Friday, 29 April 2016

चाळीशी

विशी, पंचविशी तिशीहि सरुनिया आली पहा चाळीशी
डोळे ताणूनहि किती बघितले, दृष्टी नुरे जवळची

डोळ्यांवरती ठाण मांडून कसा चष्मा पहा बैसला,
'दिसतो का हो केस रुपेरी तिथे, किंवा वृथा भासला?'

म्हणता 'काकू' पोरटी, तरुणही बहु क्लेश होती मना
वस्त्रे जुनी अंगीही न शिरती 'शिवणी उसवल्याविना'

व्यायामाचे खूळ वाटले अधि, होई अता नीरुपाय
निर्धाराने चालुया धावूया बांधूनिया 'बूटी' पाय

मोठ्यांचे शिकवून उरले अता शिकवू मुले लागली
अज्ञपणाची मोहर चेहऱ्यावरी अदृश्य उमटविली 

कर्तव्ये, संसार, शिक्षण, घर सारे बरे पेलले
पाहूया करुनिया अता काही असे जे वाटते 'राहिले'

होते म्हणती सूरु जीवन खरे ते चाळीशीनंतर
जमवू तेही विना अनुभव पहा हे गाठले अंतर

Saturday, 16 April 2016

तत्त्वज्ञान

कृष्ण राजा प्रतिपालक तो, अबलांचा रक्षणकर्ता
संरक्षणार्थ झाला सोळा सहस्रांचा भर्ता
राजा होता रामही, जाणून प्रजेचे मर्म,
एकुलती पत्नी त्यागून त्याने जपला राजधर्म
विचार नसतो अधांतरी, हवे स्थल काल परिमाण,
ज्याला जे भावेल ते त्याने घ्यावे तत्त्वज्ञान

ब्राह्मण म्हणून जन्मला, पण परशुराम झाला योद्धा
आणि राज्य सोडावे अशी इच्छा झाली गौतम बुद्धा,
अर्जुनाला दिले ज्ञान गवळ्याच्या पोराने,
महाकाव्य रामायण रचले, वाल्या कोळ्याने
नाकारुनिहि मळल्या वाटा, मिळे अमरत्वाचा मान
ज्याला जे भावेल ते त्याने घ्यावे तत्त्वज्ञान

रामाने लोकभयाने वंशज नाकारला ,
यशोदेने कुशीत घेऊन कान्हा वाढविला
पुत्रेछेने पार्वतीने घडविली गणेशमूर्ती,
जनकासाठी पेटीमधुनी कन्या आणे धरती
अनेक तत्वे - अनेक विकल्प, व्यापक करूनि भान
ज्याला जे भावेल ते त्याने घ्यावे तत्त्वज्ञान

वेद, शास्त्रे, असंख्य पुराणे, महाकाव्ये रसाळ,
ऐकून, वाचून, लिहून, सांगून, लोटला किती काळ
असंख्य माणिक, असंख्य मोती, ज्ञानसागरी मंथन
तरीही त्यांवर 'मी म्हणतो ते खरेच' याचे बंधन?
ज्ञानाच्या ओझ्याने लवते, कितीही ताठ हो मान,
अन अधिकाधिक व्यापक होते ते समर्थ तत्त्वज्ञान