Tuesday, 17 February 2015

माझी कविता

ये रे ये रे पावसा हे लहानपणीचे गाणे
म्हणती सारे, पण ते कोणी रचले? कोण जाणे
सर्वांनी ऐकलीच असेल, ससा कासवाची गोष्ट
कोणी लिहिली नाही ठाऊक पण आठवते स्पष्ट

सांगून पहा मुलांना, काढा देखाव्याचे चित्र
घर, डोंगर टोकेरी आणि डोकावणारा मित्र
हा चित्राचा आराखडा कोणी अमर केला?
अनाम चित्रकाराचे नाव त्या माहित नाही कोणाला

 नावात आहे काय? म्हणाला असेल शेक्सपियर
पण त्याची प्रत्येक कलाकृती आहे त्याच्याच नावावर
छोटा अथवा मोठा असो, त्याचीच असेल जर कला
त्याचे नाव कळले तर नक्कीच आवडेल मला

अजिंठ्याच्या शिल्पांखाली नसेल कुणाची सही
पण मला मात्र माझी कविता माझ्याच नावाने हवी. 

No comments:

Post a Comment