या वर्षी जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी लंडन westend मधील थिएटर रॉयल ड्रुवरी लेन नाट्यगृहामध्ये Frozen हे musical बघायची संधी मिळाली. पूर्वी काही वर्षे इंग्लंडमध्ये राहूनही तेथील थिएटर अनुभवण्याचा योग आला नव्हता. त्यामुळे या सुटीत तो साधायचाच असे ठरवले आणि उपलब्ध दिवस आणि तिकिटे यांचा मेळ जमवला.
आपल्या आणि तिथल्या नाटकांत एक मुख्य फरक म्हणजे तेथील नाटके वर्षानुवर्षे एकाच नाट्यगृहात सुरू असतात. आपल्याप्रमाणे नाटकाचा संच गावोगावी फिरत नाही तर अनेक ठिकाणचा प्रेक्षक नाटक पाहायला खास म्हणून त्या त्या नाट्यगृहात येतो. देश लहान आहे म्हणून कदाचित हे जमत असावे. त्यात लंडन हे देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे केंद्रस्थान. त्यामुळे पहिल्यापासून हीच पद्धत तेथील प्रेक्षकांच्या अंगवळणी पडली असावी. लंडनचा Westend हा भाग तेथील नाट्यगृहांसाठी म्हणूनच प्रसिद्ध आहे. प्रत्येक नाटकाचे रोज एक किंवा दोन प्रयोग ठरलेले. त्यामुळे प्रेक्षक आपल्या सोयीने महिना महिना आधीपासून तिकिटांचे booking करतात.
दुपारी दोन वाजता आम्ही थिएटरला पोहोचलो तेव्हा अडीचच्या प्रयोगासाठी आलेल्या प्रेक्षकांची बाहेर रांग लागली होती. बहुतेक advance booking वाले होते. आयत्या वेळी तिकीट काढणारे आम्ही मोजकेच. मुलींना रांगेत उभं करून मी आत जाऊन तिकीट काढून आले. पुढच्या सीट आधीच भरलेल्या आणि तिकिटे चांगलीच महाग त्यामुळे आमची तिकिटे बाल्कनीत पार मागे होती. बाहेर काहीतरी खाऊन मग नाटकाला बसण्याचा प्लॅन आधीच जमलेली गर्दी पाहून डळमळला आणि आम्ही आमच्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. प्रेक्षकांत नाटकातील पात्रांचे पोशाख घालून नटून थटून उत्साहाने आलेली लहान मुलं भरपूर होती. प्रेक्षागृहातील खुर्च्यांच्या रांगा असलेल्या पायऱ्या बऱ्याच उंच होत्या त्यामुळे आमच्या जागेवरून स्टेज पार खाली दिसत होते. आम्हाला नाटक कितपत दिसेल याची चिंता वाटू लागली. पण नाटक सुरू झाले आणि साऱ्या चिंता आम्ही विसरलो.
एल्सा आणि आना या दोन राजकन्यांची ही गोष्ट. थोरलीच्या हातात तिला न सांभाळता येणारी जादू; जिच्यामुळे एका क्षणी ती आपल्या धाकट्या बहिणीला चुकून इजा करते. तो प्रसंग इतका उत्तम साकार झाला की अंगावर काटा आला. विजेचा लोळ यावा तसा झगझगीत प्रकाश आणि दुसऱ्याच क्षणी बेशुद्ध होऊन पडलेली आना. यानंतर असे अनेक प्रसंग आले जेव्हा मी आणि मुली अवाक होऊन, शब्दही न बोलता एकमेकींकडे नुसत्या टकमका बघत होतो. Musical असल्याने गाणी होती आणि नृत्यही. नृत्याचा वापर कधी केवळ पार्श्वभूमी म्हणून तर कधी कथानकाचा तोल आणि वेग अधोरेखित करणारा स्वतंत्र घटक म्हणून फार सुंदर केलेला दिसला. पण विशेष नजरेत भरले ते नेपथ्य आणि लाईट्सचा केलेला सुरेख वापर. नेपथ्याचे तीन चार पदर रंगमंचाची खोली कमी जास्त करत होते. कधी राजवाडा तर कधी जंगल, कधी अचानक भुईतून साकारणारे उन्हाळी दृश्य तर कधी स्टेजवरून सरकत जाणारा लांबच लांब बर्फाळ पूल. केवळ अप्रतिम!
