Friday, 14 August 2015

फू बाई फू

फू बाई फू, फुगडी फू
थकला ग जीव कशी सिरियल पाहू ग सिरियल पाहू?

बाळंतीणी झाल्या, गर्भारशी होतकरू,
तरीसुद्धा जान्हवीचे डोहाळेच सुरु - आता फुगडी फू

लाड बायकोचे श्रीही वहावत गेला,
डोहाळे पुरवी, घरी पाणीपुरी ठेला - आता फुगडी फू

एक वाक्य बोलती त्या चार चार वेळा,
दाबावे वाटतो तेव्हा एकेकीचा गळा - आता फुगडी फू

रहस्य, गैरसमज आणि लपवा छपवी,
गोष्ट लांबवण्यासाठी रोज युक्ती नवनवी - आता फुगडी फू

जान्हवी, इच्छा म्हातारीची, जरा ध्यानी ठेवी,
वाटते बाळ दिसो डोळे मिटण्यापुरवी - आता फुगडी फू 

Tuesday, 11 August 2015

माणुसकी

मुसळधार पावसात सर्रकन पाणी फवारत जात होत्या
लांबलचक गाडया
आणि विरळ झाडाखाली उभं राहून
मी जपत होते माझा कोरडेपणा
पागोळ्यांखाली लावलेली पातेली चुकवत बाहेर येउन
तिने एक छत्री दिली मला … मी अनोळखीच
मग पाऊस वाढतच गेला
त्या छत्रीनेही थोडे भिजवलेच मला
मी…  पावसाच्या माऱ्यापुढे हतबल
मग तिने चक्क आतच बोलावले
धरले माझ्या डोक्यावर ओलसर, गळके छप्पर तिच्या झोपडीचे
'अच्छा! माणुसकी इथे लपून बसली आहे तर… '
चिंब झालेले माझे मन म्हणाले 

Monday, 10 August 2015

जाहिरात

नेमलेलेच काम पण त्याला नाव लोकसेवा
केलेल्या प्रत्येक कामाचा फोटो पेपरमध्ये हवा
योजनांच्या घोषणाच फक्त कानांवर आदळतात
कामकाजापेक्षा महत्वाची झालीये त्याची जाहिरात

समाजसेवेसाठी हल्ली लागतो युनिफोर्म
लोगोवाली टोपी, टी शर्ट चा इंतजाम
कार्यकर्त्यांपेक्षा, मिडीयावालेच दिसतात जोमात
कष्टांपेक्षा महत्वाची झालीये त्यांची जाहिरात

असो स्वच्छता अभियान वा स्वास्थ्यासाठी रेली,
एका चौरस मीटरमध्येच गर्दी करिती सारी
झाडू सोडून, चटकन घेतात माईकच हातात
कामापेक्षा महत्वाची झालीये त्याची जाहिरात

वाढदिवसाच्या शुभेच्छा हि तर सोन्यासारखी संधी 
मोठ्या मोठ्या फ्लेक्स मध्ये शुभेछुकांची गर्दी
श्रद्धांजलीचे दुःखहि झळकते चौकाचौकात
भावनांपेक्षा महत्वाची झालीये त्यांची जाहिरात

छोट्या गोष्टी जगभर पोहोचवतात माध्यमे
तोच मोठा ज्याला प्रसिद्धी बरोब्बर जमे,
कारण करण्यापेक्षा दाखवण्याचा आज आहे प्रघात,
कामापेक्षा महत्वाची झालीये त्याची जाहिरात








Thursday, 6 August 2015

मृत्यू

एक मृत्यू जन्माला घालतो,
अचानक…. एकटेपणा
आणि कुणी शोधत राहते
अस्तित्वाच्या पाऊलखुणा
एक मृत्यू उडवून टाकतो,
छप्परच - दुष्टपणे
आणि हरवतात अकालीच
कुठेतरी बालपणे
एक मृत्यू लावतो ओढ
अज्ञाताच्या वाटेची
पण कुणालाच चुकत नसते,
वाटचाल त्या आधीची
मग म्हणावे त्या मृत्यूला,
तू एक दगड मैलाचा
गाठणं आहे टप्पा मजला
पुढच्या अवघड वळणाचा
त्यांची आठवण, त्यांची शिकवण
गाठी आहे बरंच काही,
कारण काही गोष्टी हिरावून
तू ही घेऊ शकत नाहीस

Saturday, 1 August 2015

एखादाच शब्द

एखादाच शब्द
खेचून आणतो जुने वादळ शमलेले
एखादाच शब्द
हिंदकळवतो तळे काठोकाठ भरलेले
जिभेला तर नसतेच माहित
ताकद त्या एका शब्दाची
कानही बेपर्वा ऐकून घेतात
ती ठिणगी अकल्पित परिणामांची
शब्द काळजात टोचल्यानंतर
जन्म होतो अर्थाचा
आतल्या आत मन करते
मग आकांत व्यर्थाचा
चूक नसते शब्दाची
नसतो दोषही जिभेचा
मनच वेडे पुन्हा अडकते
नस्ता घोळ भावनांचा