Thursday, 20 March 2025

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त..


'मराठी words remember करायला difficult जातं' हे पुलंनी लिहिलेलं वाक्य शाळा कॉलेजच्या वयात वाचलं तेव्हा ओठांवर हसू आलं होतं. कारण असं इंग्रजाळलेलं मराठी बोलणारा समाज माझ्या आजूबाजूला नव्हता. आणि आपण सोडून इतरांना हसणं नेहमीच सोपं असतं.
हल्ली मात्र चित्र बदललं आहे. संपूर्ण मराठी वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीकडे ही कुठल्या जगातून आली आहे पासून एवढं कठीण मराठी आपल्याला नाही बुवा समजत अशा अलिप्त, खोट्या विनयाने पाहिलं जातं. काल मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांतून सुद्धा मराठी वाक्यात इंग्रजी शब्द घुसवून विनोद निर्मितीचा प्रयत्न जागोजागी केलेला दिसला. पण तो विनोद आता हसू आणत नाही, तो वास्तवाचं दर्शन घडवतो. वाटतं, पुलंच्या त्या वाक्यातून आपण काहीच शिकलो नाही का? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी भांडणारे आपण अखंड मराठी भाषा बोलताना का लाजतो? आपणच नाही बोललो, तर कोण बोलणार?
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा तरी मराठीत देऊया ना!

No comments:

Post a Comment