Thursday, 30 September 2021

४. लिखाणाचा मोदक!

 

रोजच्या प्रभातफेरीत बरेच वेळा विचारांचा पतंग मोकळा सोडलेला असतो. कानात earphones घालून मगच चालू शकणाऱ्या नव्या पिढीच्या लेकीला अनेकदा प्रश्न पडतो, ही नुसती कशी काय चालू शकते! आता तिला काय सांगू, लिखाणासाठी रोज नवे काहीतरी शोधणाऱ्या आम्हा बापड्या लेखकूंना कुठेतरी अडकलेला विचारांचा पतंगच एखादा विषय देऊन जातो.

सध्या नेहमीपेक्षा जरा मोठा विस्तार असलेल्या लेखनप्रकारावर काम सुरु आहे. एरवी माझ्या लेखनातही कोकणस्थी आटोपशीरपणा करण्याची माझी सवय; त्यामुळे हा प्रकार मला जरा जडच जातोय. तरी मजल दरमजल करीत आता मी मध्यावर येऊन ठेपले आहे असे वाटते. वाटले, मोदक करताना एखादी तरबेज गृहिणी जशी खोल, पातळ पारी करून घेते, त्यात पुरेसे सारण भरते, आणि मग तयार हातांनी आवळत आवळत पारी बंद करून मोदकाला छान चाफेकळी नाक काढते तसेच नाही हा हे? कथानकाची पसरट पारी तर जमली आहे, मुद्द्याचे सारणही नेमके भरले आहे. पण आता हा सर्व बाजूंनी पसरलेला आकार हळूहळू आवळत घ्यायला हवा. कोणतेही टोक सुटता कामा नये, आकार बिघडता कामा नये आणि मुख्य म्हणजे आतला मुद्दा खाणाऱ्याच्या गळी चवीसह उतरला पाहिजे.

मोदकाची उपमा सुचली आणि आठवले, अनेक वर्षांपूर्वी स्त्रिया जेव्हा लिहायला लागल्या, तेव्हा ‘बायकांच्या लिखाणाला स्वयंपाकघरातील फोडण्यांचा वास येतो’ अशी हेटाळणी केली गेली होती असे मागे कुठेतरी वाचले होते. येईना का! शेवटी लिहिणारी व्यक्ती ज्या अनुभवविश्वातून येते, तेथील unique असे काहीतरी घेऊन आलेली असते. एखाद्याच्या हाताची चव म्हणा किंवा हातगुण म्हणा तोच तर असतो. आणि तेच त्या कलाकृतीचे वेगळेपण असते. तेव्हा हा हाती घेतलेला मोमो म्हणा, कचोरी, करंजी म्हणा किंवा मोदक लवकर पूर्णत्वास जावो हीच इच्छा!

 

‘भ**’काराचे सूर्यस्नान!

 

सध्या मनोरंजनाच्या माध्यमांचा स्फोट झालेला आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘काहीही’ करण्याची तयारी दिसून येतेय. पण त्यामुळे घरात एखादी वेब सिरीज बघताना जीव आणि रिमोट दोन्हीही मुठीत धरून बसावे लागते. समोर सुरु असलेला प्रसंग कथानकातील वळणांवरून कधी शरीराच्या वळणांवर जाईल किंवा समोरची व्यक्ती अचानक ‘भ**’कार ‘म**’कारावर किवा ‘सु?शिक्षित’ असल्यास ‘फ*’कारावर पोहोचेल याची शाश्वतीच उरलेली नाही.

आपल्यासाठी वेब सिरीजचे माध्यम अजून नवीन आहे. खरंतर गेली कित्येक वर्षे सेन्सॉरच्या, ‘टी आर पी’च्या बंधनात अडकून पडलेल्या मनोरंजन व्यावसायिकांसाठी ही फार मोठी संधी असायला हवी. काही जण त्याचा फायदा घेऊन नेहमीच्या टीव्ही मालिकांमध्ये पाहायला न मिळणारे नवे, कालानुरूप असलेले मनोरंजक विषय हाताळताना दिसतात. निर्मितीमूल्येही उत्तम आहेत. पण अश्या मालिका दुर्दैवाने मोजक्याच आहेत. इतक्या स्वातंत्र्याची सवयच नसल्यामुळे की काय, बहुतांश लोक दिशाहीन मोकाट सुटले आहेत असे वाटते. आत्तापर्यंत जे दाखवायला मिळालेले नाही ते सर्व दाखवण्याची ही एकच संधी असल्यासारखे त्यांचे वागणे दिसते. उठसुठ केलेली शिवीगाळ, पशू पातळीवर आणून ठेवलेली, कथानकाशी कोणताही संबंध नसलेली उत्तान दृश्ये यांनी रसिकांच्या रंगाचा बेरंग होतो हे त्यांच्या गावीही नसावे. अभिव्यक्तीमधील सूचकता हरवते आहे की आपली निर्मिती विक्रीयोग्य करण्यासाठी त्यात बोल्डनेसची भेसळ करण्याचे व्यावसायिक बंधन कलाकारांवर येऊ पाहत आहे मला माहित नाही. पण उत्तमोत्तम साहित्य, नाटक, चित्रपटांवर पोसलेल्या भारतीय प्रेक्षकांची अभिरुची इतकी ढासळली असेल हे मानायला मी तयार नाही. अनेक वेळा चांगला पोत असलेली मालिकाही अशी ठिगळे फॉरवर्ड करून पहावी लागते हे दुर्दैव आहे.

