क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित जिगीषा अष्टविनायकचे भूमिका हे नाटक काल पाहिले. पहायचे नक्की असल्यामुळे इतक्या दिवसांत त्यावरील कोणाच्याही प्रतिक्रिया पाहिल्या, वाचल्या नव्हत्या. पण तरीही नाटकाचे होणारे कौतुक मात्र भोवतालच्या हवेत जाणवत होते. आज नाटक पाहताना ते कौतुक सार्थ होते याचा प्रत्यय आला.
या नाटकातून लेखकाने एका जुन्या पण आजही धुमसत असलेल्या विषयाला थेट हात घातला आहे. छुपे किंवा सूचक उल्लेख टाळून दोन दृष्टिकोनांना एकमेकांसमोर बोलते केले आहे. कारण दोन्ही बाजू स्वच्छ उजेडात आल्याखेरीज एकमेकांबद्दलचे गैरसमज आणि अज्ञान दूर होणार कसे!
दोन्ही तितक्याच सच्च्या बाजू जेव्हा एकमेकांसमोर उभ्या राहतात तेव्हा कोण बरोबर कोण चूक ठरवणे अशक्य होऊन बसते. मध्यंतराच्या वेळी हाच अचूक क्षण हे नाटक गाठते आणि एकाच वेळी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी उभे राहते. या प्रवेशातील content आणि crafting साठी लेखक, दिग्दर्शक दोघांनाही hats off! कलाकारही ज्या ताकदीने हा क्षण उंचावर नेऊन ठेवतात, केवळ अप्रतिम!
भूमिकेच्या अभ्यासातून आलेला वैचारिक खुलेपणा बाजूला ठेवायला, त्याच्याशी प्रतारणा करायला तयार न झालेला विवेक, त्यामुळे वास्तवाशी झगडताना एकाकी पडलेली उल्का, आणि त्यांच्या प्रभावातून एक वेगळाच निर्णय घेऊ पाहणारी त्यांची मुलगी कुहू या तिन्ही व्यक्तिरेखा नाटकात खूप छान उभ्या राहतात. समिधा गुरुने अप्रतिम काम केले आहे. सचिन खेडेकर नेहमीप्रमाणे उत्तम! सोमनाथनेही भूमिकेचा खूप छान बाज पकडला आहे. कुहूही सुरेख! गुंड्यामामा दोनच प्रसंगात असले तरी उत्तम साथ देतात. मोलकरीण बाईंचेही काम विशेष उल्लेखनीय.
नाटकाच्या रचनेवर चित्रपट, ओटीटी साठीच्या पटकथालेखनाचा प्रभाव आहे. कमी वेळाचे अनेक प्रवेश, बदलती प्रकाशयोजना असा किंचित fragmented बाज हे नाटक पाहताना जाणवला. प्रमुख विषयासोबतच अनेक समांतर विषयांना लेखकाने स्पर्श केला आहे. विवेक आणि उल्कामधील मोकळे नाते सुरुवातीपासून दिसून येते. मात्र दुसऱ्या अंकातील विवेक आणि उल्कामधील हळव्या प्रसंगात जो भावनिक उच्चांक गाठला जातो तो अचानक आल्यासारखा वाटतो. त्याचा किंचितसा धागादोरा आधी एखाद्या प्रसंगात/ वाक्यात पेरता आला असता तर तो प्रसंग आणखी भिडला असता असे वाटले. अर्थात हे नाटक वैयक्तिक नात्यापेक्षा समाजाच्या दोन घटकांमधील सामाजिक नात्याचे आहे हे विसरून चालणार नाही.
नायक टीव्ही अभिनेता असल्यामुळे त्या क्षेत्राची पार्श्वभूमी सतत दिसत राहते. मालिका विश्वातील कामकाजाची किंचितशी झलक अनुभवलेली असल्यामुळे प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासाठी चॅनलला सतत वाटणारी नाट्ट्याची गरज आणि त्यासाठी केला जाणारा टोकाचा आटापिटा अधिक समजून घेता आला. या नाटकाच्या निमित्ताने राजकारणी आणि चॅनल दोन्हीतले साधर्म्य अचानकपणे समोर आले. आपल्या narrative मध्ये केवळ संघर्षमय, कटू घटना उगाळणे, एकोप्याच्या, निरोगी नात्याच्या आनंदी स्मृतींना फार रेंगाळू न देणे हे आज दोघेही करताना दिसतात. सतत काहीतरी भडक, नाट्यमय देत राहिलो तरच लोकांचा पाठिंबा मिळत राहील, मग ते प्रेक्षक असो किंवा मतदार; हा या दोघांचा जो समज किंवा गैरसमज आहे तो भयावह आहे. कारण सततचे कृत्रिम नाटय मानसिक/ सामाजिक अस्थिरता निर्माण करते आणि अस्थिर व्यक्ती /समाज कधीच प्रगती करत नसतो. समाज किंवा व्यक्ती म्हणून आपण जर खरंच अशा मुद्दाम घडवल्या जाणाऱ्या भडक नाट्याकडे ओढले जात असू तर आपण आपलं आत्मपरीक्षण करणं किती निकडीचं आहे हे लक्षात घ्यायला हवं.
हे आणि असे अनेक विचारांचे धुमारे नाटक पाहिल्यापासून मनात फुटत आहेत. बघणाऱ्यांच्या डोक्यात वर्षानुवर्षे साठलेल्या विचारांना या नाटकाने जणू विरजण (चांगल्या अर्थाने) लावून जागे केले आहे. आता विचारांची घुसळण करण्याचे कष्ट घेतले तर आत्मभानाचे 'नव'नीत वर येईल आणि तेही तावून सुलाखून घेतले तर परस्पर 'स्नेह'भावही नक्कीच चाखायला मिळेल. अन्यथा साठलेले विचार नुसतेच धुमसत राहून खाली जळकी कडवट बेरी तेवढी उरेल.
Thank you for Bhumika
No comments:
Post a Comment