Thursday, 6 August 2020

घाबरू नकोस मित्रा..

 घाबरू नकोस मित्रा, फक्त रात्र जरा लांबली आहे,

या वादळाच्या पलीकडे ज्योत तुझ्यासाठी थांबली आहे.


इथवर आलास तेव्हा मार्ग होता का सोपा?

पण स्वतःवरच्या विश्वासाने तू ओलांडलास प्रत्येक धोका.

आज एकटेपणाची सावली तुला मोठी दिसायला लागली आहे,

पण खात्री बाळग, तुझी दृष्टी या अंधाराने झाकली आहे.

जागा हो मित्रा, फक्त रात्र जरा लांबली आहे ||१||


एकट्या दुकट्याचे बळ, कधीतरी कमी पडणारच,

भक्कम दिसणारे ताठ झाडही, वादळामध्ये झुकणारच.

केवळ दोन खांद्यांवर तू सारी मदार टाकली आहेस,

मदत मागायची लाज, प्रसंगी प्राणांवरही बेतली आहे.

सावध हो मित्रा, फक्त रात्र जरा लांबली आहे ||२||


सतत पुढे जाणे हीच प्रगती असते का रे?

घे आडोसा घराचा, ओसरू दे हे वादळवारे.

विसर ताण मनावरचा, कुणी शर्यत लावली आहे?

तूच नाही, बघ एकदा, सारी दुनियाच थांबली आहे.

लक्षात ठेव मित्रा, फक्त रात्र जरा लांबली आहे. ||३||

No comments:

Post a Comment