Wednesday, 21 January 2015

लहान आणि मोठी

हिला खेळणी रंगीत संगीत
लांब कानातले तिच्यासाठी
कारण एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

हिच्या ब्रश ला लावते पेस्ट
तिच्या नुसतेच लागते पाठी
कारण एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

हिला कालवून देते भात
तिच्या पानात आमटीची वाटी
कारण एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

हि जेवायलाच तयार नाही
आणि तिचा हट्ट गोडासाठी
अहो एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

कधी मी हट्टाला पडते बळी
कधी शिस्तीच्या लागते पाठी
शेवटी एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

तू तिचेच जास्ती लाड करतेस
हे हि ऐकून घेते बेटी
कारण एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

धाकटी कधी मोठी होते
आणि मोठी होते छोटी
पण एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

मात्र कधीच कळत नाहीत
सिक्रेट त्यांच्या कानगोष्टी
जरी एक माझी लहान आहे
आणि एक जरा मोठी

No comments:

Post a Comment