Thursday, 23 February 2017

किड्यांची गाणी

रेशमाची अळी

बाहेर येऊन रेशमाची अळी
तुतीची पाने खाते खुळी
खाऊन खाऊन होते सुस्त
म्हणते झोप काढू मस्त
उबदार कोष लागते विणू
त्या धाग्याला रेशीम म्हणू
उकळते पाणी, मग अळीचे विरणे
रेशमाची बनतात वस्त्रे - प्रावरणे
क्वचित चुकवून माणसाची नजर
कोषातून पतंग उडतो निर्भर


मधमाशी

उंचावर लटकलेले मधाचे पोळे
थबथबलेले पिवळे काळे
कामकरी माशांना भलतेच काम
राणी मधमाशी करते आराम
अंड्यांमागून घालते अंडी
जन्माला येतात झुंडी च्या झुंडी
लाडक्या बाळाला जास्तीचा खाऊ
राणीपद करती एकीलाच देऊ
कामासाठी बाकीच्यांचा जन्म
हिंडून फुलांतून आणतात अन्न
षटकोनांत भरतात गोड गोड खाऊ
म्हणतात हिवाळ्यात पोटभर जेऊ
लिंपून टाकतात मेणाचा थर
ते पाहून माणसे चढतात वर
गोड गोड मध घेतात काढून
हिवाळ्यापुरता देतील ना ठेवून?





Sunday, 5 February 2017

आईपणाचा हक्क

देवकी खुर्चीवरून उठली. मनात चाललेली घालमेल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. टेबलावरची पाण्याची बाटली उघडून ती घोटभर पाणी प्यायली. आसपास कोणीच नव्हतं. बरे वाटत नाहीये असं सांगून तिने तिचे पेशंट दुसरीकडे पाठवले होते. कोणत्याही क्षणी तिथे वासू येणार होता. ती पुन्हा खुर्चीवर बसली. समोरच्या भिंतीवर गोड, गुटगुटीत बाळांचे हसरे फोटो लावले होते. टेबलावर आई आणि बाळ यांची चित्रे असलेले कॅलेंडर आणि बाजूला भिंतीवर गर्भार बाईच्या पोटाची रेखाचित्रे.
'हे सारं पुन्हा?, या टप्प्यावर नेमकं आत्ता .... आत्ताच का? या वेळी होईल का सगळं व्यवस्थित… कि पुन्हा?... नाही नाही ?' विचार करकरून तिचं डोकं भणभणलं होतं. घरी टेस्ट करून झाली होती, हॉस्पिटलला आल्यावर तिने पुन्हा एकदा करून घेतली, पॉझिटीव्ह .. आनंद, भीती, काळजी, आशा सगळ्या भावनांचा कल्लोळ होता डोक्यात.
याआधी २ वेळा असंच सगळं घडलं होत, पण हाती काही लागलं नव्हतं. सरुवातीचा तोच आनंद, तीच हुरहूर, भविष्याची स्वप्ने आणि मग सुखद स्वप्नातून कुणीतरी धाडकन जमिनीवर आदळावे असा जोरदार बसणारा धक्का… प्रत्येक वेळी.

स्त्रीरोगतज्ज्ञ होण्याचं तिचं स्वप्न साकार होऊन २ वर्षे झाली होती, हॉस्पिटलमध्ये काम करत होती ती, पण अजून शिकतहि होती. तिला काम करायचे होते ते डॉ. भागवतांकडे. डॉ. भागवत म्हणजे या क्षेत्रातले केवळ एक मोठे नावच नव्हते. हातात जादू असलेला अनुभवी स्त्रीरोगतज्ञ आणि नवनवे शोध लावून ते प्रत्यक्षातही यशस्वी करणारा हुशार संशोधक असे दुहेरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते. अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर मागच्याच आठवड्यात देवकीला त्यांनी वेळ दिला होता. ती त्यांना जाऊन भेटली होती. त्यांच्या ज्ञानाने, व्यक्तिमत्वाने दिपून गेली होती ती. तिचाही उत्साह, हुशारी आणि चमक त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी. त्यांनी एक तारखेपासून तिला जॉईन व्हायला सांगितले होते. ते दोन-तीन दिवस ती जणू आकाशात तरंगत होती. वासू कॉलेज मधून आला कि तिचे भागवतपुराण सुरु होई, दिवसभर व्याख्याने देऊन दमलेला वासूही गमतीने तिच्याकडे पाहत राही. तिची इतक्या वर्षांची मनापासूनची इच्छा साकार होणार याच विश्वात होती ती. आणि एक दिवस अचानक जाग आली तिला, 'तारीख उलटून आठवडा गेला कि!...  पाळी मिस झाली आपली? ' मग मात्र चैन पडेना. 'नाही नाही असं होता कामा नये, धिस इज नॉट द राईट टाइम ...'

