Thursday, 30 September 2021

मूड चेंजर! – फक्त एक छोटासा बदल.

 

एखादी छोटीशीच गोष्ट कधी कधी आपल्या मनस्थितीत इतका अनपेक्षित करून जाते ना! नाही, मला अचानक येणारा पाउस, वारा अशी आपल्या हातात नसणारी गोष्ट अपेक्षित नाहीये. आपण एखाद्या ठराविक चक्रात अडकलेले असतो. मग ते घरचं रुटीन असो, कामाचा व्याप असो. गेलं एक दीड वर्ष तर सर्वच जण बहुतेक आपापल्या घरीच आहेत. बाहेर फारसे जाणे नाही, घरी कुणाचे येणे नाही. त्याच खोल्या, तेच फर्निचर, इतकंच काय घरात घालायच्या कपड्यांच्याही त्याच ठराविक जोड्या. वेगळं करून करून करायचं तरी काय! त्यामुळे कंटाळा ही आलटून पालटून सगळ्यांनाच छळणारी गोष्ट झाली आहे. पण आज एक नवी गंमत कळली. आज मी घरात घालायला एक वेगळा ड्रेस काढला; नवीन नाही, जुनाच. ‘बाहेर’ खात्यातून बदली करून त्याला ‘गृह’ खात्यात आणला इतकाच छोटासा बदल. आणि काय सांगू, अचानक मनात उत्साहाने शिरकाव केला की. तुम्ही म्हणाल, छे! काहीतरीच! पण खरंच सांगते, कुणीही न मागता रोजच्या जेवणाच्या ताटात आज एक गोड पदार्थ सजला. आता बदललेल्या मूडचा हा पुरावा तुम्हाला मान्य नसेल तर मग अवघड आहे.

मग आठवलं, हे कदाचित माझ्या स्वभावातच असावं. लहान असताना घरात एकदा आम्ही फार पसारा केला होता. तो आवरण्यासाठी कसलीही हालचाल न करण्यामागे आळस आणि कंटाळा हेच कारण होतं. संध्याकाळी आईने ऑफिसमधून येताना फुलांचा एक सुरेख गुच्छ आणला आणि तो मला फ्लॉवरपॉटमध्ये ठेवायला सांगितला. गुच्छ मस्तच होता. तो शोभेशा फ्लॉवरपॉटमध्ये ठेऊन मी बाहेरच्या खोलीत आले आणि तो टीपॉयवर ठेवला. पण त्यावर होती धूळ. मग ती पुसली. काचेखालच्या खणात अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या. मग लांबून फुलं कशी दिसतायत हे पाहिलं तर आजूबाजूचा पसारा नजरेत खुपला मग तोही आवरला. बाहेरची खोली आवरण्याचे काम विनासायास पार पडले होते; आणि निमित्त होते, नव्याने घरात आलेला एक सुंदर फुलांचा गुच्छ. फक्त एकच छोटासा बदल!

रोजच्या रुटीनचा कंटाळा येणं किंवा अगदी आळस येणं साहजिक आहे. पण मग एखाद्या रडणाऱ्या लहान मुलाला कसं त्याचं लक्ष दुसरीकडे वेधून रमवतात, तसं मनाला काहीतरी नवं दाखवून रामवायचं. भोळ असतं, रमतं ते. लहान असताना खूप लांबच्या प्रवासात एका जागी बसून माझ्या मुली कधी कधी कंटाळून चिडचिड, भांडाभांडी करायला लागत. मग मी त्यांना कंटाळा जायला म्हणून कधी कधी श्रीखंडाच्या दोन गोळ्या देत असे. त्यांना त्यांनीच नाव ठेवले होते, ‘मूड चेंजर’. त्याचा हमखास उपयोग होत असे. तर तात्पर्य काय, एखादा छोटासा बदल आपल्यालाही मूड चेंजर म्हणून करून बघायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment