पुन्हा एक वर्ष उलटले. नवा जानेवारी महिना सुरु झाला. पण गेली दोन वर्षे आपल्या घरात ठाण मांडून बसलेला पाहुणा काही आपली पाठ सोडायला तयार नाही. नाही ‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती आहे मान्य! पण ठराविक काळानंतर पाहुण्याला घरचाच सदस्य समजून वागवावे असेही कुणीसे म्हटले आहेच की. आतापर्यंत काय असे कमी पाहुणे येऊन गेले आपल्याकडे? ठराविक काळ राहिले, आपल्याकडून आदरातिथ्य करून घेतले आणि मग निघून तरी गेले नाहीतर घरच्या कारभारात ढवळाढवळ न करता आपली जागा ओळखून वागू लागले. पण हा पाहुणा घरावरची आपली पकड सोडायलाच तयार नाही. मला कळत नाही, आपणही आपल्या घराचा ताबाच त्याला का देऊ करतोय! काम धाम सोडून त्याच्या भजनी लागत राहिलो तर तो सोकावणारच ना? त्यापेक्षा त्याचे घरातले अस्तित्व गृहीत धरून पण त्याला अनुल्लेखाने मारून प्रत्येकाने आता आपले कर्तव्यकर्म सुरु करावे हे उत्तम. मनोमन त्याला त्याच्यासारख्या इतर त्रासदायी पाहुण्यांच्या रांगेतली त्याची जागा दाखवून द्यावी. आपण त्याला ओळखून आहोत, त्याला शह देण्याची ताकद आपल्यात आहे आणि त्यामुळे वेळ आलीच तर त्याच्याशी लढण्यासाठीही आपण समर्थ आहोत याची सार्थ जाणीव स्वतःला करून द्यावी. मनातली भीती, संशय आपोपाप कमी होईल. विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घ्यावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत प्रात्यक्षिक अनुभव घ्यावा. नोकरी धंदा करणाऱ्यांनी आपले काम करून देशाच्या अर्थकारणात आपला हातभार लावावा. आणि गेली दोन वर्षे एकाच जागी फिरत राहिलेले प्रगतीचे चक्र आता पुढे न्यावे. बराच काळ गढूळलेले जगणे प्रवाही होईल.
No comments:
Post a Comment