वासू दार वाजवून आत शिरला, तिचा विचारमग्न चेहरा पाहून मनात काय ते समजला. 'आला रिपोर्ट?' देवकीने टेबलावरचा कागद त्याच्याकडे सारला.
'देवी, यू आs र प्रेग्नन्ट!’ बोलण्यात शक्य तेवढी सहजता आणत तो म्हणाला. पण देवकीचा उदास चेहरा त्याच्याच्याने पाहवेना. 'कमॉन देवी, चियर अप, ट्रीटमेंट चालू आहे कि नाही तुझी? या वेळी खूप काळजी घेऊ आपण. आत्ताच इतकी उदास नको होऊस. आपलं बाळ... '
'मला माहित आहे वासू, मलाही आई व्हायचंय, पण... पण.. मला पुन्हा हे सगळं, आत्ता तर मुळीच नको वाटतंय. थकून गेलेय रे मी... ' तिचे डोळे पाण्याने भरले. त्याने हलकेच तिला जवळ घेतले. 'असा विचार कर, तू आता भागवतांकडे जॉईन होशील, बाळाचं सगळं कसं छान होईल. अगदी सुरुवातीपासून त्यांच्यासारख्या अनुभवी डॉक्टरची नजर असेल तुमच्यावर. आणि त्यांच्या नवीन संशोधनाचा, पद्धतीचा फायदाच होईल आपल्याला.'
हे ऐकून तिलाही जरा हुरूप आला. त्यांच्या नवीन संशोधनाबद्दल तिने ऐकलं होतं. गर्भाशयाच्या विकृतींचा त्यांचा गाढा अभ्यास होता. आता तिथे गेल्यावर आणखी माहिती काढू आपण, बोलू त्यांच्याशी' तिला पुन्हा एकदा आशा वाटू लागली.

डॉ. भागवतांनी तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल. तिचे आत्तापर्यंतचे सगळे मेडिकल रिपोर्ट त्यांच्या टेबलावर होते. एकदाचं सगळं सांगून टाकल्यामुळे देवकीलाहि थोडं हलकं वाटलं. पण तिच्या मनात एक भीती होतीच, भागवतांनी त्यांची ऑफर मागे घेतली तर?
'सर, मी तुम्हाला खात्री देते, मी तक्रारीला जागा नाही देणार तुम्हाला, दोन वर्षाचा बॉण्ड साइन करायलाही मी तयार आहे, खरंतर उतावीळ आहे. मला खरंच काम करायचंय तुमच्याबरोबर. माझ स्वप्न आहे ते. आत्ता मी प्रेग्नन्ट आहे हे खर आहे, काही मर्यादा येतील आता … पण मी खूप विचार केला... आम्ही दोघांनीही. आम्हाला खरंच हवंय हो बाळ. आणि तुमच्या सहकार्याने ते शक्य होईल अशी खूप आशा आहे आम्हाला. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मला प्लिज संधी द्या. ' ती खरंच पोटतिडकीने बोलत होती. डॉ. भागवतांची नजर तिच्या रिपोर्टवरून तिच्या चेहऱ्याकडे वळली. बराच वेळ एक टक ते तिच्याकडे बघत राहिले. तिच्या डोळ्यात सच्चेपणा होता, उमेद होती आणि त्यांच्याबद्दल अतीव आदरही होता. आणि होती, अवेळी येणाऱ्या पण हव्याशा गर्भारपणाबद्दल काळजी.
'हं..' त्यांनी सुस्कारा सोडला, 'काही गोष्टी इतक्यातच तुला सांगीन असं वाटलं नव्हतं, पण मला वाटतं त्या बोलायची हीच संधी आहे. त्यानंतर तू जो निर्णय घेशील तो माझ्यासाठीही तेवढाच महत्वाचा आहे. हवंतर तुझ्या नवऱ्याशीही बोलेन मी.' टेबलावरचा फोन त्यांनी उचलला आणि आत कुणालाही पाठवू नये अश्या बाहेर सूचना दिल्या.

