Friday, 27 February 2015

परमार्थातला स्वार्थ

आजकाल दानी म्हणवणार्यांची मुळीच नाही कमी
परमार्थात त्यांच्या, स्वार्थाचीही असते हमी.

भुकेल्याला पाहून त्यांचे मन होते सुन्न
फ्रीज रिकामा करती, देती शिळ पाक अन्न

होते दुख्ख पाहती जेव्हा, पोर अनाथ उघडे
दातृत्वाचा बुरख्याआडून, देती फाटके कपडे

देवदर्शनाला जाती, कारण भक्ती त्यांची अलोट
मनात दानाच पुण्य आणि पेटीत फाटकी नोट

संस्था, मंदिरे, आश्रमांना, देती देणगी हवीशी
मात्र अपेक्षा करती, हवी नावाची फरशी

का म्हणावे दान? जेव्हा देती, काही नको असलेले,
मागती मोबदला, जसे काही विकलेले,
ते असते 'स्व' चे समाधान विकत घेतलेले. 

Thursday, 26 February 2015

करतेय accept मी

करतेय accept मी तुझ्या नजरेचं
माझी नजर चुकवणं
पण तरी नजर शोधत राहते नजरेतलं बोलणं

करतेय accept मी तुझ्या
आवाजातला कोरडेपणा
पण डोळ्यातला ओलावा का होत नाही उणा?

करतेय accept मी तुझ्या दृष्टीतलं
माझं अदृश्यपण
लपवून टाकते मीही मग माझं हरवलेपण

करतेय accept मी तुझं
माझ्याशिवायचं जग
पण तरी का होतेय जीवाची अशी तगमग?

करतेय accept मी तुझं
दुखावलेपण
पण माझ्या मनावरचाही अजून ओलाच आहे व्रण

Wednesday, 25 February 2015

किटी पार्टी

परवाच घडली मला एक किटी पार्टी
भेटल्या काही बायका ज्यांचं status high society

एकेकीची भारी पर्स, ड्रेस, hairstyle
प्रत्येकीचीच personality वाटे versatile

कोणाला छंद शॉपिंग चा तर कुणाला लागते जिम
प्रत्येकीलाच व्हायचय slim आणि trim

Imported crockery मध्ये आल्या सुंदर refreshments
diet विसरून सुरु झाल्या हळूहळू comments

हिचा मेकप, तिचे कपडे, gosh did you see ?
last पार्टीला खरच किती embarrass झाले मी

abroad हून परवाच आणलाय हा pearl set
designer आहे, लोकल jewellery, I just hate

प्रत्येकीच्या डोक्याला वेगळं वेगळं tension
AC बंद, मोलकरीण मंद किती करू mention

भाषा यांची मिंग्लिश, हिंग्लिश, मानो या न मानो
पूर्ण मराठी म्हणजे so middle क्लास you know

थोड्या वेळाने मलाच होऊ लागलं suffocate
होता येत नव्हतं मला कशाशीच relate

बाहेर पडले, म्हटलं असो high society
एवढं पुरे, पाहून झाली हीही एक variety

Sunday, 22 February 2015

अळीच होतंय फुलपाखरू

ती शाळेतून येता घरी, लगेच गप्पा फोनवरी
गंमत बघू कि कान धरू? अळीच होतंय फुलपाखरू

उलट उत्तरे, वाद घालणे, कारण नसता चिडणे, रुसणे
आवर म्हणू कि गृहीत धरू? अळीच होतंय फुलपाखरू

दोस्त मंडळी अवतीभवती, गंमत, खोड्या, दंगा करिती
सामील होऊ कि बंदी करू? अळीच होतंय फुलपाखरू

आधी दिसत नसे फारसा, आता सतत हवा आरसा
दटावू कि कौतुक करू? अळीच होतंय फुलपाखरू

बालपणातच असता पाऊल, मुग्धपणाची लागे चाहूल
लहान म्हणू कि मोठी धरू? अळीच होतंय फुलपाखरू

मैत्रिणीच्या कुजबुज कानी, असेल काही गुपित मनी?
सोडून देऊ कि विचारू? अळीच होतंय फुलपाखरू

छोटासा पण कोष सुरक्षित, जग नसेल तसे कदाचित
भीती घालू कि सक्षम करू? अळीच होतंय फुलपाखरू

बाहेर पडता या कोषातून, हुरहूर वाटे फार मनातून
काळजी करू का धीर धरू? अळीच होतंय फुलपाखरू

तयार व्हावे तिने मनाने, पेलण्यास नवी आव्हाने
मोकळ सोडू कि पकडून धरू? अळीच होतंय फुलपाखरू 

Friday, 20 February 2015

आमचे आय टी वाले

शर्ट इस्त्रीचा, टाय चकाचक
बुटांवरती मस्त चमक
id कार्ड कोणी बरं ते 
गळ्यात घातलेले? - हे आमचे आय टी वाले

