Thursday, 10 September 2015

तारण

सुकली शेते, आटली तळी, अंगाची लाही लाही
मुदत संपली - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

फोडले डोंगर, तोडले वृक्ष, सिमेंट जंगल ठाई ठाई
balance नाही - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

धन्यानेच गिळल्या विहिरी, धरणांनाही कागद खाई
package नाही - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

आपल्यापुरतेच पहिले फक्त, न करता विचार काही
विश्वास नाही - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

हिरवेगार डोंगर- झाडी, नद्या स्वच्छ आणि प्रवाही
तारण ठेवा - निसर्ग म्हणतो, नाहीतर पुन्हा पाऊस नाही


Tuesday, 8 September 2015

संशयाचे बोट

आजोबांचा मित्र एकदा आला होता घरी,
आजोबाच समजून मी रेलले अंगावरी
फाजितीने माझ्या झाला हास्याचा स्फोट
पण मित्राकडे नव्हते कधीच संशयाचे बोट

होतो पाचसहा जण, पण एकच मिळाली रिक्षा
मग मांडीवरच बसण्याची आम्हा मुलांना शिक्षा
दंडावरच्या पकडीत सुद्धा नव्हती कसली खोट
काका मामांकडे नव्हते कधीच संशयाचे बोट

खेळायला घेऊन जात शेजार पाजारचे काका,
कुठल्या कुठे असायचो आम्ही, मैदाने नि बागा
आई बाबांच्या परवानगीची लागत नव्हती नोट
शेजारच्यांकडेही कधीच नव्हते संशयाचे बोट

शाळा, बस, घरातही आज, कुणी शोधत असतो संधी
विकृत नजरेला बालक दिसते - नर किंवा मादी
वासनेनी वात्सल्याचा घेतला आहे का घोट ?
प्रत्येकावरच रोखलेले संशयाचे बोट