Monday, 6 July 2015

कबुली

मी डॉ. नरेश काळे. मानसोपचारतज्ञ. दवाखान्याची वेळ संपतच आली होती. मी नंदिताला फोन करून शेवटच्या पेशंटला आत पाठवायला सांगितले. 'बोला, काय करू शकतो मी तुमच्यासाठी?' मी त्या बाईंना विचारले. 'डॉक्टर, मी माझ्या मुलाची केस घेऊन तुमच्याकडे आले आहे. मी डॉ. वसुंधरा सबनीस.' नाव नक्कीच ओळखीचे होते. 'ओह! मी म्हटले,' म्हणजे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. वसुंधरा सबनीस तुम्हीच का?' 'होय मीच. मला तुमची मदत हवी आहे. माझा मुलगा भास्कर, भास्कर सबनीस हा देखील एक हुशार जीवशास्त्रज्ञ आहे. लंडन मध्ये शिक्षण पूर्ण करून चार महिन्यांपूर्वी इथेच माझ्याबरोबर काम सुरु केलय त्याने. आम्ही दोघ मिळून एक अत्यंत महत्वाचं, जीवशास्त्रात क्रांती करेल असं संशोधन करत आहोत. दोन महिन्यापूर्वी अदिती आली. तीही जीवशास्त्राची एक हुशार विद्यार्थिनी आहे. तिची मेहनत आणि हुशारी पाहूनच मी तिला आमच्या मुख्य संशोधनात सहभागी करून घेतलं. काम करता करता ती भास्करच्या खूप जवळ आली. भास्करने एक दिवस मला सर्व सांगितलं. माझी परवानगी नसण्याचं काही कारणच नव्हतं. मी आनंदाने दोघांचा साखरपुडा करून टाकला. पण हळूहळू सगळं बदलत गेलं. एक दिवस त्याने अदितीला त्याच्या नकळत काही नोट्स घेताना पाहिलं. मला वाटतं तेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली.' इथे त्या जरा थांबल्या. मग पुन्हा बोलू लागल्या, ' गेले काही दिवस भास्कर खूप विचित्र वागतोय. संशयी झालाय, त्याच्या प्रयोगशाळेत कुणीच गेलेलं त्याला चालत नाही. पूर्वी आमच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल आमची अनेकदा चर्चा व्हायची. तो त्याचे अंदाज, निरीक्षणे सांगायचा, माझं मत विचारायचा. पण आता असं काहीच होत नाही. तो विषय निघाला कि तो एकदम सावध होतो. कालचा त्याचा चेहरा, आवाज आठवला कि अजूनही काटा येतो अंगावर. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. अदिती बाजूला उभी होती. बराच वेळ शब्दही बोलला नव्हता, पण मग एकदम कर्कश आवाजात ओरडला, 'माझा विश्वास नाही तुम्हा कोणावरच. तुम्ही सारे माझं संशोधन चोरायला टपला आहात. पण मी माझं मोलाचं काम तुमच्या हाती नाही लागू देणार ..... कधीच नाही.' अजून आठवतोय तो चेहरा- डोळ्यात संशय, भीती आणि राग. अदिती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा मला पहिल्यांदा तिचा संशय आला. ही तर अस काही करत नसेल न? भास्करनी एकदा तिला कागद चाळताना पाहिलेलं होतं. पण मी? माझ्यावरही संशय? कि तिने विश्वासघात केल्यामुळे तो मनःशांती हरवून बसला? काही कळेनास झालंय मला. मला मदत करा आणि माझ्या भास्करला यातून बाहेर काढा.' त्या थांबल्या. डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. 'मी नक्की भेटेन भास्करला' मी त्यांना धीर दिला. त्यांच्या विनंतीवरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या घरी जाण्याचे मी कबुल केले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर पाच वाजता मी डॉ. सबनिसांच्या बंगल्याशी पोचलो. बंगल्याला लागुनच प्रयोगशाळेची बैठी इमारत होती. डॉ. वसुंधरा स्वतः दार उघडायला आल्या, आम्ही आत आलो. भास्कर मला भेटायला तयार नव्हता. मला याचा अंदाज होताच. मी म्हणालो, ' काही हरकत नाही, आपण असे करू, त्तुम्ही त्याला सांगा, मी काहीही प्रश्न विचारणार नाही. त्याने केवळ बाहेर यावे. माझ्यामुळे त्याला त्रास होतोय असे वाटले तर खुशाल निघून जावे, मला काही वाटणार नाही'.

