रोजच्या प्रभातफेरीत बरेच वेळा विचारांचा पतंग मोकळा सोडलेला असतो. कानात
earphones घालून मगच चालू शकणाऱ्या नव्या पिढीच्या लेकीला अनेकदा प्रश्न पडतो, ही
नुसती कशी काय चालू शकते! आता तिला काय सांगू, लिखाणासाठी रोज नवे काहीतरी
शोधणाऱ्या आम्हा बापड्या लेखकूंना कुठेतरी अडकलेला विचारांचा पतंगच एखादा विषय
देऊन जातो.
सध्या नेहमीपेक्षा जरा मोठा विस्तार असलेल्या लेखनप्रकारावर काम सुरु आहे.
एरवी माझ्या लेखनातही कोकणस्थी आटोपशीरपणा करण्याची माझी सवय; त्यामुळे हा प्रकार
मला जरा जडच जातोय. तरी मजल दरमजल करीत आता मी मध्यावर येऊन ठेपले आहे असे वाटते.
वाटले, मोदक करताना एखादी तरबेज गृहिणी जशी खोल, पातळ पारी करून घेते, त्यात
पुरेसे सारण भरते, आणि मग तयार हातांनी आवळत आवळत पारी बंद करून मोदकाला छान
चाफेकळी नाक काढते तसेच नाही हा हे? कथानकाची पसरट पारी तर जमली आहे, मुद्द्याचे
सारणही नेमके भरले आहे. पण आता हा सर्व बाजूंनी पसरलेला आकार हळूहळू आवळत घ्यायला
हवा. कोणतेही टोक सुटता कामा नये, आकार बिघडता कामा नये आणि मुख्य म्हणजे आतला मुद्दा
खाणाऱ्याच्या गळी चवीसह उतरला पाहिजे.
मोदकाची उपमा सुचली आणि आठवले, अनेक वर्षांपूर्वी स्त्रिया जेव्हा लिहायला
लागल्या, तेव्हा ‘बायकांच्या लिखाणाला स्वयंपाकघरातील फोडण्यांचा वास येतो’ अशी
हेटाळणी केली गेली होती असे मागे कुठेतरी वाचले होते. येईना का! शेवटी लिहिणारी
व्यक्ती ज्या अनुभवविश्वातून येते, तेथील unique असे काहीतरी घेऊन आलेली असते.
एखाद्याच्या हाताची चव म्हणा किंवा हातगुण म्हणा तोच तर असतो. आणि तेच त्या
कलाकृतीचे वेगळेपण असते. तेव्हा हा हाती घेतलेला मोमो म्हणा, कचोरी, करंजी म्हणा
किंवा मोदक लवकर पूर्णत्वास जावो हीच इच्छा!
No comments:
Post a Comment