पुण्यात ज्या भागात आम्ही राहतो तिथे जवळपास ग्रंथालय नाही. जी आहेत तिथे मराठी पुस्तकांचा पुरेसा साठा नाही त्यामुळे वाचन काही काळ मागे पडले होते. पण गेल्या वर्षी विनया चल ग्रंथालय या फिरत्या ग्रंथालयाबद्दल कळले आणि लगेच त्याचे सभासदत्व घेतले. श्री व सौ डोईफोडे पुण्यात हे ग्रंथालय चालवतात. दर महिन्याला आपल्या आवडीची पाच पुस्तके घरपोच वाचायला मिळतात. हा उपक्रम विनया चल ग्रंथालय गेली सात वर्षे चालवत आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याला जाण्याचा योग आला आणि समानशील पुस्तकप्रेमिंना भेटून हरवलेले काहीतरी सापडल्याची जाणीव झाली.
आज कितीही नाही म्हटले तरी काही प्रमाणात आपण सर्वच फोन या तुलनेने नवीन असलेल्या खेळण्याच्या कह्यात जाऊ लागलो आहोत. तो सतत आवाज करतो, गाणी ऐकवतो, रंगीबेरंगी चित्रे, मजेदार व्हिडिओ दाखवतो, आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्याची खबरबात देतो. त्यामुळे या एकाच खेळण्यात आपण तासनतास रमून जातो. पण ते बाजूला ठेवले की लक्षात येते अरे! आपण एवढा वेळ घालवून मिळवले काय? जेमतेम दहा वीस सेकंद पाहून बोटाने चित्र बदलत राहणारे आपण केवळ बाह्यतः रमलेलो असतो. पण आत काही मुरावे इतका वेळ आपण त्यातील एकाही गोष्टीला दिलेला नसतो त्यामुळे बरेचदा मिळकत शून्य असते.
याउलट पुस्तक ना आवाज करते, ना गाणी ऐकवते, ना व्हिडिओ दाखवते ना काही खास खबर देते. मग करते काय? तर एक चांगले पुस्तक एकेका शब्दागणिक आपल्या मनात उतरत असते. बाकी कुणालाही ऐकू न येणारा लेखकाचा आवाज फक्त आपल्या कानांना ऐकू येतो. लेखिकेने वर्णन केलेली दृश्ये फक्त आपल्या डोळ्यांसमोर उलगडू लागतात. समोर साकारू लागलेले ते नवे विश्व कधी विचारांना चालना देते तर कधी भावनेला हात घालते. म्हणाल तर समोर असतात पांढऱ्या कागदावर छापलेले काळे शब्द; मग आपल्या मन:चक्षुंपुढे असे अद्भुत, बहु मितीय काहीतरी उभे करण्याची ताकद त्यांच्यात येते कुठून?
पुस्तकातले शब्द हे लेखकाच्या अनुभवाचा, वाचनाचा, कल्पनेचा आणि कलेचा अर्क किंवा परिपाक असतत. नवनिर्मितीच्या वेणा भोगून ते जन्माला आलेले असतात. लेखक नावाच्या सर्जकाचा अनुभव त्याच्या शब्दांतून प्रवाही तर होतो पण तो पूर्णत्वास जाण्यासाठी वाचक नावाच्या माणसाची गरज असते. वाचणारा वाचकही तितकाच सावध असावा लागतो. त्यामुळे आपण जरी केवळ मनोरंजनासाठी वाचत असलो तरी पुस्तक हे आपल्या मेंदूला कार्यमग्न ठेवत असते. वाचकाचा मेंदू लेखकाच्या शब्दांत आपले स्वतःचे असे काहीतरी मिसळून स्वतःचा नवा अर्थ निर्माण करत असतो. म्हणूनच एकच पुस्तक प्रत्येक वाचकाला निराळे भासू शकते. विचारांना चालना आणि सर्जनाला प्रोत्साहन देणारी ही क्रिया आहे. आणि म्हणूनच फोनवरच्या निष्क्रिय रंजनापेक्षा ती कैक पटींनी श्रेष्ठ आहे.
आजच्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने हेच सांगणे की आपल्या मनाचेही आरोग्य जपुया आणि आपल्या मेंदूला निष्क्रिय रंजनापेक्षा सक्रिय रंजनाकडे वळवायचा प्रयत्न करूया!
© स्वरा
No comments:
Post a Comment