Thursday, 20 March 2025

माध्यमांच्या आरोग्यासाठी टीकेच्या इंजेक्शनपेक्षा अनुल्लेखाचे पथ्य जास्त उपयुक्त!


आजकाल परिस्थिती अशी आहे, की प्रसिद्धी हा दर्जाचा निकष बनत चाललेला दिसतो. समाज माध्यमांच्या जगात ज्याच्या मागचा जथा मोठा, तो मोठा. मग तो फोटो असो, रिल असो किंवा लेखन असो. इथली प्रसिद्धीमापनाची यंत्रणा तांत्रिक असल्यामुळे तिला केवळ आकडे समजतात, अक्षरे किंवा भाषा नाही. त्यामुळे एखाद्याच्या वक्तव्याला मिळालेला प्रतिसाद फक्त आकड्यांमध्ये मोजला जात असावा. एवढेच नाही, तर शिव्या आणि ओव्या एकाच पारड्यात टाकल्या जात असाव्यात. त्याशिवाय प्रसिद्धी एवढेच कर्तृत्व असलेल्या प्रसिद्ध लोकांचे इतके अमाप पीक आले नसते.
उदाहरण द्यायचे झाले तर, अ च्या सवंग post ला मिळालेला एकूण प्रतिसाद हा अमुक शिव्या अधिक अमुक कौतुकफुले बरोबर तमुक एकक प्रतिसाद असा मोजला जातो.
पण त्याच वेळी ब चे एखादे वक्तव्य तितकीच कौतुकफुले मिळून शिव्या न पडल्याने दर्जेदार असूनही प्रतिसाद एककांच्या संख्येत अ पेक्षा पिछाडीवर गेलेले आढळते. ही मापनातली चूक म्हणायची, यंत्रणेचा दोष की प्रतिसाद देणाऱ्यांचा भोळेपणा व अज्ञान? मग आपण काय करायचे?
आपल्याला आवडलेल्या गोष्टींना अधिक लोकप्रियता मिळावी आणि न आवडलेल्या किंवा हीन, टाकाऊ वाटणाऱ्या गोष्टींना आळा घातला जावा असं वाटत असेल तर एक काम करायला हवे. आवडलेल्या गोष्टींचे भरपूर कौतुक करायचे, त्यांना like करायचे, त्यावर comment करायच्या पण इतर दर्जाहीन गोष्टींना अनुल्लेखाने मारायचे. कारण आपण केलेली टीकात्मक comment सुध्दा त्या गोष्टींना अधिक प्रसिद्धी मिळवून देणार असते हे निश्चित!

No comments:

Post a Comment