देवकी घरी आली. वासू अगोदरच आलेला होता. तिला आवडणाऱ्या आलं घालून केलेल्या चहाचा वाफाळता कप त्याने तिच्या हातात दिला. तिला अगदी हवाच होता तो. 'मग, काय म्हणाले डॉक्टर?' शेजारी बसत त्याने विचारलं.
'कशी सुरुवात करू कळत नाहीये.' चहाचा एक घोट घेऊन देवकी बोलू लागली, 'त्यांना मी सगळी परिस्थिती सांगितली. माझी त्यांच्याबरोबर काम करायची आणि या बाळाला सुरक्षितपणे वाढवायचीहि  प्रबळ इच्छा आणि या प्रेग्नन्सीमुळे काही काळाने मी तितका वेळ देऊ शकणार नाही हि वस्तुस्थिती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या केसमध्ये सगळ्यात लॉजिकल ऑप्शन हा सरोगसी चा आहे. माझं गर्भाशय जर हा गर्भ वाढवायला सक्षम नसेल तर त्याचे रोपण एका सक्षम सरोगेट मदरच्या गर्भाशयात करायचे हा सध्या सर्वमान्य तोडगा आहे.
'पण सरोगसी' वासूने तिच्याकडे पाहिले, 'देवी? पण देवी, काल परवापर्यंत तुला..'
'आय नो वासू, आजही मला हा पर्याय पूर्णपणे पटत नाहीये. माझा दोष म्हण, पण माझं बाळ मला वाढवता येत नाहीये या जाणिवेनेच आतून अपूर्ण असल्यासारखं वाटतं मला, आणि त्यात माझ्याच सारखी एक दुसरी स्त्री ते तिच्या पोटात वाढवतेय हे बघायचं म्हणजे… खूप कठीण आहे रे  … नाही जमणार मला’ देवी म्हणाली.
‘कळतंय मला’ समजुतीच्या स्वरात वासू म्हणाला, ‘पण आपल्या बाळासाठी … ‘
देवकीने चटकन वर पहिले, ‘हा झाला एक पर्याय. पण त्यांनी माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले.’ देवकीने पुन्हा चहाचा घोट घेतला.  'मग? दुसरा पर्याय? काय आहे दुसरा  पर्याय?' वासून विचारले. 'आपण उद्या डॉ. भागवतांना भेटायला जाऊया. ते तुला नीट सांगू शकतील.'