लहानपणी टीव्हीवर परदेशातील दृश्ये पाहताना सूर्यस्नान करणाऱ्या तेथील स्त्री पुरुषांचे तोकडे कपडे, समुद्रकिनाऱ्यावरचा मोकळा वावर पाहून आश्चर्य वाटायचे. पण परदेशात काही वर्षे राहून वर्षाकाठी सात आठ महिन्यांचा कडक हिवाळा अनुभवल्यानंतर तेथील लोकांना असलेले उन्हाळ्याचे अप्रूप आणि शरीराची सूर्यस्नानाची भूक समजली. आज हे आठवले आणि वाटले, कोणतेच बंधन नसलेल्या या नव्या ओटीटी माध्यमाचे अप्रूप म्हणून तर हा ‘फ*’कार, ‘भ**’कारांचा, नग्नतेचा स्फोट नाही ना? बंधमुक्त झाल्याचा तात्कालिक उन्माद असावा कदाचित. तसे असल्यास आशेला अजून जागा आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लख्ख सूर्य कायमचा आकाशात हवा असेल तर हे ‘भ**’काराचे सूर्यस्नान लवकर आटोपते घ्यायला हवे. कारण आपल्या त्वचेच्या आतील संस्कृतीचे अस्तर जळेपर्यंत उन्हात बसणे आपल्याला परवडणारे नाही.

मूड चेंजर! – फक्त एक छोटासा बदल.

 

एखादी छोटीशीच गोष्ट कधी कधी आपल्या मनस्थितीत इतका अनपेक्षित करून जाते ना! नाही, मला अचानक येणारा पाउस, वारा अशी आपल्या हातात नसणारी गोष्ट अपेक्षित नाहीये. आपण एखाद्या ठराविक चक्रात अडकलेले असतो. मग ते घरचं रुटीन असो, कामाचा व्याप असो. गेलं एक दीड वर्ष तर सर्वच जण बहुतेक आपापल्या घरीच आहेत. बाहेर फारसे जाणे नाही, घरी कुणाचे येणे नाही. त्याच खोल्या, तेच फर्निचर, इतकंच काय घरात घालायच्या कपड्यांच्याही त्याच ठराविक जोड्या. वेगळं करून करून करायचं तरी काय! त्यामुळे कंटाळा ही आलटून पालटून सगळ्यांनाच छळणारी गोष्ट झाली आहे. पण आज एक नवी गंमत कळली. आज मी घरात घालायला एक वेगळा ड्रेस काढला; नवीन नाही, जुनाच. ‘बाहेर’ खात्यातून बदली करून त्याला ‘गृह’ खात्यात आणला इतकाच छोटासा बदल. आणि काय सांगू, अचानक मनात उत्साहाने शिरकाव केला की. तुम्ही म्हणाल, छे! काहीतरीच! पण खरंच सांगते, कुणीही न मागता रोजच्या जेवणाच्या ताटात आज एक गोड पदार्थ सजला. आता बदललेल्या मूडचा हा पुरावा तुम्हाला मान्य नसेल तर मग अवघड आहे.

मग आठवलं, हे कदाचित माझ्या स्वभावातच असावं. लहान असताना घरात एकदा आम्ही फार पसारा केला होता. तो आवरण्यासाठी कसलीही हालचाल न करण्यामागे आळस आणि कंटाळा हेच कारण होतं. संध्याकाळी आईने ऑफिसमधून येताना फुलांचा एक सुरेख गुच्छ आणला आणि तो मला फ्लॉवरपॉटमध्ये ठेवायला सांगितला. गुच्छ मस्तच होता. तो शोभेशा फ्लॉवरपॉटमध्ये ठेऊन मी बाहेरच्या खोलीत आले आणि तो टीपॉयवर ठेवला. पण त्यावर होती धूळ. मग ती पुसली. काचेखालच्या खणात अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या. मग लांबून फुलं कशी दिसतायत हे पाहिलं तर आजूबाजूचा पसारा नजरेत खुपला मग तोही आवरला. बाहेरची खोली आवरण्याचे काम विनासायास पार पडले होते; आणि निमित्त होते, नव्याने घरात आलेला एक सुंदर फुलांचा गुच्छ. फक्त एकच छोटासा बदल!

रोजच्या रुटीनचा कंटाळा येणं किंवा अगदी आळस येणं साहजिक आहे. पण मग एखाद्या रडणाऱ्या लहान मुलाला कसं त्याचं लक्ष दुसरीकडे वेधून रमवतात, तसं मनाला काहीतरी नवं दाखवून रामवायचं. भोळ असतं, रमतं ते. लहान असताना खूप लांबच्या प्रवासात एका जागी बसून माझ्या मुली कधी कधी कंटाळून चिडचिड, भांडाभांडी करायला लागत. मग मी त्यांना कंटाळा जायला म्हणून कधी कधी श्रीखंडाच्या दोन गोळ्या देत असे. त्यांना त्यांनीच नाव ठेवले होते, ‘मूड चेंजर’. त्याचा हमखास उपयोग होत असे. तर तात्पर्य काय, एखादा छोटासा बदल आपल्यालाही मूड चेंजर म्हणून करून बघायला हरकत नाही.