Friday, 14 January 2022

८. कचरा ने. पिशवी रे, तुम्ही का रे का रे नेता?

 आमच्या सोसायटीमधले हे नवे कचरावेचक महान आहेत. आपल्या कर्तव्यात जरा म्हणून कसूर करायचे नाहीत. एकतर आमच्याकडे ओला सुका कचरा वेगळा गोळा होतो. शिवाय आम्ही पडलो पर्यावरणस्नेही! त्यामुळे रोज घरात तयार होणारा कचराही तसा कमीच असतो. तो कमी असतो त्यामुळे ओल्या कचऱ्याच्या डब्याला लावलेली पिशवी पुरी भरत नाही; ती पुरी न भरल्यामुळे (वसूल न करता) कचरा वेचकाला देता येत नाही. मग पिशवी पुरी भरेपर्यंत म्हणजे दोन तीन दिवस डबा बाहेर ठेवला जात नाही. त्यामुळे सकाळी गडबडीच्या वेळात त्याची बेल वाजल्यावर दार उघडून त्याला ‘आज कचरा नाही’ असे रोज सांगावे लागते. त्यात आमचे कचरावेचक पडले भलतेच जबाबदार. त्यामुळे ‘आज कचरा नाही’ हे घरच्या पोराटोरांनी सांगितलेले त्यांना पटत नाही. ते पुन्हा बेल वाजवून कचरा मागतात. अश्या वेळी शांत राहून ‘अहो, कचरा नाही आज’ असे सांगताना जीवाला किती कष्ट होत असतील याची कल्पनाच केलेली बरी.

ही झाली ओल्या कचऱ्याची गोष्ट. सुक्या कचऱ्याची वेगळी तऱ्हा. त्या डब्याला लावलेली पिशवी ही डबा अधिक दिवस स्वच्छ राहावा (सारखा धुवायला लागू नये) या शुध्द हेतूने बहुदा घरच्या बाईने, ‘सुकाच कचरा आहे ना, मग पिशवी कशाला?’ या घरच्या पुरुषाच्या प्रश्नाला न जुमानता लावलेली असते. कारण कचरा सुका असला तरी त्या डब्यात कुठूनतरी पाण्याचा थेंब, ओलसरपणा जातो आणि घरातला केर त्यात गेल्यावर तळाला चिकटून बसतो याचा तिला अनुभव असतो. अशी पिशवी (Re-use चीच बरं का!) महिनाभर सहज टिकावी या उदात्त हेतूने मी लावते. कचरा घेताना ती प्रत्येक वेळी काढू नका अशी कचरावेचकाला सूचनाही देते. आमच्या इथे पूर्वी ज्या बायका कचरा नेत, त्या ही सूचना पाळत असत. पण सध्या बदलून आलेले पुरुष वेचक मात्र घरच्या पुरुषाचाच कित्ता गिरवताना दिसतात. त्यामुळे अनेकदा सांगूनही ही पिशवी प्रत्येक वेळी काढून कचऱ्यात गेलेली दिसते आणि डबा बिचारा उघडा पडतो. पुरेपूर वापर न करता आपण प्लास्टिक कचरा वाढवत आहोत या जाणीवेचा गिल्ट आणि राग येऊ लागतो आणि डोके काहीतरी जुगाड शोधू लागते. सुरुवातीला मी पिशवीला डब्यासकट नाडी बांधून पाहिली. पण ती नाडीसकट कचरार्पण झाली. अनेकदा सांगून तर झालेच होते. शेवटी परवा पिशवी डब्याला चिकटपट्टीने घट्ट चिकटवली. मला वाटले, ‘किती ग बाई मी हुशार!’ पण हा हुशारीचा आनंद आज पुन्हा एकदा गळून पडला. पिशवी डब्याबाहेर येत नाही म्हणजे काय! कचरावेचकाला हा भलताच अपमान वाटला असावा. आपली सारी शक्ती एकवटून त्याने ती चिकटवलेली पिशवी टराटर ओढून काढली आणि विजयी वीराच्या अविर्भावात आमच्या डब्याला उघडा टाकून निघून गेला.

आता रोज सकाळी बेल वाजली की ‘आज कचरा नाही’ किंवा ‘डब्यातली पिशवी काढू नका हं’ हे शांतपणे सांगत राहण्याचे प्राक्तन मी स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण तरीही तुम्हाला यावर काही उतारा (रोज घरात आल्यावर डब्याला अंघोळ घालणे सोडून) सापडला तर नक्की कळवा हं!. शेवटी, उम्मीद पे दुनिया कायम है.

No comments:

Post a Comment