देवकी आणि वासू भागवतांसमोर बसले होते. त्यांनी आत्ताच जे ऐकलं त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते जर का खरं असेल तर देवकीच्या प्रश्नाचं ते एक अचूक उत्तर होत. देवकीच्या, वासूच्या बारीक सारीक शंकांनाही डॉ. भागवतांनी समाधानकारक उत्तरे दिली होती. तिचा हळूहळू एक्साईट होणारा चेहराच सांगत होता, ती या गोष्टीला तयार आहे. वासूचं मात्र तसं नव्हतं, विज्ञानात लागणारे नवीन नवीन शोध त्याला अवाक करत. तो तत्वज्ञानाचा प्राध्यापक होता, प्रत्येक नव्या गोष्टीचा सहज स्वीकार करता येत नसे त्याला. उलट 'जुनं ते सोनं' हा त्याचा आवडता फंडा होता, आणि बरेच वेळा तो ते उदाहरणांनी सिद्धही करून दाखवे. आजही त्याला वाटत होतं, वरवर पाहता सर्व बरोबर वाटतंय खरं, पण यात कुठेतरी काहीतरी चुकतंय का? देवकीला त्याच्या या स्वभावाची जाणीव होती, तसं ती डॉक्टरांना म्हणालीही होती.
भागवतांचे डोळे वासूच्या चेहऱ्यावर खिळले होते. त्याच्या मनातील चलबिचल त्यांनी ओळखली. ते म्हणाले, 'वासू, मला माहित आहे, या गोष्टीला होकार देणे वाटते तेवढे सोपे नाही. एका जीवाचा प्रश्न आहे. पण आत्तापर्यंत केलेल्या प्रयोगांवरून मी तुम्हाला खात्री देतो, यात नैसर्गिक प्रसूतीपेक्षा जास्त धोका नक्कीच नाही, उलट मी म्हणतो कमीच आहे. आपण बाळाच्या वाढीचे रेग्युलर मॉनिटरिंग करु शकू. नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षाही अधिक माहिती आपल्याला या पद्धतीमुळे मिळत राहील, कुठे काही वाटले तर उपाययोजनाही लगेच करता येईल. आणि मुख्य म्हणजे देवकी यात अडकणार नाही.'
'डॉक्टर, पण हे निसर्गाच्या विरुद्व नाही का?' वासून विचारले.
'हे आपण कसा विचार करतो त्यावर अवलंबून आहे' डॉक्टर म्हणाले, 'तसं म्हटलं तर सर्व नैसर्गिक आहे किंवा सगळंच विरुद्ध आहे. मानवाचा जन्म झाला तेव्हा त्याची अवस्था काय होती? अन्न हि त्याची प्रमुख गरज होती, त्याच गरजेने शिकार, शेती अश्या नवीन गोष्टींना जन्म दिला. वस्त्रे, राहण्यासाठी घर, नवनवीन यंत्रे या गोष्टी मानवाच्या गरजेतून निर्माण झाल्या. त्यामुळे त्या जरी नैसर्गिक नसल्या तरी त्या निर्माण झाल्या माणसाच्या ठायी नैसर्गिक असलेल्या गरज, इच्छाशक्ती आणि अर्थातच बुध्दीमत्तेमुळे. अधिकाधिक प्रगती करणे, आपले जीवन अधिकाधिक सुखकर करण्यासाठी झटणे हि माणसाची नैसर्गिक भावनाच आहे कि, आणि आपण तेच तर करणार आहोत. एखादी स्त्री पोटात बाळ वाढवण्यास असमर्थ असेल तर सरोगेट मदरचा पर्याय आपण स्वीकारलाच आहे ना? मग हि त्यापुढची पायरी आहे असे समजायला काय हरकत आहे?'

