Thursday, 30 September 2021

‘भ**’काराचे सूर्यस्नान!

 

सध्या मनोरंजनाच्या माध्यमांचा स्फोट झालेला आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘काहीही’ करण्याची तयारी दिसून येतेय. पण त्यामुळे घरात एखादी वेब सिरीज बघताना जीव आणि रिमोट दोन्हीही मुठीत धरून बसावे लागते. समोर सुरु असलेला प्रसंग कथानकातील वळणांवरून कधी शरीराच्या वळणांवर जाईल किंवा समोरची व्यक्ती अचानक ‘भ**’कार ‘म**’कारावर किवा ‘सु?शिक्षित’ असल्यास ‘फ*’कारावर पोहोचेल याची शाश्वतीच उरलेली नाही.

आपल्यासाठी वेब सिरीजचे माध्यम अजून नवीन आहे. खरंतर गेली कित्येक वर्षे सेन्सॉरच्या, ‘टी आर पी’च्या बंधनात अडकून पडलेल्या मनोरंजन व्यावसायिकांसाठी ही फार मोठी संधी असायला हवी. काही जण त्याचा फायदा घेऊन नेहमीच्या टीव्ही मालिकांमध्ये पाहायला न मिळणारे नवे, कालानुरूप असलेले मनोरंजक विषय हाताळताना दिसतात. निर्मितीमूल्येही उत्तम आहेत. पण अश्या मालिका दुर्दैवाने मोजक्याच आहेत. इतक्या स्वातंत्र्याची सवयच नसल्यामुळे की काय, बहुतांश लोक दिशाहीन मोकाट सुटले आहेत असे वाटते. आत्तापर्यंत जे दाखवायला मिळालेले नाही ते सर्व दाखवण्याची ही एकच संधी असल्यासारखे त्यांचे वागणे दिसते. उठसुठ केलेली शिवीगाळ, पशू पातळीवर आणून ठेवलेली, कथानकाशी कोणताही संबंध नसलेली उत्तान दृश्ये यांनी रसिकांच्या रंगाचा बेरंग होतो हे त्यांच्या गावीही नसावे. अभिव्यक्तीमधील सूचकता हरवते आहे की आपली निर्मिती विक्रीयोग्य करण्यासाठी त्यात बोल्डनेसची भेसळ करण्याचे व्यावसायिक बंधन कलाकारांवर येऊ पाहत आहे मला माहित नाही. पण उत्तमोत्तम साहित्य, नाटक, चित्रपटांवर पोसलेल्या भारतीय प्रेक्षकांची अभिरुची इतकी ढासळली असेल हे मानायला मी तयार नाही. अनेक वेळा चांगला पोत असलेली मालिकाही अशी ठिगळे फॉरवर्ड करून पहावी लागते हे दुर्दैव आहे.

लहानपणी टीव्हीवर परदेशातील दृश्ये पाहताना सूर्यस्नान करणाऱ्या तेथील स्त्री पुरुषांचे तोकडे कपडे, समुद्रकिनाऱ्यावरचा मोकळा वावर पाहून आश्चर्य वाटायचे. पण परदेशात काही वर्षे राहून वर्षाकाठी सात आठ महिन्यांचा कडक हिवाळा अनुभवल्यानंतर तेथील लोकांना असलेले उन्हाळ्याचे अप्रूप आणि शरीराची सूर्यस्नानाची भूक समजली. आज हे आठवले आणि वाटले, कोणतेच बंधन नसलेल्या या नव्या ओटीटी माध्यमाचे अप्रूप म्हणून तर हा ‘फ*’कार, ‘भ**’कारांचा, नग्नतेचा स्फोट नाही ना? बंधमुक्त झाल्याचा तात्कालिक उन्माद असावा कदाचित. तसे असल्यास आशेला अजून जागा आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लख्ख सूर्य कायमचा आकाशात हवा असेल तर हे ‘भ**’काराचे सूर्यस्नान लवकर आटोपते घ्यायला हवे. कारण आपल्या त्वचेच्या आतील संस्कृतीचे अस्तर जळेपर्यंत उन्हात बसणे आपल्याला परवडणारे नाही.

No comments:

Post a Comment