आज सकाळी झाडावर एक कोकीळपक्षी दिसला. खरंतर झालं ते एवढंच; पण ते एवढ्यावरच थांबतं तर हे लिहिण्याचा प्रपंच कशाला केला असता! काळ्या तुकतुकीत कांतीचा, पिवळ्या चोचीचा, शेपटीचे पंख फेंदारून इकडे तिकडे टुकूटुकू पाहत फांदीवर बसलेल्या या कोकीळपक्षाचे दर्शन खरंतर दुर्मिळ. त्यामुळे अचानक तो दिसला तेव्हा प्रथम चाचपला तो मोबाईल. फोटो काढण्यासाठी. पण सकाळी फिरायला जाताना सहसा फोन सोबत नसतोच. मग आजूबाजूला पाहिलं तर ज्याला आवर्जून हा पक्षी दाखवावा असं कोणीच नव्हतं. मग मात्र विचारांची मालिका सुरु झाली. वाटले, काहीही नवीन किंवा वेगळे दिसले की ते कुणालातरी सांगावेसे वाटणे ही माणसाची किती सहजप्रवृत्ती आहे नाही! अश्या वेळी जवळ कुणी नसेल तरी फोनचा कॅमरा असण्याचीही किती सवय आणि सोय असते आजकाल. फोटोग्राफी ही ही कलाच. पण काहीतरी सांगण्याच्या, आपल्याला गवसलेले काहीतरी इतरांनाही दाखवता येण्याच्या अनिवार इच्छेतूनच इतरही कलांचा जन्म झाला असेल नाही का! कधी जसे दिसले तसे तर कधी दिसलेल्यातून जन्माला आलेले काहितरी नवे सांगता सांगता चित्रकला, शिल्पकला, काव्य, संगीत, नृत्य यांचा जन्म झाला असणार. माध्यमे वेगवेगळी पण काहीतरी सांगण्याची उर्मी तीच!
विचार करता करता मन
एकदम दहाबारा वर्षे मागे गेले. काही कामानिमित्त मी रस्त्यावरून चालले होते. आणि
ध्यानीमनी नसताना समोरून चक्क एका हत्तीची स्वारी डुलत डुलत येताना दिसली. गेली
दोन अडीच वर्षे मी जाईन तिथे माझ्या सोबत असणारी माझी चिमुरडी लेक नेमकी तेव्हा
माझ्यासोबत नव्हती. तोवर कायमच तिला सोबत घेऊन फिरण्याची, रस्त्यातल्या गमती जमती
तिला दाखवण्याची आणि तिच्या चेहऱ्यावरचे बालसुलभ भाव न्याहाळण्याची इतकी सवय झाली
होती, की ती आत्ता बरोबर नाही हे लक्षात आल्यावर आता हा हत्ती कुणाला दाखवू असा
प्रश्न मला पडला. हत्तीसारखे अप्रूप तिला आत्ता पाहायला मिळणार नाहीये याची मलाच
कितीतरी वेळ हळहळ वाटत राहिली. खरंतर हे दोन्ही अगदी साधेसेच प्रसंग; पण आज मात्र
काहीतरी नवे सापडले. असे वाटले, अनुभवाच्या पूर्णत्वासाठी दोन उत्सुक मने असणे
आवश्यक. एक सांगणाऱ्याचे आणि एक ऐकणाऱ्याचे. ही काहीतरी सांगण्याची अनिवार इच्छा
आणि काहीतरी नव्याने समजून घेण्याची उत्सुकता जोवर आहे तोवर कलेला निरनिराळ्या
आविष्कारांचे धुमारे फुटत राहणार आणि त्या त्या अनुभवांना पंख फुटून तो प्रवाही
होत राहणार.