'पण हि जगावेगळी गोष्ट तुमच्या मनात आलीच कशी आणि कधी?' देवकीने विचारले. 'सांगतो' डॉक्टर म्हणाले, 'सरोगेट मदर चं वाढतं प्रस्थ हल्ली तुमच्याही कानावर येतंच असेल. वैद्यकीय, सामाजिक, वैयक्तिक काही ना काही कारणाने बरीच जोडपी आजकाल या सरोगसीचा विचार करताना दिसतात. जिथे गरज वाढती आहे, तिथे ती पुरवणारेही, या केस मध्ये पुरवणाऱ्याही तयार होतात. यात आर्थिक मोबदला, बाळाची कस्टडी, वैद्यकीय गुंतागुंत, मानसिक गुंतागुंत यांना बराच वाव आहे. कायदा आहेच पण जिथे कायदा, तिथे पळवाटा, कुणावरतरी अन्याय हे सगळं होणंही साहजिक आहे. हल्लीच गाजत असलेली केस तुम्हीही ऐकली असेल कि, सरोगेट आईने मूल द्यायला नकार दिला. जिथे माणूस इन्व्हॉल्व्हड आहे, तिथे भावनिक गुंतागुंत आलीच. मग कोर्टकचेरी, मानसिक तणाव यात महत्वाचा काळ निघून जातो. अशा केस मध्ये न्याय उशिरा मिळाला तर मिळालेल्या न्यायाला काही अर्थच उरत नाही हे तुम्हीही मान्य कराल. आपण याच क्षेत्रात आहोत तर यासाठी काहीतरी करायला हवे असे मला खूपदा वाटायचे.
मग एक दिवस गांधारीची गोष्ट माझ्या वाचनात आली.' 'गांधारी?' वासून चमकून विचारले. 'हो, आश्चर्य वाटलं ना? मलाही वाटलं होत' डॉक्टर हसून म्हणाले, ' महाभारतातील गोष्ट आहे, गांधारी गर्भार राहिली, पण बाळंत होण्याचे काही लक्षण दिसेना. आपल्या आधी कुंती बाळंत झाली याचा तिला फार राग आला. त्याच रागात तिने आपल्या पोटावर आघात करायला सुरुवात केली. पण बाळ बाहेर येण्याऐवजी बाहेर आला मांसाचा एक गोळा. तिला अतीव दुःख झाले, पण मग तिला आठवण झाली, महर्षी व्यासांनी तिला शंभर पुत्र होतील असा आशीर्वाद दिला होता. ती त्यांच्याकडे गेली. त्यांनी त्या मांसाच्या गोळ्याचे १०१ भाग केले आणि १०१ तुपाच्या बरण्यांमध्ये ते बंद करून ठेवले. यथावकाश ९-१० महिन्यानंतर त्यातून १०१ बालके जन्माला आली. १०० पुत्र आणि एक कन्या. पुराणातल्या कथांमध्ये अनेक वेळा असे छुपे जर्म आढळतात मला. तिथे वर्णन केलेल्या अनेक कल्पना आता प्रत्यक्षात आलेल्या आपण बघतो. ते सत्य किंवा केवळ कल्पना हा वादाचा विषय होऊ शकतो, पण ते वाचून मला वाटले, अशी कल्पना जर एक पुराणकार करू शकतो, तर माझ्यासारख्या संशोधकाने असा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? आणि तिथूनच माझ्या प्रयोगांना सुरुवात झाली.
कृत्रिम गर्भाशय तयार करणे हे खूप मोठे आव्हान होते. मानवी शरीरातील गुंतागुंतीचे अवयव, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध हे सगळं अतिशय कॉम्प्लेक्स आहे. पण हळूहळू माझ्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. सुरुवातीला काही चुका झाल्या पण आता मी १०० टक्के खात्री देऊ शकतो, गर्भ आईच्या पोटात जेवढा सुरक्षित वाढेल, तेवढ्याच सुरक्षितपणे मी त्याला मानवी शरीराबाहेर माझ्या खास इन्क्युमदर मध्ये वाढवू शकतो. येस इन्क्यु मदर - माझं नवीन संशोधन. एक खास बनवलेला इन्क्युबेटर जो आईच्या गर्भाशयाचं काम करतो. फलित झालेला गर्भ आईच्या पोटातून सुरक्षितपणे बाहेर काढून या इन्क्युमदर मध्ये हलवायचा. त्यानंतरची त्याची पूर्ण वाढ इन्क्युमदरमध्ये होते. आतल्या वातावरणात त्याचे योग्य पालन पोषण होतं. त्याला मिळणारा आहार आपण ठरवू शकतो, त्यातून बाळाला गरज असलेली सारी पोषक द्रव्ये आपण पुरवू शकतो. आतले तापमान, आजूबाजूला असणाऱ्या ऍम्नीऑटिक फ्लुइड सदृश द्रव्याचे कंपोझिशन, घनता आपण कंट्रोल करू शकतो. बाहेरच्या मॉनिटरवर आपण त्याची प्रगतीही पाहू शकतो आणि दिवस भरले, कि बाळ बाहेर काढायचं. या काळात बाळाच्या आईला कोणताही शारीरिक त्रास सहन करावा लागत नाही. रेडिमेड गोड, गोंडस बाळ डायरेक्त हातात.' डॉक्टर हसून म्हणाले.

