Thursday, 28 July 2016

प्रतिभा

'चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फ़ुलेना… ' रेडियो वर गाणं वाजत होतं . पुढ्यात वही पेन घेऊन प्रतिभा बसली होति. कोरे पान… नाही म्हणायला उजव्या कोपऱ्यात पानाफुलांची वेलबुट्टी काढली होती आणि डाव्या समासात पेनाने चितारलेले नारळाचे झाड.

'काय होतंय आजकाल? काही म्हणता काही सुचू नये? पण मन मात्र भरलेलच भासावं जड जड… आजही तिच्या लेखणीतून शब्द उतरायला तयार नव्हते. किती दिवस झाले असतील, मनासारखं काही लिहिल्याला, दिवस कि महिने? कि पुन्हा हरवली ती प्रतिभा? मनात येणाऱ्या विचारांकडे ती तटस्थ पणे पाहत होती. लहानपणापासूनच तिला लिहायची आवड. साध्या साध्या गोष्टीत तिला काव्य दिसायचे, सजीव निर्जीव सर्व सृष्टीत ती भाव भावना पहायची, त्यांचे अर्थ लावायची, संवाद साधायची. वाचनही अफाट, त्या वाचनानेही तिच्या भाषेवर सुंदर संस्कार केले होते, सहज सुंदर भाषा आणि सरळ हृदयाला जाऊन भिडेल अशी सच्ची भावना. जे मांडायची ते जीव ओतून, मनापासून… स्वतःतील टीकाकाराच्याही पसंतीस उतरेल असे.

मग लग्न ठरले तिचे, प्रवीणशी, तोही तिच्या कवितेवर फिदा होता. हळूहळू प्रतिभा संसारात रमली. मग चिनू झाली. सुखात होती ती, मात्र मन संसारात गुंतून पडले आणि कविताही हळू हळू मागे पडली. गोष्टी तिला जाणवायच्या नाहीत असं नाही पण त्या कल्पना मनात मुरवायला, त्यांना फुलवायला सवड होत नव्हती मनालाही, इतक्या असंख्य विचारांत व्यग्र असायचे ते. आणि रोजच्या धकाधकीत छोट्याशा कल्पनेचे लाड करणे, तिला वेळ देणे कठीणच. रोजची कामे, आला गेला, पाहुणे, सण  समारंभ, चिनू चा अभ्यास यात लिखाणाचा भर ओसरला, जणू संपलाच. पण ती कमी जाणवायला हि फुरसत नव्हती. फुरसत कसली, साधी आठवणही नव्हती. आणि मग एक दिवस धक्का बसल्यासारखी जाग आली तिला …

'कॅन्सर' डॉक्टर बोलत होते, 'चिनूच्या रक्तात काही कॅन्सरच्या पेशी सापडल्या आहेत. आपण लगेच उपचार सुरु करतोय. तिचं वय लहान आहे, त्यामुळे शरीर औषधाला चांगला प्रतिसाद देईल याची खात्री आहे. तुम्ही काळजी करू नका.' प्रतिभाचे हात पायच गळून गेल्यासारखे झाले. 'आपण काही टेस्ट करून घेऊ आणि त्याप्रमाणे औषधांचा कोर्स सुरु करू.' डॉक्टर बोलत होते आणि तिचे डोळे भरून येत होते. प्रवीण चा चिनू वर फार जीव. भानावर आल्यासारखा तिने त्याचा हात हातात घेतला. थरथरणाऱ्या त्या हातांना आपल्या हाताने हळुवार थोपटले आणि कोणत्यातरी अनामिक बळाने ती ताठ बसली. थोड्या वेळाने प्रवीण आणि ती बाहेर आले. धक्क्यातून बाहेर पडायला अवधीच नव्हता, समोर खेळण्यांशी खेळत बसलेली चिनू त्यांना पाहून धावतच आली. तिघंही न बोलता घरी आली.

