आत्मपॅम्पलेट या नावाचा मराठी चित्रपट येतोय तोही परेश मोकाशी यांचा हे ऐकल्यावर - हे काय विचित्र नाव आणि पाहायलाच हवा हे दोन्ही विचार एकदमच मनात आले. मागच्या आठवड्यात काही कारणाने जमलं नाही आणि रविवारी bookmyshow वर बघते तर सोमवार नंतर जवळच्या थिएटरमध्ये एकही शो नाही. एकदम खट्टू व्हायला झाले. मराठी चित्रपट नाहीच ठेवत हे लोक जास्त दिवस इथपासून आता OTT वर कधी येईल इथपर्यंत अनेक विचार मनात येऊन गेले. परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या जोडीचे
वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रत्येक वेळी खूप आवडलेले, त्यामुळे काल सहज चाळा म्हणून पुन्हा bookmyshow वर पाहिले तर काय, चक्क वाढवलेले नवे शो दिसले. आज सर्वांना दसऱ्याची सुटी आणि वेळही जुळली. लगेच तिकिटे बुक केली, संपूर्ण कुटुंबाची. (मुली जरा साशंक होत्या पण थोडा आग्रह आणि त्यांना आवडलेल्या याच दोघांच्या पूर्वीच्या सिनेमांचे दाखले दिल्यावर त्या तयार झाल्या.) आज चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर दोघींच्या चेहऱ्यावर एक मस्त चित्रपट पाहिल्याचा आनंद आणि डोळ्यांत आईने चांगली निवड केल्याची कबुली पाहून मलाच तरंगायला झालं.
चित्रपट खरोखरच उत्तम आहे. काही ओळखीचे चेहरे वगळता सर्व नवे चेहरे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे इतका सहज सुरेख अभिनय करतात की क्या बात है. सुरुवात होते ती परेश मोकाशींच्या आवाजातील आशिष या मुख्य पात्राच्या तऱ्हेवाईक निवेदनाने. आत्म पॅम्पलेट नावाच्या अर्थाचा उलगडाही लगेचच होतो. आशिषचा आवाज संपूर्ण चित्रपटभर आपल्याला सोबत करतो. आवाजातील मजेशीर चढ उतार, informal बोली वाक्ये, त्यातून बरोब्बर पोहोचणाऱ्या भावना आणि जोडीला समोर दिसणारी गमतीशीर पणे चित्रित केलेली दृश्ये प्रेक्षकांशी चटकन इतकी जवळीक साधतात की सुरुवातीपासूनच प्रेक्षक मोकळ्या मनाने सरसावून बसतो. हळूहळू खसखस पिकते, मग हसू येऊ लागते. लहानग्या आशिष आणि सृष्टीच्या गोष्टीत सगळे रमून जातात.
कोणाच्याही आयुष्यात घडू शकतील अशा हलक्या फुलक्या प्रसंगातून समोरची लहानमोठी पात्रे अगदी आपलीशी होतात आणि मग अचानक एक नवा मुद्दा समोर येऊन ठाकतो. वाटतं, अच्छा! असा विषय आहे का! पण गंभीर, विवाद्य होऊ शकेल असा तो गुंतागुंतीचा मुद्दाही अगदी सहजपणे बाजूला पडतो. कारण लहान मुलांच्या निरागस विश्वात त्याला जागाच नसते. सर्वजण जर असाच साधा सोपा विचार करायला लागले तर कित्ती छान होईल असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.
आशिष आणि सृष्टीची गोष्ट नवी नवी वळणे घेत पुढे सरकत राहते. काळाचा संदर्भ देणाऱ्या घटना, मागे क्षणभरच वाजणारी विशिष्ट गाणी, पेप्सी कोला, बर्फाचा गोळा, पेरू, चिंचा, शाळेतल्या विविध स्पर्धा यांचे काही सेकंदाचे शॉट्स उत्कृष्ट पार्श्वसंगीताप्रमाणे गोष्टीला उत्तम साथ करतात. नवी नाही तर जुनीच अधिक जवळची ओळख देतात. वाद, दुःखद घटना, निराशा यांचे स्तोम न माजवता सकारात्मकतेचा चमकदार सुखद धागा प्रत्येक नव्या प्रसंगातून आपल्याला अलगद पुढे नेतो. चित्रपट संपवून बाहेर पडलेला प्रेक्षक एक उत्तम कलाकृती पाहिल्याच्या समाधानात बाहेर पडतो. या समाधानात करमणुकीची निखळता असते, चतुराईने मांडलेल्या वैचारिक जाणिवेची प्रगल्भता असते आणि विनाभेसळ मांडणीचे कौतुकही असते.
आपल्या मनाप्रमाणे, तडजोड न करता विषय मांडता येणे हे खरोखरच भाग्याचे आणि ते या चित्रपटाच्या माध्यमातून करता आले असे परेश मोकाशी म्हणतात. उत्तम कलाकृती रसिकांना हव्या असतील तर असे स्वातंत्र्य कलावंतांना मिळायला हवे. आणि ते मिळेल प्रेक्षकांच्या प्रेमातूनच. वाढलेले नवे शो हे कदाचित या प्रेमाचेच लक्षण आहे.
तेव्हा जरूर जरूर पहा.. आत्म्पॅम्पलेट
24 Oct 2023