देवकी आणि वासू दोघेही शांत होते. ‘डॉक्टर, तुम्ही असा प्रयोग मानवी बाळावर केला आहे? असे मूल जन्माला आले आहे?’ वासूच्या शांत स्वराने शांतता भंग केली.
‘हं… ‘डॉक्टर एक क्षणभर थांबले. खुर्चीवरून उठले. ‘वासू, मला तुमच्यापासून काहीही लपवायचे नाही. मी असा पूर्ण प्रयोग केला आहे असं म्हणणार नाही, पण या प्रयोगाचा खूप मोठा भाग मी यशस्वीपणे पार पाडला आहे.’ डॉक्टर म्हणाले. ‘म्हणजे?’ देवकीच्या स्वरात उत्सुकता होती.
‘कायद्याच्या भाषेत मला तुम्ही गुन्हेगार ठरवाल कदाचित, पण माझे नर्सिंग होम आहे आणि कायदेशीर गर्भपात येथे होत असतात. सबळ कारण असेल तर तीन महिने पूर्ण होईपर्यंत हा कायद्याने गुन्हा नाही. यातील काही गर्भ मी माझ्या संशोधनाकरिता वापरले, परवानगीशिवाय, हा माझा गुन्हा होऊ शकेल कदाचित. पण जे या जगात येणारच नव्हते त्याने माझ्या प्रयोगाला, पर्यायाने विज्ञानातील प्रगतीला खूप मोठा हातभार लावला हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. मी ते प्रयोग पुढच्या स्तरावर न्यायला खूप आतुर झालो होतो. सुरुवातीच्या चुकांवरून महत्वाचे बरेच धडे मिळाले.
आत्ता माझ्या प्रयोगशाळेत एक गर्भ जन्माला यायच्या तयारीत आहे. हा गर्भ मी दुसऱ्याच महिन्यात हळुवारपणे बाहेर काढून इन्क्युमदरमध्ये प्रस्थापित केला होता.’
‘कधी होईल त्या बाळाचा जन्म?’ देवकीने उत्तेजित होत विचारले. ‘अजून बरोब्बर २४ तास आहेत ड्यू डेटला. अर्थात बाकी सर्व तपासण्या पूर्ण केल्याशिवाय बाळाचा जन्म नाही करणार मी. पण बाळाची प्रगती उत्तम आहे, हृदयाचे ठोके, वाढ, वजन सगळं व्यवस्थित आहे. आणि पुढेही सगळं नीटच होईल अशी खात्री आहे. हे बाळ एक मिरॅकल असेल, माझ्या संशोधनातील एक मैलाचा दगड ’ डॉक्टर बोलायचे थांबले.
‘तुम्हाला खात्री आहे, हे बाळ पुढील जीवन एखाद्या सर्वसामान्य माणसासारखे जगू शकेल?’ देवकीने विचारले.
‘माझा माझ्या इन्क्युमदरवर पूर्ण विश्वास आहे’ डॉक्टर म्हणाले, ‘या बाळाची वाढही तितक्याच योग्य प्रकारे झाली आहे, जेवढी ती आईच्या पोटात होईल.’
‘तुला काय वाटतं वासू?’ देवकीने विचारले.
‘काही गोष्टी अजूनही मला कळत नाहीयेत. काही गोष्टी आपल्याला बाहेरून दिसू शकतात पण सगळ्याच नाही, न जाणो बाळामध्ये असे काही वेगळेपण असेल जे आत्ता नाही दिसणार पण हळूहळू समोर येईल.’ वासूच्या स्वरात अजूनही शंका होती.
‘तुमच्याकडे विचार करायला वेळ आहे अजून. पण मला नाही वाटत असं काही होईल.’ डॉक्टर हसून म्हणाले, ‘अशी व्यंगे सामान्यतः आधी समजतात. हा प्रयोग यशस्वी होईल आणि अज्ञाताची आणखी कितीतरी दारे उघडतील आपल्यासाठी. या बाळाच्या जन्मानंतर तुम्ही तुमचा निर्णय कळवलात तरी चालेल.’