माझा निरोप आत गेल्यानंतर दहा मिनिटांनी भास्कर बाहेर आला. त्याची संशयी नजर सगळीकडे भिरभिरत होती. 'काळजी करू नकोस भास्कर, यांना सांग सगळं.' डॉ. वसुंधरा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या. त्याबरोबर तो दचकला. त्याने खांद्यावरचा हात झटकून टाकला. खुर्ची मागे करून झटकन उभा राहिला. ' हात लाऊ नकोस मला, तू लांब जा, कुणी जवळ यायचं  नाही माझ्या. का जाऊ मी?' भास्कर जवळ जवळ किंचाळून बोलला. ' नाही नाही, तू जाऊ नकोस, मीच जाते हव तर' एवढे बोलून त्या आत निघून गेल्या.

'हेल्लो, मी डॉ. नरेश काळे. प्रथम तुमचं अभिनंदन भास्कर' मी हात पुढे करत म्हटल. 'परदेशात उच्च शिक्षण घेऊनही तुम्ही इथे काम करायचा निर्णय घेतलात. सोपं नाही ते.' भास्कर चा चेहरा थोडा निवळला. 'डॉक्टर मला माहित आहे ममीने तुम्हाला का बोलावलंय ते. तिला वाटतंय मला भास होतायत. पण तसं नाहीये, मला पक्की खात्री आहे. माझं संशोधन चोरण्याचा प्रयत्न चालू आहे.' तो इकडे तिकडे पाहत घाईघाईने बोलू लागला, ' मी बघितलंय, मी नसताना माझं काम, माझी निरीक्षणे, माझे निष्कर्ष पहायचा प्रयत्न करतेय ती. माझं श्रेय लाटायचंय तिला.' 'पण कोणाला?' मी न राहवून विचारलं. त्याने ऐकलं कि नाही कुणास ठाऊक पण स्वतःशीच बोलल्यासारखा तो हळू पण घाईघाईने बोलत राहीला, 'डॉक्टर विश्वास ठेवा माझ्यावर, मला होताहेत ते भास नाहीयेत. माणसाच्या मेमरीमधील ज्ञान अमर ठेवण्यासाठी संशोधन करतोय मी. मेंदूच्या मज्जासंस्थेमध्ये साठवलेले ज्ञान दुसरीकडे स्थलांतरित कसे करता येईल यावर काम चालू आहे माझे. माझा क्रांतिकारक शोध तिला आयता हवा आहे आणि तोही स्वतःच्या नावावर. मी ते कधीच होऊ देणार नाही. कोणावरच आता विश्वास नाहीये माझा. कोणावरच.' तेवढ्यात डॉ. वसुंधरा परत आल्या, मग पुढे काही बोलणे झाले नाही.

