चारचौघी - एक milestone नाटक!
3 ऑक्टोबर २०२२
आम्ही शाळा कॉलेजात असताना ज्या नाटकाने समाजाला मुळापासून ढवळून टाकले होते, स्वतःशी विचार करायला भाग पाडले होते, वर्तमानपत्रांतून चर्चा घडवल्या होत्या, ज्याचे प्रचंड कौतुक झाले होते असे माझ्या आठवणीतले पहिले नाटक. त्यामुळे ते परत पाहायला मिळणार याचा आनंद अवर्णनीय होता. काल चारचौघी पाहून तो दुणावला.
पडदा उघडतो आणि पुढच्या काही मिनिटांतच प्रेक्षक नाटकाशी घट्ट बांधले जातात. प्रत्येक पात्राच्या पहिल्या दोन चार वाक्यांतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आराखडा समोर उभा राहतो आणि हळूहळू तो अधिक ठळक, अधिक दमदार होऊ लागतो अशी प्रशांत दळवी या सिद्धहस्त लेखकाची तयारी; आणि पात्रांचा वावर, हावभाव किंवा माहीत नाही कशातून पण त्यांचे एकमेकांशी असलेले नाते खुलत जाते, पात्रांची खरीखुरी माणसे बनतात आणि रंगमंचावरच्या त्या घराला घरपण येते ही चंकु सरांच्या दिग्दर्शकाची मातब्बरी! रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे सारख्या अभिनेत्री असल्यावर अभिनयाची नवी नवी क्षितिजे पादाक्रांत होणार ही सार्थ अपेक्षा पूर्ण होतेच होते. इतर पात्रेही आपली कामगिरी चोख बजावतात. आपण एक अजोड कलाकृती पाहत आहोत हे पदोपदी जाणवत असते आणि तरीही आई, विद्या, वैजू आणि विनीच्या आयुष्यात आपण सहजपणे प्रवेश करतो. सुखदुःखाच्या, आशा निराशेच्या तर कधी धाडकन समोर उभ्या ठाकणाऱ्या वास्तवाच्या लाटांत भिजून जातो.
माणूस म्हणून चारचौघीन्सारख्या स्त्रीसुलभ भावभावना असणाऱ्या, आशा अपेक्षा असणाऱ्या पण तरीही आपल्या स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना स्वतंत्र विचार करणाऱ्या आणि घेतलेला निर्णय संपूर्ण जबाबदारीने निभावणाऱ्या या चारचौघी. अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत ठाम! त्यांना साथ देणारे, न देणारे जोडीदार किंवा मित्र यांच्यात घडणाऱ्या अनेक प्रसंगातून हे नाटक आपल्यासमोर सतत प्रश्न उभे करते. काय बरोबर काय चूक यापेक्षा विचारपूर्वक घेतलेल्या प्रत्येक निर्णयाशी, त्याच्या परिणामांची जबाबदारी घेऊन ठाम उभे राहण्यासाठी लागणारी वैचारिक बैठक आणि धैर्य यांचे महत्त्व विशद करते. समाजाच्या दृष्टीने बंडखोर आहात? जरूर असा पण मग त्या बंडखोरीचे परिणामही स्वीकारायची तयारी ठेवा असे जबाबदारीचे भान हे नाटक देते.
चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी या दिग्दर्शक लेखक जोडीची कमाल ही की दोघेजण दुसऱ्याचे कौतुक करताना दिसतात. पण माझ्यासारखी प्रेक्षक मात्र या दोघांच्या आणि साऱ्या कलाकारांच्या एकत्रित कामगिरीमुळे अवाक होऊन गेलेली असते. शंभर नंबरी सोनं आणि त्याला कुशल सोनाराने दिलेले तास आणि झळाळी यातून घडणारा दागिना जसा आपण वेगप्पवेगळा काढू शकत नाही तशीच ही कलाकृती. मुक्ता बर्वे ची विद्या अप्रतिम. कधीतरी हातून काहीतरी असं लिहून व्हावं ज्याला या साऱ्यांचा परीस स्पर्श लाभावा हे नेहमीचं हावरट स्वप्न!
आज ३१ वर्षांनंतरही यातील विषय जुना झालेला नाही. शुभारंभापासून प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल करत एक नवा इतिहास हे नाटक घडवत आहे. आणि त्याचे साक्षीदार होण्याची संधी आपल्या हातात आहे. मराठी नाटकांच्या इतिहासात ज्याचा कायम उल्लेख करावा लागेल असे आणि आपल्यासाठी पुन्हा रंगमंचावर आलेले हे नाटक नक्की पहा.
No comments:
Post a Comment