मस्त भांग अन सेंट भारी
कुणी नाकातून धूर काढी
फोन मात्र कानावरती
सदा चिकटलेले - हे आमचे आय टी वाले

निघतात हे उठून लवकर
हाती मोठा टिफिन केरियर
पण जेवण यांचे कधीच नसते
वेळेवर झालेले - हे आमचे आय टी वाले

हट्ट मुलांचा, तिचीही चिडचिड
inbox मध्ये वाढती गिचमिड
प्रवास, घाई, गर्दी यांनी
डोके भणभणलेले - हे आमचे आय टी वाले

दमून भागून घरी परतती
रटाळ काही tv वरती
बोलायाला कोणीच नाही
सारे घर झोपलेले - हे आमचे आय टी वाले

आज इथे तर उद्या तिथे
airport वर यांचेच जथे
laptop ने बिर्हाड यांच्या
पाठीवर थाटलेले - हे आमचे आय टी वाले

पगार मोठा खोटा खोटा
डोक्यावर टार्गेट चा सोटा
घर, गाडीचे हप्ते सारे
बँकेतच कटलेले - हे आमचे आय टी वाले

लग्नकार्याला सर्व हॉल वर
कर्मयोगी हे असती कॉल वर
सण समारंभही कायम यांच्या
नशिबातून हुकलेले - हे आमचे आय टी वाले

घर, गाडी सर्व काही
उपभोगायला वेळच नाही
तुरुंगातूनही सुट्टी मिळते,
कैदी हे असले कसले? - हे आमचे आय टी वाले







Tuesday, 17 February 2015

माझी कविता

ये रे ये रे पावसा हे लहानपणीचे गाणे
म्हणती सारे, पण ते कोणी रचले? कोण जाणे
सर्वांनी ऐकलीच असेल, ससा कासवाची गोष्ट
कोणी लिहिली नाही ठाऊक पण आठवते स्पष्ट

सांगून पहा मुलांना, काढा देखाव्याचे चित्र
घर, डोंगर टोकेरी आणि डोकावणारा मित्र
हा चित्राचा आराखडा कोणी अमर केला?
अनाम चित्रकाराचे नाव त्या माहित नाही कोणाला

 नावात आहे काय? म्हणाला असेल शेक्सपियर
पण त्याची प्रत्येक कलाकृती आहे त्याच्याच नावावर
छोटा अथवा मोठा असो, त्याचीच असेल जर कला
त्याचे नाव कळले तर नक्कीच आवडेल मला

अजिंठ्याच्या शिल्पांखाली नसेल कुणाची सही
पण मला मात्र माझी कविता माझ्याच नावाने हवी. 

Monday, 16 February 2015

आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही हवं असेल का माहेरपण?

तिलाही असेलच ना ओढ माहेरपणाची
कारण तिथे नसते अपेक्षा वा सक्ती कश्याची
हवे असेल का तिलाहि हे मोकळेपण?
आईलाही हवं असेल का माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

उठू दे तिला कधी सर्वांच्या शेवटी
वाटून घ्यावी तिची काम सकाळची
कायम नको तिलाच जबाबदार्यांच दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

करु म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
तेवढीही जाणीव तिला होईल पुरेशी
लक्षात ठेवू तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई आपल्या लेकीला मायेचे माहेर देते
पण त्याचे मोल लेकीच्या लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेलच ना कधी विसावा;
वाटेल समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण








Sunday, 15 February 2015

valentine साठी

घेऊन गेलो आईसाठी
मोगर्याची सुंदर वेणी
आई म्हणाली काय हवय ?
मोबाईल रिचार्ज कि पोकेट मनी?

ताईसाठी घेऊन गेलो
चोकालेटचा मोठा डबा
म्हणे सूर्य उगवलाय कुठे?
काढा मला एक चिमटा

बाबांच्या हातात दिले
एक जोडी कफलींक
हरवलीस वाटत? बाबा म्हणे
टाय डे ला टाय पिन

आजोबांच्या हातात दिली
चष्म्यासाठी नवी दोरी
म्हणे, खोटं बोलायला सांगू नकोस
वेळेवरच यायचंय घरी

आजी दिसताच हातात दिला
गुलाबांचा लाल गुच्छ
म्हणाली, नाटक नकोय, दे तिलाच
आणि सांगून टाक सारं स्वच्छ

valentine साठी आणल्या होत्या
प्रेमाच्या या खास भेटी
घरातल्यांच उलटंच सारं
वाटे सर्व मतलबा पोटी

पोकेट मनीतून टायपिन घेतली,
ताईला पटवलं उशिरा साठी
आजीकडचा गुच्छ घेऊन
मग धावत गेलो तिच्याचपाठी 

Thursday, 12 February 2015

'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

आलास का शाळेतून, आता आवरून घे पाहू
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

