Friday, 20 February 2015

आमचे आय टी वाले

शर्ट इस्त्रीचा, टाय चकाचक
बुटांवरती मस्त चमक
id कार्ड कोणी बरं ते 
गळ्यात घातलेले? - हे आमचे आय टी वाले

मस्त भांग अन सेंट भारी
कुणी नाकातून धूर काढी
फोन मात्र कानावरती
सदा चिकटलेले - हे आमचे आय टी वाले

निघतात हे उठून लवकर
हाती मोठा टिफिन केरियर
पण जेवण यांचे कधीच नसते
वेळेवर झालेले - हे आमचे आय टी वाले

हट्ट मुलांचा, तिचीही चिडचिड
inbox मध्ये वाढती गिचमिड
प्रवास, घाई, गर्दी यांनी
डोके भणभणलेले - हे आमचे आय टी वाले

दमून भागून घरी परतती
रटाळ काही tv वरती
बोलायाला कोणीच नाही
सारे घर झोपलेले - हे आमचे आय टी वाले

आज इथे तर उद्या तिथे
airport वर यांचेच जथे
laptop ने बिर्हाड यांच्या
पाठीवर थाटलेले - हे आमचे आय टी वाले

पगार मोठा खोटा खोटा
डोक्यावर टार्गेट चा सोटा
घर, गाडीचे हप्ते सारे
बँकेतच कटलेले - हे आमचे आय टी वाले

लग्नकार्याला सर्व हॉल वर
कर्मयोगी हे असती कॉल वर
सण समारंभही कायम यांच्या
नशिबातून हुकलेले - हे आमचे आय टी वाले

घर, गाडी सर्व काही
उपभोगायला वेळच नाही
तुरुंगातूनही सुट्टी मिळते,
कैदी हे असले कसले? - हे आमचे आय टी वाले







No comments:

Post a Comment