Facebo
ती आता चटकन पुढे होते फोन सरसावून.
फोटो, बुकिंग, स्कॅनिंग, एडिटिंग!
ती करून टाकते हातातले काम तिच्या तरुण चपळाईने, माझ्यापेक्षा अर्ध्या वेळात.
टकमक फिरत राहते तिची निकोप नजर
ऑनलाईन मेनू, बारीक प्रिंट, मॅपवरचे नवे रस्ते!
ती संपवून टाकते शोध; बराच वेळ चाचपडल्यावर धीर सोडू पाहणाऱ्या माझा.
तेव्हा अनावर होतो, सारी डोळस कामे तिच्यावर सोपवण्याचा मोह.
ती आता चटकन पुढे करते हात.
माझी पिशवी घेताना, रस्ता ओलांडताना, मी येतेय ना पाहताना.
ती बदलू पाहते आमच्या भूमिका, तिच्यात नव्याने उमलणाऱ्या आत्मविश्वासाच्या बळावर.
पण तरीही कर्तेपण सोडून कर्म म्हणून लेकीच्या पाठुंगळी बसणे मंजूर नसते, माझ्यातल्या आईला.
मी मग झटकून टाकते मरगळ
आळसाची, थकव्याची, हुरहुरीची.
तिच्या डोक्यावर टपली मारून म्हणते, 'आली मोठी!'
तेव्हा तिच्या डोळ्यांत चमकलेले निरागस हवेहवेसे हसू भुर्रकन उडून जाण्यापूर्वी आणखी एक सुखाचा क्षण सेव्ह झालेला असतो मदरहुड मेमरीमध्ये!
© स्वरा मोकाशी
No comments:
Post a Comment