त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. भास्कर सांगतोय त्यात तथ्य असेल का? एकदा आदितीशी बोलायला हवं, पण कसं ? पण त्याचीही वाट पहावी लागली नाही. मी क्लिनिक वर पोचतोय तो अदितीच माझी वाट पाहत होती.
मी आत येताच तिने बोलायला सुरुवात केली. ' डॉक्टर, मी अदिती. मी डॉ. वसुंधरा सबनिसांच्या प्रयोगशाळेत सहायक म्हणून काम करते. तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मला- नोकरी मिळाल्यावर खूप खुश होते मी. माझं आणि भास्करच ट्युनिंग हि छान जमलं होतं. भास्कर माझ्याबरोबर जास्त वेळ घालवतोय, त्याच्या प्रयोगांबद्दल ममींपेक्षा जास्त माझ्याशी चर्चा करतोय हे हळूहळू ममींना जाणवायला लागलं आणि ते त्यांना आवडत नव्हतं. संशोधनात त्याने त्यांच्यापेक्षा माझ्यावर विश्वास दाखवावा हे त्यांना सहन झालं नसावं, आणि मग त्यांनी भास्करचे कान माझ्याविरुद्ध फुंकण्यास सुरुवात केली. माझ्यावर संशोधन-चोरीचे खोटे आरोप केले. सुरुवातीला भास्करला ते पटले आणि त्याने मला प्रयोगशाळेत यायची बंदी केली. एक दिवस मी माझं सामान न्यायला गेले तेव्हा ममी त्याची कागदपत्रे पाहत होत्या. मी त्यांच्या नकळत ते भास्करला दाखवल तेव्हा मात्र भास्कर चमकला. मी समजावले त्याला, त्याचं संशोधन चोरण्याचा प्रयत्न करणारी त्याची आईच आहे. तुम्हाला माहित नसेल कदाचित पण गेल्या बऱ्याच वर्षात त्यांच्या नावावर कोणतेही नवीन संशोधन नाहीये. या शोधाची नितांत गरज आहे त्यांना. त्यांना पक्के माहित आहे, भास्कर त्याचे संशोधन दुसऱ्या कोणाच्याही नावाने प्रसिद्ध होऊ देणार नाही. कधीच नाही. म्हणून अश्या मार्गाने त्या प्रयत्न करतायत. सख्ख्या आईचा विश्वासघात फार लागला त्याच्या मनाला. खूप त्रास झाला त्याला आणि त्यानंतर त्याचे विचित्र वागणे सुरु झाले. फक्त अविश्वास आणि संशय… असेच चालू राहिले तर तो कामच करू शकणार नाही आणि सारे काही डॉ. वसुंधरांच्या हातात आयते जाईल. डॉ. वसुंधरांची हि दुसरी बाजूहि तुम्हाला माहित असावी म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. प्लीज आम्हाला मदत करा.'

ती निघून गेली पण मी मात्र पुरता चक्रावून गेलो. आतून जाणवत होते, कोणीतरी काहीतरी चुकीच करण्याचा प्रयत्न करतंय. मी फोन करून भास्करला बोलावून घेतले. माझ्यावर विश्वास ठेवून तो आला. आम्ही दोघांनी बराच वेळ चर्चा केली. माझी आता पूर्ण खात्री पटली कि भास्करला होणारे भास हे डॉ. वसुंधरानी शोधलेलं एक निमित्त होतं, त्याला त्याच्या संशोधनापासून बाजूला ठेवण्यासाठी. पण मी असं होऊ देणार नव्हतो. मी भास्करला समजावलं, कि त्याने डॉ. वसुंधरांशी स्पष्ट बोलावं आणि पुन्हा असं न करण्याची समज द्यावी अन्यथा मानहानीची किंवा अखेर पोलिसांची भीती घालावी. याने काम झालं नाही तर मी होतोच. पण तशी वेळच आली नाही.

२-३ वर्षे झाली असतील या गोष्टीला. आज सकाळीच मेडिकल जर्नल मध्ये मी भास्करचा फोटो पहिला आणि त्याच्या यशस्वी संशोधनाबद्दलही वाचलं. अखेर ज्याचे श्रेय त्याला मिळाले. मग माझी नजर आलेल्या पत्रांकडे गेली. एक पत्र अदितीकडून आले होते. माझ्या मदतीबद्दल आठवणीने पत्र पाठवलेय बहुदा. पत्र उघडून मी वाचू लागलो.

