Monday, 15 January 2018

वजनकाटा


वजनकाटा पाहून यांनी, केला डाएट प्लान
यादी यांची वाचून, ऐकून, माझा चेहरा म्लान

साखर नको, गहू नको, नको तेल मिरची
ओट, ब्रोकोली, सिरीयलसाठी दुप्पट पैसे खर्ची

डाएटग्रस्त नवरा नि घरची दोन वाढती पोरे,
तळले, भाजले, उकडले जरी, क्यालरी मोजती सारे

दर दोन तासांनी म्हणे खायचे असते थोडे
बुटान्वाचून अडलेय अजून प्रभातफेरीचे घोडे

चहा कॉफी सोबत आता मी काढत असते ज्यूस
दोन नाश्ते, दोन जेवणे, सारखे स्वयंपाकघरात घूस

भाज्या, फळे, धान्य पिशव्या उचलून, निवडून, दळून
कर्तव्याला चुकत नाही, आदर्श बायको म्हणून

हल्लीच लक्षात आलंय माझ्या, यांचं अर्धवट काम
डाएट सगळं माझ्यावर आणि सोडून दिलाय व्यायाम


पण बाजाराला जाऊन येऊन, उचलून वाढीव वजनं
घरचा वजनकाटा होतोय, हळूहळू मलाच प्रसन्न.

जात

जन्मजात चिकटली, एक चौकट आखली
दृष्टी बाहेर रोखली, परभावे.

जातीच्याच नावे, जमता बांधवे
आपपर भावे, शिकविली.

भोवे दांडग्यान्चा वेढा, बाल हात हो तगडा
उचलता तो दगडा, अजाणता.

ज्याने जुलूम तो केला, ज्याने सहन ही केला
गेले सारे की लयाला, जुने झाले.

झाली कितीक शतके, उच्च नीचतेच्या धाके
भेद पुसून न टाके, कुणीही का?

सारी नवीन माणसे, तरी भूतकाळ ओझे
का घेउनी वागती, अजूनही?

मनी चिखल विषाचा, त्यात रतीब रोजचा
द्वेषाचा राडारोडा, कोण घाली?

थांबून एका जागी, पाय रुततच जाई
सोडून पुढे होई, जात पात.

Sunday, 14 January 2018

जमेल का कधी?

मडक्याला आकार दिल्यानंतर
हातावरचा मातीचा राप स्वच्छ धुवून
धगधगत्या भट्टीत ते सहज भाजायला देणं
जमेल का कधी?

नाजूकसा दागिना घडवताना
हातावरच्या दाहाची लाली विसरून
दागिन्यांचे कंगोरे अलिप्तपणे न्याहाळणं
जमेल का कधी?

छिन्नीचे नेमके घाव घालून
नको असलेल्या दगडाला बाजूला केल्यानंतर
घडवलेले सुरेख शिल्प लोकार्पण करणे
जमेल का कधी?

आपल्याच पोटच्या पिलावर
प्रेमळ शिस्तीचा, सद्वर्तनाचा संस्कार करून
त्याला घरट्याबाहेर उडताना निरपेक्षपणे पाहणे
जमेल का कधी?

दुभाजक

रस्त्यावरच्या स्पष्ट आखलेल्या दुभाजकांकडे दुर्लक्ष करून,
नेमलेल्या मार्गाच्या उलट दिशेने जाताना
ते पुसून टाकतात त्या दुभाजकांचे अस्तित्व
आपल्या बेदरकार बंडखोरीने;
आणि उडवतात बोजवारा सुव्यवस्थेचा.
मात्र मनामनांमधील दुभाजक अस्पष्ट होताहेत असं वाटत असतानाच
त्यावर मारतात तोच जुना कुरूप रंग विषमतेचा.
हाकत राहतात डोळ्यांना झापडं बांधलेल्या कळपांना;
मागे आणखी मागे...
आणि प्रस्थापित करतात अशांतता, पुन्हा एकदा.

चकचकीत वातानुकुलीत गाड्यांतून फिरत असताना
केवळ कचराच नाही
बाहेर ओकतातजहाल एकांगी मतांची गरळ,
भडकवून भारून टाकतात कोवळी, निबर माथी;
आणि उडवतात बोजवारा वातावरणातील निर्मळतेचा.
मात्र पुढे जाऊ पाहणाऱ्या सूज्ञ समाजाने केलेच दुर्लक्ष तर,
असह्य त्वेषाने ठिणगी पेटवून रोखतात सारे मार्ग,
सगळीकडे पसरवतात काळ्या विषारी धुराचे साम्राज्य
रस्त्यात, घरात, मनातही...
आणि प्रस्थापित करतात अराजक, पुन्हा एकदा.

मोकाट सुटल्या आहेत झुंडी
जाणत्या नेत्याचे भुलवणारे मुखवटे घालणाऱ्या,
आपल्याच दंडावरील बेटकुळ्यांच्या कौतुकात गुंग असलेल्या
अनिर्बंध सत्तापिपासू लांडग्यांच्या.
त्यांना नाही तमा, शांतता, स्थैर्य आणि प्रगतीची- दुसऱ्या कुणाच्याच.
मात्र त्यांनीच जोपासलेल्या अशांत अस्थिर वातावरणाच्या धुळीत,
फूट पाडून शकले केलेल्या समाजातून,
कधीतरी उभी राहतील का मेंढरे, जी दाखवतील धैर्य झापडे काढायचे
आणि शोधतील मार्ग पुढे जायचा फक्त एकदाच!-