स्वेन हा रेनडिअर आणि ओलाफ हा snow man ही दोन माणूस नसलेली पात्र. चार पायांचा, केवळ शारीरिक हालचालींतून बोलणारा रेनडिअर सहज व सुरेख वावरत होता. त्याच्या वेशाच्या आत एक माणूस होता की दोन याचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही. ओलाफ म्हणजे चक्क कळसूत्री बाहुला होता आणि त्याला हाताळणारा कलाकारही त्याच्यासोबत हुंदडत, बागडत मजेत गाणी गात होता. तांत्रिक दृष्ट्या तो बाहुला इतका चोख होता की तो वितळून कमी झाला, त्याचे दोन भागही झाले पण ते जोडल्यावर तो पुन्हा जिवंतही झाला. आणि हे सारे कलात्मकतेपेक्षा तंत्र जड न होऊ देता. तंत्र कलेला आणखी उंचीवर कसे नेऊ शकते याचे ते एक उत्तम उदाहरण होते.
मध्यांतर झाले आणि आम्हाला पुन्हा भुकेची जाणीव झाली. इथे नाटकाच्या मध्यांतरातील गरम वड्यांना चटावलेल्या आमच्या जिभांना कुठे काही खाऊ सापडेना. सगळ्या स्टॉल्सवर लहानग्यांसाठी प्लॅस्टिकच्या आणि मोठ्यांसाठी काचेच्या रंगीबेरंगी बाटल्या व उंच काचेचे पेले. या इंग्रजांना थिएटरमध्ये केवळ पेयांची आठवण होते, चमचमीत खाण्याची नाही हाही एक सांस्कृतिक फरक टिपून घेऊन आम्ही जागेवर येऊन बसलो.
कथानक पुढे सरकत होते तसा साकार होणारा एक एक प्रसंग विस्मयचकित करत होता. एल्साची जादू, तिने बनवलेली हिमसृष्टि, वन्य जमातीचा गमतीशीर नाच, आना आणि क्रिस्टोफचा बर्फाच्या पुलावरचा मजेदार घसरडा प्रवास सगळं सगळं बघण्यात प्रेक्षक रंगून गेले होते. टाळ्या वाजत होत्या. आणखी एक उल्लेखनीय प्रसंग म्हणजे शेवटी आना गोठत जाते तेव्हाचा. पांढरे करडे कपडे घातलेले नर्तक नृत्य करता करता विशिष्ट पोज घेऊन जवळ आले; एकमेकांना असे जोडले गेले की त्यांची एकत्रित अशी बर्फाची शिळा तयार झाली. गोठत चाललेली, कष्टाने हालचाली करणारी तशाच कपड्यातील आना त्यांना येऊन चिकटली आणि क्षणात निश्चल झाली. त्या बर्फाच्या शिळेत मिसळून गेली. ते पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले इतका तो सीन परिणामकारक होता. Frozen चित्रपट सुंदर आहेच पण त्याचे हे नाट्यरूपांतर अधिक जिवंत होते हे नक्की!
नाटक संपवून आम्ही बाहेर आलो तेव्हा काहीतरी नवे अविस्मरणीय पाहिल्याचे समाधान आणि तृप्तीची भावना मनात होती. तिकिटांचा खर्च आता अवाजवी वाटत नव्हता कारण घेतलेला अनुभव हा शंभर टक्के पैसा वसूल होता. आडवारीसुध्दा भरगच्च भरलेले प्रेक्षागृह पाहून लोकांना असलेली कलेबद्दलची आस्था आणि आदर जाणवला होती. अभिनय, संगीत, नेपथ्य, वेशभूषा, लाइट्स आणि तंत्र या साऱ्यांचे उत्तम टीम वर्क कायम स्मरणात राहील याची खात्री वाटत होती.
रंगभूमीची उज्वल परंपरा जशी तिकडे आहे तशी आपल्याकडेही आहे. उत्तम निर्मिती आपल्याकडेही होते. पण अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कलेला आणखी उंचीवर कसे नेता येते ते तिथे पाहायला मिळाले. त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो नसतानाही आपल्याकडील कलावंत आपली सर्जनशीलता पणाला लावून कलात्मक मार्ग शोधतातच. पण तो मिळाला तर..! त्यासाठी गरज आहे ती चाणाक्ष निर्माते, जबाबदार कलाकार आणि जाणकार प्रेक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांची; नाटक ही जिवंत कला असल्याने स्क्रीनपेक्षा अधिक demanding असल्याचे वास्तव ओळखण्याची. खरंच हे व्हायला हवे कारण त्यातून मिळणारा आनंद आणि अनुभव हा अधिक थरारक असेल याबद्दल शंका नाही.
No comments:
Post a Comment