देवकी आणि वासू तिथून निघाले. अजून विचार करायचा असे दोघांनीही ठरवले. वासू जरी अजून विचारात असला तरी देवकी जवळ जवळ निर्णयाप्रत आली होती. हे सगळं खूप एक्सायटिंग होतं तिच्यासाठी. एक म्हणजे तिला पूर्णपणे या संशोधनाला वेळ देता येणार होता, अशा अतिशय महत्वपूर्ण संशोधनाचा ती महत्वाचा भाग असणार होती; अविभाज्ज! आणि तिचं बाळही तिच्या नजरेसमोर वाढणार होतं. तिला ‘बघता’ येणार होते त्याच्या वाढीचे सगळे टप्पे, तिच्या डोळ्यांनी. आणि डॉक्टर भागवत हे सर्व करणार म्हटल्यावर या वेळी बाळ सुखरूपपणे हाती येणार… नक्कीच!
वासूच्या मनातील शंका मात्र जात नव्हती. आईच्या पोटात गर्भ केवळ लहानाचा मोठा होतो एवढंच आईचं काम असतं का? ते काम यंत्र करेलही पण … आणखीही बरंच काही आईकडून या काळात बाळापर्यंत पोहोचत असेल, माया, ऊब, सुरक्षिततेची भावना… असं काही… त्याला शब्दात मांडता येत नव्हतं. पण या साऱ्यात कसलातरी अभाव नक्कीच राहील असं त्याला राहून राहून वाटत होतं.
‘देवी, अजूनही मला वाटतंय या पेक्षा सरोगसी हा अधिक चांगला ऑप्शन आहे’ न राहवून तो देवकीला म्हणाला. ‘नको वासू, … नाही सहन होणार रे मला. शिवाय अशा भाडोत्री आईची आपण खात्री नाही देऊ शकत. ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले … अशा केसेस खूप गुंतागुंतीच्या होऊ शकतात. त्यात वेळ जाऊ शकतो, कितीही. आणि हे सुरुवातीचे दिवस बाळाला आई वडिलांचा लळा लागण्यासाठी फार महत्वाचे असतात रे. गर्भारपण तर मला नाही अनुभवता येणार पण हे नंतरचे मोलाचे क्षण तरी मला उपभोगायचेत आई म्हणून हक्काने. त्या देवकीने कृष्णाचे मातृत्व यशोदेबरोबर वाटून घेतले असेल, पण या देवकीला आपल्या आईपणात वाटेकरी नको आहे. अरे, गर्भारपणात बाई मनाच्या खूप वेगवेगळ्या अवस्थांतून जात असते, इमोशनली व्हल्नरेबल होते आणि मग कधी काय निर्णय घेईल काय भरवसा? … नेमकी आपल्या नशिबी अशी व्यक्ती आली, आणि बाळाचा ताबा तिने घेतला तर? मी कल्पनाही नाही करू शकत. इन्क्युमदर असे नक्की नाही करणार, शिवाय आपलं बाळ आपल्या डोळ्यासमोर असेल, अक्षरशः, तुला कळतंय का वासू? आपण बघू शकू त्याला रोज.’ तिचा निर्णय झाला होता. आपला गर्भ इन्क्युमदरच्या स्वाधीन करायला ती तयार होती.

दुसऱ्या दिवशी दोघंही डॉ. भागवतांच्या बोलावण्यावरून त्यांच्या प्रयोगशाळेत गेली. डॉक्टरांनी अभिमानाने त्यांना सर्व दाखवलं, दिवस भरत आलेलं ते बाळही. देवकी डॉक्टरांबरोबर बाकी काही गोष्टी पाहायला, समजून घ्यायला पुढे गेली. वासू मात्र मागेच थांबला. त्याला ते बाळ फार एकटं वाटलं, आईच्या स्पर्शापासून, कौतुकापासून, मायेपासून दूर. ती काचेची पेटी, त्याला जोडलेल्या असंख्य नळ्या, वायर्स, मॉनिटरवर बदलणारे आकडे या साऱ्यांकडे बघत तो उभा राहिला. बराच वेळ .. एक बाळ कृत्रिमरीत्या वाढवायला चाललेला तो खटाटोप.  

रात्री दोघंजण जेवण करून गप्पा मारत बसले होते. ‘वासू, उद्या पहाटे बाळाचा जन्म करायचा असं डॉक्टर म्हणत होते. सगळं व्यवस्थित आहे. मला खरंच हा पर्याय पटतोय वासू. इतकं लक्ष तर आपण नैसर्गिक प्रसूतीतही देऊ शकत नाही, इतकी माहिती नाही मिळत एरवी. इथे सगळं डोळ्यासमोर आहे, स्पष्ट. मला वाटतं आपण हा पर्याय स्वीकारावा.’ देवकी म्हणाली.
‘देवी,’ विचारमग्नतेतून बाहेर येत वासू बोलू लागला, ‘ तुला खात्री आहे, सरोगसी पेक्षा हा मार्ग सुरक्षित आहे?’
‘हो वासू, १००%’
‘तुला खात्री आहे, इन्क्युमदर आपल्या बाळाची योग्य काळजी घेईल? ‘
‘हो वासू, मला खात्री आहे.’
‘तुला खात्री आहे इन्क्युमदर मधले बाळाचे दिवस पूर्ण झाले कि आपल्याला बाळाचा पूर्ण ताबा मिळेल?’
‘वासू? अरे हो नक्कीच, अरे यंत्र आहे ते, माणसाच्या भाव भावना नाहीत त्याच्यात. आपल्या बाळावर केवळ आपला हक्क असेल.’ देवकी म्हणाली.
‘बरं, उद्या जर त्या पेटीतल्या बाळाचा जन्म सुखरूपपणे झाला, तर मी तयार आहे या गोष्टीला.’
वासूच्या मनात काय चालू आहे याचा देवकीला अंदाज येत नव्हता पण त्याचा होकार आल्याने तिने फार विचार केला नाही. उद्या आपला निर्णय डॉक्टरांना सांगायचं आणि पुढील प्रक्रिया सुरु करायची या विचारात ती गढून गेली.