'नमस्कार डॉक्टर, मी अदिती, मिसेस अदिती भास्कर सबनीस. तुम्हाला कदाचित कळले असेल, आमचे संशोधन पूर्ण झालेय. भास्करच्या पेपरला मेडिकल जर्नल मध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. आमच्या शोधामुळे मेंदूच्या मज्जासंस्थेतील ज्ञान स्थलांतरित करता येईल अशी शक्यता निर्माण झालीये. उंदारांवरील प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवलाय.…  हो, पण माणसावरचा मात्र कुणाला माहीतही नाही … काही गोष्टी तुम्हाला सांगायला हव्यात, मी तुमच्याकडे भास्करची बाजू मांडायला आले होते, तेव्हा जे काही बोलले ते खरेच होते. पण नंतर हळूहळू मला त्यातील फोलपणा जाणवायला लागला. तुमचे ठरल्याप्रमाणे भास्कर ममींशी स्पष्ट बोलला. त्यांच्या तोंडावर तो त्यांना चोर म्हणाला. ते ऐकून ममी कोसळल्याच. त्यानंतर ममींनी अंथरूण धरलं ते कायमचंच. मी आणि भास्कर पुन्हा एकत्र काम करू लागलो. हळूहळू भास्करच्या बुद्धिमत्तेचा तोकडेपणा माझ्या लक्ष्यात येऊ लागला. तो जरी लंडनला जाऊन शिकून आला होता, तरी नवीन विचार मांडण्याची त्याची क्षमता नव्हती. सर्व प्रयोग माझ्या हुशारीने मी पुढे चालवत होते. आता तुम्ही म्हणाल कि तो हुशार नसता, तर मुळात हा शोध कसा लावू शकला? तर आता नीट ऐका- हे संशोधन त्याचं नव्हतं, कधीच नव्हतं. ते सुरु केलं होतं डॉ. वसुंधरांनी. भास्कर इतक्या बुद्धिमान जीवशास्त्रज्ञाचा मुलगा, पण भरीव असं काहीच करू शकला नव्हता आणि नसता त्यामुळे ममींनी त्याला आपल्याबरोबर कामाला घेतलं. ममींचे प्रयोग पहात असताना एक विकृत विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला. ममींचं संशोधन त्याला हवं होतंच पण त्यांच्या मेंदूतील सारं ज्ञानच घेता आलं तर? कितीतरी कीर्ती, प्रतिष्ठा त्याला एकट्याला मिळाली असती, पुढेही. त्याच्या मनात योजना तयार होऊ लागली. आधी स्वतःला भास होत आहेत असा समज त्याने करून दिला. आम्ही दोघीही त्याच्या नाटकाला फसलो. पण तुम्हीही फसलात तेव्हा तो खरा जिंकला. तुमचा सल्ला त्याच्यासाठी विनिंग शॉट ठरला. तुमच्या सल्ल्याप्रमाणे तो ममींशी बोलला आणि त्या अंथरुणाला खिळल्या, बाजूला झाल्या. सर्व त्याच्या मनासारखं होत होतं. त्यांच्या जिवंतपणीच प्रयोग पूर्ण होणं गरजेचं होतं कारण मृत्युनंतर त्यांचा मेंदू निकामी झाला असता. वैज्ञानिक, सामाजिक नियमांच्या विरुद्ध माझ्या मदतीने ममींच्या मेमरीतील ज्ञान त्याने स्वतःच्या मेंदूत स्थलांतरित केले. या प्रयोगानेच डॉ. वसुंधरांचा बळी घेतला. ममींची सारी बुद्धी, सारं ज्ञान आता त्याचं झालं. त्याने संशोधन पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. पुढचं सगळं तुम्हाला माहित असेलच. आता त्याच्या मेंदूत दोन व्यक्तींच्या आठवणी आहेत, त्याचा त्रास हळूहळू वाढतोच आहे. कदाचित हीच त्याची शिक्षा आहे. पण माझं मन मला आतल्या आत खातंय. या खोटेपणात माझाही सहभाग आहे हे मी विसरू शकत नाही. हे सारं सिद्ध करण्यासाठी पुरावा काहीच नाही पण तरीही तुमच्याजवळ कबुली द्यायचीये मला. त्यानेतरी शांत वाटेल मला, thanks - अदिती.'
पत्र संपल. अदितीने मला हे सांगून तिच्या मनाची शांतता थोडीतरी परत मिळवली असेल, पण आता मी काय करू? माझ्या चुकीची कबुली मी कोणाकडे देऊ?

No comments:

Post a Comment