त्या रात्री प्रतिभा आणि प्रवीण दोघ खूप वेळ जागे होते. एकमेकांना धीर देत पुढे काय आणि कसं करायचं याचा विचार करत. तो धक्का पचवायला ती एकंच रात्र होती. चिनुसमोर अवसान गळून चालणार नव्हतं आणि हळवं होऊनही… त्या दोघंच पिल्लू आजारी होतं. एकमेकांच्या भावना त्या दोघांपेक्षा जास्त चांगल्या आणखी कोणाला समजणार? थोडं रडत, थोडा धीर देत, थोडं खंबीर होत दोघांनी एकमेकांना सावरलं. प्रवीणचा डोळा लागला. प्रतिभा मात्र अजून अस्वस्थच होती. हृदयातून उमटणारे प्रेम, माया, श्रद्धा अश्या अनेक भावना हळूच शब्द लयीच्या गोफात गुंफल्या जाऊ लागल्या. ती उठून बसली, आणि त्या साऱ्या ओळी कागदावर उतरवू लागली. कितीतरी काळानंतर निर्मितीचा अनुभव पुन्हा आला तिला. मनावरचं ओझंही थोडं हलकं झालं आणि मग लगेच झोप लागली तिला. सकाळी उठल्यावर प्रवीण ने बाजूला पडलेला तो कागद पहिला. कविता वाचली, प्रेमाने प्रतिभाच्या कपाळावरून हात फिरवला. तिला जाग आली. मनावर दडपण होते पण तरीही हरवलेले काही सापडल्याचा आनंद तिच्या शांत चेहऱ्यावर विलसत होता.

चिनूच्या आजारपणात प्रतिभाने जीवाचे रान केले. प्रवीण ने स्वतःला कामात बुडवून घेतले. उपचारात कसलीही अडचण येता कामा नये, पैशाची तर नाहीच नाही. प्रतिभा सारा वेळ चिनूच्या दिमतीला असायची. हॉस्पिटल, घर आणि त्याबरोबर चिनुचे मनोरंजन न कंटाळता ती करत होती. औषधांनी त्रासलेल्या चिनूला खावेसे वाटेल ते ती बनवायची. तिच्याशी खेळायला नवे नवे खेळ शोधायची. तिचा त्रागा सहन करायची आणि स्वतःचं दमलेपण लपवून टाकायची. हे सगळं दुःख, वेदना, त्रास आणि थकलेपण मार्ग काढायचं तिच्या लेखणीतून . सच्ची, आर्त भावना तिच्या कवितांमधून सहजपणे व्यक्त व्हायची. ती कविताच तिला धीर द्यायची आणि तिच्याबरोबर तिच्यासारख्या परिस्थितीत असलेल्या इतरांनाही.

तिच्या मनाला भिडणाऱ्या आणि ऊर्जाही देणाऱ्या  कवितांबद्दल हॉस्पिटल मध्येही सर्वांना माहित झाले होते. डॉक्टरांनाही त्या आवडल्या. त्यांच्याच कल्पनेवरून एक एक कविता सुंदर रंगांमध्ये मोठ्या अक्षरात छापली गेली आणि देखण्या फ्रेम मध्ये बसून हॉस्पिटलच्या भिंतींवर जाऊन बसली. हॉस्पिटलचेहि वातावरण बदलून गेले. त्या कविता येणाऱ्या लोकांना जणू आपल्याच वाटत. त्यांना धीर देत, सुंदर भविष्याची आशा दाखवत, आणि क्षणभर सगळा त्रास, ताण विसरायला लावत. नवा उत्साह देत. या सगळ्यातून प्रतिभालाही मोठे समाधान मिळे. निर्मितीचा आनंद, अनोळखी लोकांकडून मिळणारी पावती तिला नवीन उर्जा देत होती आणि ती दुप्पट उत्साहाने चिनूच्या सेवेत रमत होती.

