी छान पार पडल्याचे समाधान होते. पण कॉफी संपवून आत गेल्यावर तेही संपुष्टात आले. बाई यायच्या आत स्वयंपाकाची सारी भांडी मोकळी करून द्यायला हवी. घरातल्या बाईला मोलकरीण बाईपेक्षा मोठा धाक कोणाचाच असत नाही. मुकाट्याने तिथली आवराआवरी करून जरा थकूनच बाहेर सोफ्यावर येउन बसले आणि तिची बेल वाजलीच.
संध्याकाळी हे घरी आले, तेव्हा कालचा उत्साह जरा मंदावलेलाच वाटला. पण निश्चय कायम होता त्यामुळे मोड आलेले मुग मीठ आणि लिंबू घालून पोटात गेले. 'वैशु, आज जास्त फिट वाटतोय का ग मी? एकदम हलकं हलकं वाटतंय. त्या मूर्ख देशपांडेबाईमुळे थोडे कुपथ्य झाले. मुलाला नोकरी लागल्याचे पेढे घेऊन आली होती. मी नको म्हणून बघितलं पण चार चौघात वाईट दिसत न, त्यामुळे खावा लागला पेढा.' 'पण संयम ठेवायचा न थोडा, घरी घेऊन यायचा पेढा. पहिल्याच दिवशी नियम मोडलात.' मी म्हटलं पण पेढा समोर दिसल्यावर असं काही सुचणं यांना शक्यच नव्हतं हे मी हि जाणून होते. मी रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. हे फक्त भाजी भाकरी खाणार असले तरी बाकी सर्वांसाठी बाकीचं जेवण करणं भाग होतं.
त्या दिवसापासून आमच्या घरी रोज नवे ज्यूस बनु लागले, रोज नव्या कडधन्यांना मोड येऊ लागले. भाज्यांच्या तेल विरहित, कमी गुळ, कमी मिठाच्या पाककृती सुचवल्या जाऊ लागल्या. कच्च, शिजेलेलं, भाजलेलं सर्व पदार्थातील क्यालरीज मोजल्या जाऊ लागल्या. पदार्थ पौष्टिक, चविष्ट आणि लो क्यालरी कसा बनेल यावर चर्चासत्रे घडू लागली. घरात दोन तरुण वाढती मुलं असल्यामुळे त्यांच्या भुकेला खाद्य देणे हे मातृकर्तव्य पार पाडणं हि तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत माझं किचन काही सुटेना. दुधवाल्याने गायीऐवजी म्हशीचे दुध टाकलेय, मटकी ला मोडच आले नाहीयेत, भाकरीचं पीठच संपलंय अशी भीतीदायक स्वप्न मला पडू लागली. पण हळूहळू लक्षात आलं, हा diet plan मी जेवढा मनावर घेतला होता तेवढा आणखी कुणीच घेतला नव्हता.
सकाळचा पाचचा गजर पूर्वीसारखा सहाचा झाला होता, पाऊस सुरु झाल्याचे कारण देऊन जॉगिंग चे बूट खणात गायब झाले होते. सकाळी मला दोन दोन नाश्ते बनवायचा त्रास नको च्या नावाखाली बेचव कोर्नफ्लेक्स बंद झाले होते. मुलांसाठी म्हणून केलेला भरपूर क्यालरीयुक्त पदार्थ 'बघू जरा चव' असं म्हणून चापला जाऊ लागला. चहा तर दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा सुरु झाला होता. येउन जाऊन 'तू कशी diet plan फॉलो करत नाहीस, तुला कशी प्रकृतीची काळजीच नाही, तुला कसा व्यायामाचा आळसच आहे' हे ऐकवणं मात्र चालू होतं. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं, diet हा मुख्यत्वे पाळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. सर्व खातात ते अन्न न खाता, वेगळे पदार्थ खाणे किमानपक्षी त्याच्यावर बोलणे जमले कि झाले. घरात खाद्यपदार्थ बनवणारी व्यक्ती दुसरी असेल तर आणखीच छान. मग व्यायाम हि एकच जबाबदारी उरते, आणि तोही रोज करणे सहज टाळता येते. वेळच नाही, पाऊसच आहे, पायच दुखतायत, व्यायामाचे कपडेच वाळले नाहीत अशी अनेक कारणे अभ्यासुंनी शोधून काढली आहेत. मग असं diet करून वजन कमी झालं तरच नवल.
त्यामुळे एका संध्याकाळी हे बरोबर दोन मित्र आणि वडापावचे पार्सल घेऊन आले तेव्हा मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. 'अग ऐकलंस का वैशु, आज माझं diet सुरु होऊन एक आठवडा पूर्ण झाला, त्याबद्दल बक्षीस म्हणून आज वडापाव पार्टी करू आपण. तू जरा चहा ठेव बघू' यांनी पार्सल माझ्या हातात देत म्हटलं. 'वाहिनी, diet याचं चालू आहे म्हणतोय पण तुम्ही जास्त स्लिम दिसताय. इसका राज क्या है?' यांच्या मित्राने विचारलं. सकाळी लवकर उठून धावपळ, भाजीपाला फळे यासाठी झालेल्या जास्तीच्या फेऱ्या, दळण, सामानाच्या पिशव्यांचे वेट लिफ्टिंग सारे माझ्या डोळ्यासमोर चमकून गेले. आणि स्लिम दिसण्याचा राज म्हणून 'यांचा diet plan' असे अतिशय खरेखुरे उत्तर माझ्या सस्मित मुखातून बाहेर पडले.