Sunday, 14 April 2024

The play is the thing...

शेक्सपियरच्या सुप्रसिध्द हॅम्लेट या नाटकातील हे तितकेच सुप्रसिध्द वाक्य! आज तिसरी घंटा या मधुकर तोरडमल यांच्या आत्मचरित्रात यावरचे विवेचन वाचनात आले. ते माझ्या कल्पनेपेक्षा थोडे वेगळे होते. मी जेव्हा हॅम्लेट पाहिले तेव्हा या वाक्याचा संदर्भ - मंचावर घडवलेले नाटक राजाच्या सद्सद्विवेकबुध्दीला साद घालेल आणि त्याचे प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर उमटून त्याच्या मनातला चोर पकडला जाईल ही कल्पना हॅम्लेटला सुचली असा घेतला होता. म्हणून The play is the thing. (कर्ज चित्रपटात ऋषी कपूरने सिमी गरेवालला पकडण्यासाठी अशीच काहीशी आयडिया वापरल्याचे आठवते.)

हॅम्लेट आपल्या या कल्पनेला पाठपुरावा करतो आणि नटांना ज्या सूचना देतो (Speak the speech, I pray you, as I pronounced it to you) त्या एका दिग्दर्शकाच्या नटांना केलेल्या सूचना आहेत असे तोरडमल म्हणतात. नाटक पाहताना लेखक किंवा अभिनेते शब्द किंवा दृश्य स्वरूपात आपल्यासमोर असतात. पण म्हणून केवळ त्यांच्यामुळे नाटक उभे राहू शकत नाही. लेखकाचे म्हणणे समोरच्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचावे यासाठी ते कसे मांडावे, आक्रस्ताळेपणाने की संयमितपणे, अभिनय नैसर्गिक हवा की अभिनिवेशी इ. अनेक निर्णय दिग्दर्शक घेत असतो. एक चुकीचा निर्णय अर्थाचा अनर्थ किंवा रसभंग करू शकतो. त्यामुळे नाटकात दिग्दर्शक अत्यंत महत्त्वाचा. म्हणूनच नाटक हे केवळ लेखकाचे वा नटांचे नसून ते एक teamwork असल्याचे तोरडमल अधोरेखित करतात.
हे वाचले आणि मला चक्क आठवले गीतरामायण. तुम्ही म्हणाल गीतरामायण आणि नाटकाचा काय संबंध! गीतरामायणातील गा बाळांनो श्रीरामायण हे गाणे तुम्ही ऐकले असेल. वाल्मिकिंच्या आश्रमात वाढणारे श्रीरामपुत्र लव आणि कुश आता कुमारवयीन झाले आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन रामचरित्राचे गायन करावे यासाठी वाल्मिकी ऋषी त्यांना या गीतातून अनेक सूचना देतात. गाताना घाई करू नका, क्रम लक्षात घ्या, आवाजात गोडवा असू द्या, मुद्रा संयत ठेवा, रोज थोडे थोडे गाऊन पुरे करा अशा या सूचना. हे आठवले आणि वाटले याही दिग्दर्शकाच्याच सूचना आहेत की. गावोगावी जाऊन रामचरित गायचे तर ते तितक्याच तन्मयतेने, पूर्णार्थाने समोरच्यापर्यंत पोहोचायला हवे. ते ऐकल्यावर लोकांच्या मनात जो भाव उमटणे अपेक्षित आहे त्यासाठी ते विशिष्ट पद्धतीनेच सादर व्हायला हवे. मग त्यासाठी अशा डोळस सूचना हव्यातच.
माझ्याप्रमाणेच पूर्वी अनेकांच्या मनात दिग्दर्शक नेमके करतो काय असा प्रश्न येऊन गेला असेल. लेखक, नट, ध्वनी, प्रकाश, नेपथ्य वाल्यांना आपले काम physically दाखवता येते. पण दिग्दर्शन ही मात्र एक अमूर्त कला आहे नाही का? नाटक असो, गायन असो वा आणखी काही; ते अनुभवणाऱ्या लोकांच्या मनात अपेक्षित भाव, प्रतिक्रिया उमटायची असेल तर योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे. अशा मार्गदर्शनाचे किंवा दिग्दर्शनाचे महत्व शेक्सपियर आणि आपले गदिमा दोघांनी किती सहजपणे मांडले आहे नाही का!

26 Dec 2023

No comments:

Post a Comment