Friday, 18 December 2015

आनंदाची श्रीखंडगोळी

रोज पाहतो सारे, 'मोठ्या' सुखाची वाट
थोडे नसते पुरेसे, हवा पेला काठोकाठ
वाट पाहता हरवतो छोटे छोटे क्षण
निराशेने आपलेच मरगळते मन
रोज मागतो का कुणी पुरणपोळी? शोधू छोट्याशा आनंदाची श्रीखंडगोळी

रोज मोठे यश नाही चालून येत,
रोज उठून नाही कुणी डोक्यावर घेत
पण जमते कधी मैफिल कधी गप्पांचे सत्र,
फारा दिवसांनी भेटतो कधी हरवला मित्र
थोडी का होईना, पण खुलते न कळी? शोधू छोट्याशा आनंदाची श्रीखंडगोळी

नृत्य, काव्य, लेख - दाद जाते आपोआप,
बोल चिमणे ऐकून कधी आठवतो बाप
गोळा करून रोजचे असे गंमत काजवे,
अंधारले मन, लक्ख उजळून घ्यावे
सुर्याचाच हट्ट कुणी पुरवेल का अवेळी? शोधू छोट्याशा आनंदाची श्रीखंडगोळी









No comments:

Post a Comment