Sunday, 14 April 2024

गालिब - एक अनवट नाटक

आज गालिब पाहिलं. चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित अर्थपूर्ण, तरल आणि जमून आलेलं नाटक. लेखकाचे भावविश्व, वेळोवेळी होणारी मानसिक कोंडी, त्याचे भारलेपण, अस्वस्थता आणि त्यातूनच जन्म घेणारा निर्मितीचा अनावर क्षण यांचा अनुभव जिवंत करणारं दर्जेदार लेखन हा या नाटकाचा आत्मा आहे. कलाकाराची सर्जनशीलता, भोवतालची परिस्थिती आणि मनातील भावभावना यांचा परस्पर संबंध किंवा कार्यकारणभाव नाटक पाहताना सतत जाणवत राहतो.

एक प्रथितयश कादंबरीकार मानव किर्लोस्कर, त्याच्या दोन मुली आणि एक विद्यार्थी जो यशस्वी कादंबरीकार म्हणून उदयाला आलेला आहे अशा चार पात्रांमध्ये नाटक घडते. वडील आणि धाकटी मुलगी इला यांचे नाते फार मोहकपणे व्यक्त झाले आहे. याचे श्रेय लेखकाने उभ्या केलेल्या सशक्त व्यक्तिरेखांना आहेच पण गौतमी देशपांडे आणि गुरुराज अवधानी या अभिनेत्यांनाही आहे. विशेषतः गौतमीने या भूमिकेचे सोने केले आहे. बहिणी बहिणींचे आपसातील कधी प्रेमळ तर कधी भांडाभांडीचे नातेही अगदी वास्तव आणि नैसर्गिक. विराजसचा अंगदही सहज आणि सुरेख. पडदा उघडताच दृष्टीस पडते ते जुन्या अव्यवस्थित, भरपूर पुस्तके, अडगळ भरलेल्या घराचे कथेला न्याय देणारे वास्तववादी नेपथ्य. त्याचा आणि कारंजाचा वापरही फार छान. वेशभूषा, खास करून इलाचा कपडेपटही उल्लेखनीय. शिव्या किंवा सिगारेटचा वापर गरजेपेक्षा थोडा जास्त वाटतो पण एकूण नाटकाच्या पार्श्वभूमीवर तो क्षम्य ठरतो.
सतत घडणाऱ्या नाट्यमय घटना नाहीत, ओढून ताणून आणलेला विनोद नाही. विषय कौटुंबिक वा रोजच्या जगण्यातला नाही. तरी जाणकार प्रेक्षक नाटकात रंगून जातो तो त्यातील वेगळेपणा आणि दर्जामुळे. प्रेक्षक ठराविकच गोष्टी स्वीकारतात हा दृष्टिकोन बाजूला ठेवून या सर्वार्थाने वेगळ्या नाटकाची निर्मिती केल्याबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन आणि एक प्रेक्षक या नात्याने आभारही.

4 march 24

No comments:

Post a Comment