लेखक लोकांना बऱ्याच वेळेला एक प्रश्न विचारला जातो; तुम्हाला सुचतं कसं बुवा! काही वेळा अंतःस्फुर्तीने काही गोष्टी लिहिल्या जातात. डोक्यातले विचार आणि लिहिण्याचा वेग यांचा उत्तम ताळमेळ जमतो आणि बघता बघता एखादा लेख, एखादी कविता, कथा कागदावर उतरते. ही झाली आदर्श आणि लोकांच्या मनात असलेली लेखन क्रियेविषयीची प्रतिमा. प्रत्येक वेळी ही अवस्था अनुभवणारे लेखक भाग्यवान! आम्ही बाकीचे मात्र कधीतरी अनुभवलेल्या या अवस्थेची आराधना करत राहतो. कारण आमच्या बाबतीत बरेचदा होते ते असे..
शेंडा बुडखा नसलेली एखादी कल्पना मनात रुंजी घालत असते. पण ती कागदावर उतरायची तर तिला मूर्त रूप द्यायला हवं. ते देण्यासाठी आधी तिला काय कोंदण शोभेल याचा विचार करायला हवा. म्हणजे कविता, ललित असं काही नाजूक, की लेख, कथा असं काही भक्कम. किंवा आत्मविश्वासाचं पाकीट बऱ्यापैकी फुगलेले असेल तर कादंबरी, नाटकासारखं काही भारी! एकदा कोंदणाची निवड झाली की मग त्या हिशोबाने जमवाजमव सुरू होते. तुम्ही म्हणाल, विषय आहे, कोंदण ठरलं आहे; आता नुसतं भराभरा लिहून काढायचं. हाय काय अन् नाय काय!
पण नाही ना..! लिहायला सुरुवात होते आणि एक दिवस मध्येच गाडं अडतं. सुरुवातीपासून एकमेकांत छान विणले जाणारे पात्रांचे, कथानकाचे दोरे एकमेकांत गुंतू लागतात. दुभंगू लागतात किंवा चक्क हट्टीपणा करत पोतच बदलू लागतात. अचानक पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अश्या वेळी फिरून पुन्हा मागे जाणे हा एक उपाय असतो. पण आम्ही पडलो हट्टी! मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा अंगात संचारतो. काही केल्या मागे जाणार नाही. यातूनच मार्ग काढून पुढे जाईन तरच खरी! अशी भीष्म प्रतिज्ञा केली जाते आणि मग सुरू होतो एक रोमांचक खेळ!
माझ्या लहानपणी आमच्या घरी नेहमी बुद्धिबळाचा पट एका टेबलावर मांडून ठेवलेला असायचा. ज्या बाजूची चाल असेल त्या बाजूला खूण असायची. जाता येता माझे वडील, भाऊ पुढची चाल खेळायचे. असा हा डाव कित्येक दिवस सुरू असायचा. घरातल्या खेळाडूंच्या या निःपक्षपाती खेळाविषयी मला नेहमी कुतूहल वाटायचे. एका संघाला झुकते माप न देता दोन्ही बाजूंनी खेळणे कसे शक्य आहे असे वाटायचे. पण त्यांचा तो खेळ खूपच रंगायचा कारण तो अत्यंत प्रामाणिकपणे खेळला जायचा.
आज वाटले, लेखनाच्या बाबतीतही असेच आहे की! स्वतःच निर्माण केलेल्या व्यूहरचनेतून मागे न वळता पुढे जायचे तर सर्व संबंधित बाबींचा विचार हा नि:पक्षपातीपणे करता यायला हवा. पळवाट काढणे कितीही सोयीचे वाटले तरी दोन्ही बाजूंना योग्य न्याय मिळेल याची काळजी घेता यायला हवी आणि त्यासाठी स्वतःच स्वतःशी असे प्रामाणिकपणे बुद्धिबळ खेळता यायला हवे. डाव पूर्ण व्हायला कितीही दिवस लागले तरीही! तो आपल्याला अपेक्षित असाच पूर्ण होईल याची खात्री नसली तरीही! आणि पूर्ण झाल्यावर तो कुणाच्या पसंतीस उतरेल की नाही याची शंका मनात असली तरीही! हा झगडा म्हणजेच कदाचित लेखकाचे प्राक्तन असावे. कारण सर्जनाची उर्मी जोवर आहे तोवर तिला प्रामाणिकपणे वाट करून देणे हेच त्याचे कर्तव्य नाही का!
© स्वरा
No comments:
Post a Comment