दिवस उजाडला, दोघंही लवकर आवरून डॉक्टरांच्या प्रयोगशाळेत पोहोचले. सुरक्षाप्रक्रिया पूर्ण करून ते आत शिरले. त्या खोलीच्या बाहेर डॉक्टरांचा असिस्टंट होता. डॉक्टर आत्ता भेटू शकत नाहीत, असं सांगून त्यांना थांबायची खूण करून तो आत गेला. देवीने प्रश्नार्थक चेहऱ्याने वासूकडे पहिले. त्यालाही काही कळत नव्हते. ‘कदाचित त्या बाळाच्या जन्मानंतर काही … ये आपण वाट पाहू’ असं म्हणून देवकीला घेऊन तो शेजारच्या खुर्चांकडे वळला. तिच्या मनात नको नको त्या शंका येत होत्या. वासूच्या चेहऱ्यावरहि काळजी दिसत होती.

जवळजवळ तासाभराने डॉ. भागवत बाहेर आले. चेहरा थकलेला दिसत होता, पण डोळे उत्तेजित झाले होते. त्यांना पाहून देवकी आणि वासू उठून उभे राहिले. ‘बाळाला बाहेर काढलं का?’ वासूने विचारलं, ‘बाहेरच्या वातावरणात आल्यावर… आय मीन रडलं का बाळ?’
देवकीने हळूच विचारले, ‘बरे आहे ना ते?’
‘हं .. येस. बाळ जिवंत आहे.. एक जीव आईशिवाय जन्माला आलाय. मी जन्माला घातलाय … ’ डोळ्यात एक निराळीच झाक होती त्यांच्या. ‘अजून खूप काही करायचंय मला. अनेक कल्पना आहेत डोक्यात…. अनेक प्रयोग… अनेक शक्यता तपासून बघायच्या आहेत.‘
‘डॉक्टर, या बाळाचा पुढचा सांभाळ कोण?... ‘ देवकीने हळूच विचारलं.
‘कोण म्हणजे? मीच’ आश्चर्यचकित स्वरात डॉक्टर म्हणाले, ‘मीच आई, मीच बाप आणि मीच पालक’
‘तरीही याच्यावर प्रयोग करणार तुम्ही?’ देवकीने अविश्वासाने विचारलं.
‘मग? करावेच लागतील. हि तर सुरुवात आहे. विज्ञानाच्या मदतीने, विज्ञानाच्या प्रगतीसाठी जन्माला घातलंय हे बाळ. डॉक्टर म्हणाले, ‘त्याच्यावर हक्क माझा आहे, विज्ञानाचा आहे.… आता इथेच कसं थांबता येईल? बरंच काम करायचं आहे, तू होतेयस ना जॉईन देवकी? आणि आता तुझ्या बाळाचीही काळजी सोड तू, त्यालाही सुखरूप जन्माला घालेन मी आपल्या प्रयोगशाळेत. ते कन्सेंट फॉर्म तेवढे वाचून घ्या नीट. अटी मान्य असतील तर लगेच सुरुवात करू. चला तयारीला लागायला हवं, येस … खूप काम आहे.‘ बोलत बोलत ते पुन्हा आत निघून गेले.

वासूने देवकीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर निराशा दाटून येत होती. ‘वासू, आईची कर्तव्यं, माया विसरतील कदाचित पण आईपणाचा हक्क कुणीच नाही सोडत रे सहजासहजी … ‘ तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, वासू तिला हळुवारपणे थोपटत राहिला.