आज सकाळी मैत्रिणीच्या घरी फुललेल्या ब्रह्मकमळांच्या बहराचे फोटो पाहिले आणि मन ताजेतवाने झाले. पण ते दृश्य प्रत्यक्ष पाहता न आल्याने, तो स्वर्गीय सुगंध अनुभवता न आल्याने हळहळही वाटली. वाटले, ही ब्रह्मकमळे फक्त रात्रीच का फुलतात, तीही केवळ काही तासांसाठी..!
आजच्या बाजारीकरणाच्या काळात फळे, भाज्यांपासून चकली, चिरोटे, पुरणपोळ्यांपर्यंत सर्वच गोष्टी बारा महिने, तेरा काळ उपलब्ध असतात. मनात इच्छा निर्माण व्हायची खोटी, ती वस्तू समोर हजर होण्याची सोय आहे. मुलांना नाही ऐकायची सवय लावली पाहिजे असे म्हणणारे आपण स्वतःच्या इच्छांना मुरड घालायला तयार नाही हे आपल्या लक्षातही येत नाही. आपल्याला थंडीत आंबे आणि उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी हव्याशा वाटल्या तरी या न त्या मार्गाने आपण आपले हट्ट पुरवतोच. अशा वेळी अजूनतरी वर्षातून एकदाच उमलणारे ब्रह्मकमळ आपल्याला काही सांगू तर पाहत नसेल? जणू निसर्ग म्हणतोय, 'ब्रह्मकमळाचे फुलणे अनुभवायचे असले तर ते रात्रीच आणि ठराविक तासच अनुभवायला मिळेल. वाटले तर फोटो, व्हिडियो काढून ठेवा. पण सुगंध? तो मात्र कुठेच कैद करून नाही ठेवता येणार तुम्हाला.' आणि यातच कदाचित या फुलाविषयी वाटणारे अप्रूप दडलेले आहे.
एखाद्या वस्तूची उपलब्धता आणि त्याचे मोल यांचे प्रमाण कायम व्यस्त असते हा नियमच आहे. आजच्या उपभोग आणि चंगळवादाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मकमळाचे अजूनही हट्टाने एकदाच फुलणे मला निसर्गनियमांची आठवण आणि संयमाचे भान देणारे वाटते. माणसाला नाही म्हणण्याची क्षमता निसर्ग अजून बाळगून आहे ही जाणीव आपल्याला जमिनीवर ठेवायला पुरेशी आहे. नाही का!
© स्वरा