# ललित
माझे work from home वाढू लागले तसे स्वयंपाकाला 'आता बाई लाव..' चे सल्लेही वाढू लागले. शिवाय कामासाठी काही दिवस मला बाहेरगावी जावे लागणार होते त्यामुळे हा सल्ला एकदाचा मी स्वीकारला. आजवरच्या आयुष्यात स्वयंपाकाला बाई हा प्रकार माहेरी किंवा सासरीही कधी पाहिला नव्हता त्यामुळे माझ्यासाठी ही नवलाईची गोष्ट होती.
'उद्या ती येणार.. उद्या ती येणार ' आदल्या रात्री तिच्यासाठी नेहमीपेक्षा जास्त लक्ष घालून मी गॅस, ओटा स्वच्छ केला. (कितीही झालं तरी 'दुसरीच्या' नजरेला आपलं घर स्वच्छ दिसायला हवं हा नको तेवढा अट्टाहास बायकांना असतोच नाहीतरी, मग ती पाहुणी असो की कामवाली) पावणेसातला ती येणार म्हटल्यावर साडेसहाला उठून दूध तापवणे, चहा करणे.. (हो! उगीच तिच्या मध्येमध्ये नको ना!) भाजी फ्रिजमधून काढून ठेवणे, तिला लागणारी भांडी ओट्यावर ठेवणे इ. पूर्वतयारी मी करून ठेवली. पण तिने पावणेसात सांगून सात वाजवले. तेवढ्या पंधरा मिनिटात ' छे! आधी माहीत असतं तर आणखी थोडा वेळ झोप झाली असती' हा विचार किमान तीस वेळा तरी माझ्या मनात येऊन गेला असेल. (मी वेळेची अति काटेकोर आहे आणि मला झोप अंमळ जास्तच प्रिय आहे हा आरोप मी नाकारत नाहीच्चे)
ती आली. माझा रोजचा तवा काही तिला पसंत पडेना. मी तत्परतेने घरातले लोखंडाचा, नॉन स्टिकचा, हॅण्डलवाला असे तीन तवे तिच्यासमोर ठेवले. शिवाय माळ्यावर एक मातीचा (हो! एका प्रदर्शनातून तो घेऊन मी माती खाल्ली आहे) आणि खाली एक ऑमलेटचा असे आणखी ऑप्शन तिच्यासमोर ठेवले. शेवटी एका सगळ्यात लहान तव्यावर तिने compromise केला. हुश्श!
भाजीसाठी तिखट, मीठ, गूळ, खोबरे वगैरेचे प्रमाण दाखवून दिले. रोजचे काम करताना कोणी बघत उभे असेल तर माझ्याकडून हमखास काहीतरी गडबड होते. तिला असा काही त्रास नको म्हणून (समंजसपणे) मी बाहेरच्या खोलीत आले. पण तिला अशी काही performance anxiety नसावी. वेळोवेळी भाजी कशी चिरायची, फोडी किती लहान, मोठ्या, लसूण, कांदा, टोमॅटो हवा, नको इ. प्रश्नांची उत्तरे द्यायला मला सात वेळा आतबाहेर करावे लागले. त्यामुळे बाईच्या कामाच्या वेळात नुसतं बसण्यापेक्षा थोडाफार व्यायाम करावा हा सद्विचार पहिल्या दिवशी तरी प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
भाजी फोडणीला टाकून तिने पोळपाटाखाली घालायला एक टॉवेल (पोळपाट हलू नये म्हणून) आणि पोळ्यांसाठी सुती कपडा मागितला. मला या दोन्ही गोष्टी लागत नसल्याने त्या पूर्वतयारीत नव्हत्या. (पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी नेमका तयारीत नसलेला बुक्का किंवा कापूस वस्त्र मागावे त्याची आठवण झाली) उद्यापासून त्या काढून ठेवायची नोंद मनात करून मी पुन्हा पद्मासनातून उठले तेव्हा मीच इथे वरकामाला आहे की काय अशी भावना मनात आली होती.
आज लेकीला लवकर कॉलेज असल्याने एकीकडे तिला उठवण्याचा कार्यक्रम सुरू होताच. ती आपल्या पायावर उभी राहून बाथरूम मध्ये शिरली आणि नाश्त्याला उपमा करायला म्हणून मी मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. एका गॅसवर भाजी, दुसऱ्यावर पोळ्या आणि गॅस समोर पोळ्यांचा पसारा होता. दहा वर्षांपूर्वी मी तीन बर्नरची शेगडी घेण्याचे चातुर्य दाखवल्याबद्दल स्वतःचेच अभिनंदन केले आणि तिसऱ्या गॅसवर कढई ठेवली. एका बाजूला थोडी जागा करून माझा कटिंग बोर्ड तिथे बसवला आणि कांदा चिरायला सुरुवात केली. पोळी भाजी उरकून ती बाहेर पडली. माझा उपमाही बनला. पण घड्याळ मात्र रोजच्यापेक्षा उशीरच झाल्याचे दाखवत होते.
कित्येक वर्ष आपण स्वतः करत असलेले काम एखाद दिवस दुसऱ्या कुणी केले तर त्यात आपण शंभर खोडी काढू शकतो. पोळ्या जाड राहिल्या, भाजी तिखट वाटली असे मुद्दे होतेच पण त्याहीपेक्षा मला लवकर उठून बसावं लागलं आणि वेळ काही वाचला नाही हे जरा जास्तच मनाला लागलं होतं. पण हळूहळू सगळं सुरळीत किंवा सवयीचं होईल अशी मी मनाची समजूत घातली. कारण पुढचे काही दिवस मला तिची गरज निश्चितच लागणार होती. शिवाय तिच्या जीवावर 'आता मी पोळी बंद करून रोज भाकरी खाणार आहे' या इकडच्या निश्चयाची परीक्षाही मला घेता येणार होती. रोजची गरज नसली तरी वेळेला उपलब्ध असणे हा तिचा सर्वात महत्त्वाचा गुण असणार होता आणि त्याच गुणाने इतर बारीक सारीक मुद्द्यांवर मात केली.
काहीजणी करणाऱ्या असतात तर काही करून घेणाऱ्या. मी पहिल्या प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाण्याची कधीच शक्यता नाही असा घरचाच अहेर मला या बायांच्या बाबतीत अनेक वेळा मिळाला आहे. कारण त्यांना जास्तीचे काम सांगण्यापेक्षा सुटी देणे मला सहज जमते. त्यांचे काम सुलभ व्हावे याकरता मी झटत राहते. मग माझ्या लक्षात येतं, व्यवस्थापकीय स्किल ही एक वेगळी कला आहे. ती साध्य करणे सोपे नाही. कधी जमेल कोण जाणे!
उद्या महाशिवरात्र, उपासाचा दिवस. आज बाहेर पडताना उद्या आमचा उपास असतो, पोळीभाजी नको, तुला सुट्टी असे तिला सांगितले. (उपासाची भाजी करून घ्यायची न असा घरचा अहेर मिळालाच!) सुटी मिळाल्याने तिला आनंद झाला की नाही माहीत नाही पण उद्या सकाळी मनसोक्त झोप काढायच्या कल्पनेने मलाच गुदगुल्या झाल्या तेव्हा लक्षात आले, दिल्ली अभी बहुत दूर है.