Wednesday, 28 October 2015

न्याय

बाळ स्वागता उत्सुक सारे, स्त्री जन्माने पडले चेहरे
अवचित दोषी ठरल्या दोघी, कन्या आणिक माय
हा कोणता न्याय?

पूजता देवी वीरांगना ती, कर्तृत्वाची गाउन महती
पण पुत्रजन्म स्त्री-कर्तृत्वाचा मापदंड ठरलाय
हा कोणता न्याय?

वरती जपुनी आधुनिकता, अंतरात परी मूर्ख क्रूरता
धैर्य तरी हे कसे आणता? मरती बालिका, हाय!
हा कोणता न्याय?

मारून टाका अजात पुत्री, छाटून टाका वंश पालवी
षंढपणाचे याहून मोठे लक्षण दुसरे काय?
लक्षण दुसरे काय?

Sunday, 11 October 2015

आज लक्ष्यात येतंय …

तू गेलीस - सुटलीस, बरं वाटलं …
असहाय शरीरात कित्येक दिवस कोंडलेलं तुझ्यातलं चैतन्य
एकदाचं मुक्त झालं -
पण हसऱ्या चेहऱ्यानं वेदना सोसायला शिकणं राहून गेलं
हे मात्र आज लक्ष्यात येतंय …

संपलं तुझं परावलंबित्व, बरं वाटलं …
थकलेल्या गात्रांना उत्साहाच्या पंखांनी दिलेलं बळ
शेवटी ओसरलं -
पण त्या न आटणाऱ्या उत्साहाचा उगम विचारायचं राहून गेलं
हे मात्र आज लक्ष्यात येतंय …

प्रसन्न जगलीस, बरं वाटलं …
समोर येईल ते आपलं मानून केवळ प्रेमच करणं
तुलाच जमलं -
पण प्रेम करून घेता घेता, तुला काही सांगायचं राहून गेलं
हे मात्र आज लक्ष्यात येतंय …





Wednesday, 7 October 2015

लबाड कोल्हा

जंगलात रहात होता, एक लबाड कोल्हा,
शिकार शोधत एकदा गावामध्ये शिरला
मागे लागले कुत्रे - पडला पिंपात चुकून,
पिंपात निळा रंग - गेला तो माखून
कोल्होबांच्या डोक्यामध्ये आली एक युक्ती,
म्हणे, 'जंगलचा मी राजा, करा माझी भक्ती'
फसले साधे भोळे प्राणी, त्याच्या ढोंगाला,
सारे हजर - निळ्या कोल्ह्याच्या सेवेला
कोल्हेकुई ऐकली, कोल्होबांना राहवेना,
सूर त्यांनी लावला, शांत बसवेना
ओळखला चोर  - ढोंग पडले गळून,
हाकलले त्याला साऱ्या प्राण्यांनी मिळून


बदलला काळ - फक्त बदलले रंग,
लबाड कोल्होबा करतात सत्संग
इच्छा करतो पूर्ण म्हणतात, संकटही दूर,
नोकरी - संतान देतो - संपत्तीचा पूर
आश्रमाची दारे यांच्या होतात जेव्हा बंद,
कोणी नाच गाण्यात कोणी मद्यपानात धुंद
लबाडी नि लूट - भरतो पापाचा घडा,
कोणीतरी राहते उभे शिकवायला धडा
सारी पापे, सारे ढोंग येते उजेडात,
सारी बुवाबाजी गोळा होते तुरुंगात
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जगण्याचे मंत्र,
शिकायलाच हवे आज पुन्हा पंचतंत्र 

सांग सांग बाप्पा सांग …

सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
पंचतंत्र वाचून आम्ही शहाणे होऊ का?
सांग सांग बाप्पा सांग, आम्ही शिकू का?

नको तेव्हा बोलून - गेला कासवाचा जीव,
तरी गाडी चालवताना मोबाईलची हाव
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
गाडी चालवताना फोन बाजूला ठेवू का?

समाजात वावरती किती कोल्हे निळे,
आतली लबाडी कशी कुणाला न कळे?
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
ढोंग, बुवाबाजी आम्ही ओळखू शकू का?

क्रूर सिंह फसे - उडी मारे विहिरीत,
चतुर सश्याने केली त्याच्यावर मात,
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
दहशतवाद असा संपवू शकू का?

कबुतरे सारी जाळे घेऊन उडाली,
उंदीर मित्रांनी त्यांची मुक्तताही केली
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
मदत करून एकमेकां, प्रगती करू का?