पेपर कोणते मिळाले आणि किती मिळाले मार्क्स?
अरे दहा मिनिटात आहे तुझा गणिताचा क्लास
आत्ताच आलो ना ग, थोडा टीव्ही दे न पाहू
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

कपडे बदल लवकर नि घे अभ्यासाची वही 
हात दुखतायत वगैरे काही चालायचे नाही 
थोडा वेळ मित्रां बरोबर सायकल चालवून येऊ?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

डबा का रे नाही संपला? तशीच आहे पोळी 
गेला असशील ना खेळायला सुट्टीच्या वेळी?
संध्याकाळी असतात क्लास मग कधी ग मी खेळू?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

अरे टेनिसच्या क्लास मध्ये खेळायचंच आहे 
आणि तबल्याला कोण तुला अभ्यास विचारणारे?
अगं सारखं काय शाळा नाहीतर क्लास मधेच राहू?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

अष्टपैलू व्हायला हवं, तुला माहित नाही जग 
मेहनत घेशील आत्ता तरच धरशील तग 
सगळे धावतायत म्हणून मी हि धावतच राहू?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

मान्य आई वाटतंय तुला, मी व्हाव अष्टपैलू 
पण तुम्हा सार्यांच्या अपेक्षा मी एकटा कसा पेलू?
मन कश्यात रमतं माझं ते मलाच द्या न शोधू
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

बांधलेला दिवस माझा, आखलेला वेळ 
एकदा तरी सांग मला, आज मनसोक्त खेळ 
नाहीतर मोकळा श्वास मी तरी केव्हा कसा घेऊ?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'


Wednesday, 11 February 2015

चाकवाल्या चारोळ्या

सायकल बालपण
एसटी वणवण
बस चणचण
आणि लोकल मरण

ट्रकटर कष्ट
ट्रक ओढग्रस्त
जीप गस्त
पण घोडागाडी मस्त

रिक्षा त्रास
कार प्रवास
एक्सप्रेस सहवास
आणि बाइक रोमान्स

विमान भ्रांत
जहाज शांत
बैलगाडी निवांत
आणि पायी एकांत 

Friday, 6 February 2015

माणसांचे साचे

प्रत्येकाला साच्यात बसवायची
आपण का करतो घाई?
हो आहे शांत पण
म्हणून काय कधी बोलणारच नाही?

एखाद्यावर ठेवतो आपण
समजूतदारापणाचे ओझे
वहातच राहायचे?
मनातच ठेवायचे का कायम  प्रश्न अडचणीचे?

 स्वभाव विनोदी आहे त्याचा
आपण लावतो लेबल
दाखवायचे नेहमी हसूच त्याने?
आणि अश्रू गिळायचेच का केवळ?

भोळा असेल तो
असेल त्याचा सार्या जगावर विश्वास
म्हणून फसतच राहायचे कायम?
विचारायच्या नाहीत कधीच शंका, वाटून अविश्वास?

कष्टाळू आहे म्हणून एखाद्याने फक्त
राबायचे राब राब,
सहन करायची मनमानी?
आणि विचारायचा नाही कधीच जाब?

कणखर म्हणून उभे राहायचे
आला जरी भूकंप,
वाट पहायची मोडायची?
मात्र त्याला वाकायचा नाही का विकल्प?

यंत्र नाही ते, जे करील मान्य
सार्या अपेक्षा आणि साचे,
वागावे कि कधी स्वछंदपणे
मोडून बंध अपेक्षांचे

देव नाही, माणूस आहोत आपण
गुण दोष वाही
आणि देवालाही देवपण काही
नेहमी झेपलेले नाही



Wednesday, 4 February 2015

देउळिचा देव

देउळिचा देव, मोठाची गोजिरा
पायीच्या खडावा, सोनियाच्या

तलम ती वस्त्रे आणि आभूषणे
मूर्ती ती झळाळे, पाषाणाची

तयाच्या देउळी, रोज रोषणाई
पूजाअर्चा घाई, रात्रंदिन

परी तो का दिसे, कावराबावरा?
कुठल्या विचारा करितसे?

देव म्हणे मला दिसे विसंगती
ऐकती, वागती विपरीत

देव म्हणे लोका सांगे मी विरक्ती
रास दक्षिणेची, माझ्यापुढे

देव म्हणे द्यावा भुकेल्यासी घास
पक्वान्नांचे ताट नैवेद्याला

कष्ट हाच देव सांगे तरी दारी
उभे भिक्षेकरी कायमचे

देव म्हणे मनी, नका धरू लोभा
नवसाने देवा मोहविती

स्वच्छ मन हेच सोवळे पुरेसे
मन काळे, अंगी पितांबर

देव म्हणे सेवा करा शोषितांची
माया जमविती तीर्थक्षेत्रे

देव हाच धंदा, देव व्यवसाय
अर्थाचा अनर्थ कोणी केला?

दुर्दैवच सारे आपण करंटे
देव काय सांगे समजेना