हळूहळू त्या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले, चिनू बरी होऊ लागली. आणि एक दिवस पहिल्यासारखी हसत खेळत घरीही आली. आजारपणाने फिकट दिसत असली तरी तिला पूर्वीच्याच उत्साहाने घरी बागडताना, हट्ट करताना पाहून प्रतिभा आणि प्रवीणच्या डोक्यावरचे मोठ्ठे दडपण उतरले. इतके दिवस तिच्या चेहऱयाला न शोभणारा समजूतदारपणा वागवणारी चिनू पुन्हा खोडकरपणा करू लागली तेव्हा हसता हसता डोळ्यात पाणीच आलं प्रतिभाच्या. कितीतरी महिने मनावर असलेला ताण गेला आणि एकदम हलक हलक वाटलं. अन्न पोटात जाऊ लागलं, तशी तब्येत सुधारायला लागली चिनुची, डोक्याचा रुमाल बाजूला गेला, ऐटबाज बॉयकट मध्ये चिनू अधिकच स्मार्ट दिसायला लागली. शाळा, अभ्यास सारे पहिल्यासारखे सुरु झाले. आता पुन्हा पाहिल्यासारखे सारे, मध्ये जणू कधी काही घडलंच नाही, इतक्या पटकन पूर्वीचे रुटीन अंगवळणी पडले त्या तिघांच्या. प्रतिभा पुन्हा साध्यासुध्या गृहिणीच्या भूमिकेत हरवून गेली. सारे आनंदी, अगदी पूर्वी होते तसेच.

प्रतिभाच्या मनात मात्र काहीतरी ठुसठुसत होतं, खूप दिवसात कविता आली नव्हती भेटीला. 'अगदी गरजेपुरतीच साथ दिलीस? आणि आता कुठे निघून गेलीस अचानक?' प्रतिभा मनातल्या मनातच असे प्रश्न विचारीत सुटे, 'तू नवी ओळख दिलीस मला … आता अशी रुसून नको न जाउस… मला हवी आहेस तू, माझ्यासाठी.…  तो कठीण काळ तुझ्यामुळेच तर पार पाडू शकले मी, कि आता माझ्या भावना पुरेश्या आर्त राहिल्या नाहीत? मनाला अंतर्बाह्य ढवळून काढायला दुःखाचा भोवराच हवा का? का असा हट्ट?' पण कविता रुसली ती रुसलीच.

कितीतरी वेळा प्रतिभा हातात पेन आणि वही घेऊन बसे. आजही ती तशीच बसली होती. तेवढ्यात प्रवीण बाहेरून आला. आज चिनुचे रिपोर्ट मिळणार होते. या शेवटच्या टेस्ट होत्या. हॉस्पिटलच्या दिवसांना सहा महिने होऊन गेले होते आणि चिनूला कसलाही त्रास झाला नव्हता. त्यामुळे रिपोर्ट हि केवळ एक formality होती. पण प्रवीणचा चेहरा थोडा गंभीरच वाटला. त्याने काही न बोलता फाईल तिच्या हातात ठेवली. 'चिवट आहे आजार आपल्या चिनुचा, तिच्यापेक्षाही हट्टी' प्रवीण म्हणाला,'मी डॉक्टरांना भेटूनच येतोय. ते म्हणाले असं होतं कधी कधी. पण तू घाबरू नकोस प्रति, अजून एक कोर्स घेतला कि काम होईल म्हणाले.… ' प्रवीण काही बाही बोलत राहिला, धीर देत राहिला. पण प्रतिभा शांतच होती. डोळ्यात पाणी होतं तिच्या, पण चेहरा शांत होता. तिला धक्का बसला असेल असं वाटून प्रवीण आत गेला आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला. बाहेर येउन पाहतो तर चिनुची फाईल बाजूला पडली होती आणि प्रतिभा न थांबता वहीमध्ये काहीतरी लिहिण्यात गढून गेली होती.





Monday, 4 July 2016

काळ

काडी काडी आणून जोडून
शाकारलं पानांनी,
ऊब देणारं इवलं घरटं
विणलं त्या दोघांनी
जडावलेल्या पक्षिणीचं
देहभान हरपलं
मायेच्या पंखांखाली
शांत कोणी विसावलं
न थकता आणू लागले
आई बाबा चिमणचारा
घरट्यामधल्या चोचींसाठी
दिवसभर त्यांच्या फेऱ्या
घरट्यावरती डोकावता
लालचुटुक कवळ्या चोची,
झेपावला क्रूर काळ तो,
तीक्ष्ण नखांनी त्यांना टोची
एक पळवले, गेले दुसरे
हतबल, दुर्बल फक्त आकांत,
कितीक भिंती, किती पहारे,
नको नको तिसऱ्याचा अंत
काल मारल्या बऱ्याच फेऱ्या
आज पक्षिणी कुठेच नाही,
काल झोपलं तिचं पिलू,
अजूनही उठलंच नाही