“वैशू, अग लक्ष कुठेय तुझं.
किती हाका मारतेय.” एका संध्याकाळी लेकीची छोटी मोठी खरेदी करून परत येत असताना
मंजूची हाक ऐकू आली. कधी नव्हे ती आज जुई माझ्यासोबत होती; अर्थात तिच्याच गोष्टी
आणायच्या होत्या. नाहीतर शिंग फुटण्याच्या वयातली मुलगी आईसोबत कसली बाहेर पडतेय!
पायाला नीट बसणारी सँडल घ्यायचा आईचा सल्ला न ऐकता बऱ्यापैकी उंच टाचा असलेली
चप्पल तिने घेतली आणि अर्थातच लगेच घातलीही होती. युज and थ्रो चा जमाना
असल्यामुळे जुनी चप्पल खोक्यात बांधून आणायचा प्रश्नच नव्हता. पण माझं मध्यमवर्गीय
मन काही त्या जुन्या चपला टाकून द्यायला तयार होईना त्यामुळे तेही खोकं मी वागवत
होते. आपली वाढलेली दोन इंच उंची तोलत कन्यारत्न ऐटीत चालत होते पण तो तोल
सावरताना जर आधार घ्यायची वेळ आलीच तर माझा खांदा तिच्या हाताशी असावा या बेताने
मीही जवळजवळ तिला चिकटूनच चालत होते. साहजिकच मंजिरीच्या हाकेकडे माझे लक्ष
नव्हते. मागून हातातली पर्स आणि पिशव्या सांभाळत, धापा टाकत मंजिरी पुढे आली आणि
आपला भक्कम हात माझ्या खांद्यावर टाकून सोसायटीच्या गेटशी अखेर तिने मला गाठलेच.
“काय ग, आज माय लेकी सोबत?”
तिने प्रश्न टाकला, “काय ग जुई, आज काही क्लास बीस नाही वाटतं?” जुईने मान हलवून
तिच्या परीने उत्तर दिले. पण मंजूची बडबड नेहमीप्रमाणे सुरु झाली होती. तिला
कुणाच्या उत्तराची गरज कधीच पडत नसते. “आजकाल संध्याकाळच्या वेळी या वयाच्या
पोरांचं नखही दिसत नाही.” मंजूने पुढचे वाक्य बोलण्यासाठी सेकंदभर श्वास घेतला
तेवढ्यात कन्यारत्नाने काल दोन तास खर्च करून आपल्या नखावर रेखलेले नेल आर्ट पुन्हा
एकदा प्रेमाने न्याहाळले. “हो की नाही ग?” मंजूची गाडी पुन्हा वेग घेऊ लागली. “बरोबरच
आहे म्हणा. दुपारभर शाळा म्हटल्यावर क्लास संध्याकाळचेच लावावे लागतात. नाही ग,
आजकाल क्लासशिवाय काही खरं नाही. म्हणजे आपण देऊ शकतो मुलांना तर का नाही; हो की
नाही? आपल्या लहानपणी आपण नुसते हुंदडत असायचो या वेळी. तो काळच वेगळा होता ग. पण
आता, सगळीकडे इतकी कॉम्पिटीशन म्हटल्यावर एक्स्ट्रा कॅरीकेचर करावंच लागतं
मुलांना.” मंजूच्या इतक्या सगळ्या बोलण्यात चुकून आलेला फक्त ‘कॅरीकेचर’ हा शब्द
जुईला ऐकू आला आणि ती फसकन हसली. माझ्याही लक्षात ती चूक आली होती पण मंजूचा एकूण
अविर्भाव याच शब्दाच्या जास्त जवळ जाणारा वाटल्यामुळे मी गप्प राहिले होते.
“माझ्या अथर्वला मी कराटेला
घातलं आहे. ट्युशन तर असतेच ग. पण या बाकीच्या गोष्टी शिकून घ्यायची हीच तर वेळ
आहे. पब्लिक स्पिकिंगसाठीही शोधतेय मी. तू कुठल्या क्लासला जातेस?” हे विधान
प्रश्नार्थक असले तरी मंजूला उत्तराची अपेक्षा आहे असे दिसले नाही. तिची बडबड
सुरूच होती, “वेदिक मॅथ्सला जातेस की नाही? अथर्व जातो रविवारी. अग त्या खन्नाबाई
आल्यात न सोसायटीत त्या म्हणे दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये होत्या, जर्मन शिकवायच्या.
आता रिटायर झाल्यात. पण माझी बाई सांगत होती, इथे क्लास सुरु करणार आहेत म्हणून.
किती लकी आहोत न आपण. अथर्वला फॉरेन लँगवेज शिकवायचीच आहे मला कोणती तरी. तुला
येते का ग फ्रेंच, जर्मन? शाळेत असेल ना एखादी..” उत्तरादाखल जुईने फक्त खांदे
उडवले आणि ती पुढे निघाली. कार्टीला जरा कुणाशी बोलायला नको.
“गेली बघ. फार बिझी हो
आजकालची मुलं.” जुईचे पुढे निघून जाणे सहज स्वीकारत मंजू म्हणाली, “क्लास असेल न?
जा जा. पुढच्या वर्षी दहावी न ग हिची? असा वेळ नको घालवत जाऊस तिचा फालतू खरेदी
बिरेदी मध्ये. आपणच सुरुवातीपासून सैल सोडता कामा नये, नाहीतर फार timepass करायला
शिकतात ही मुलं. हेच वय नाही का, सर्वांगीण विकास करून घ्यायचं!” एवढं बोलून
तिच्या विंगकडे वळून ती निघून गेली. सर्वांगीण विकासाला घेतलेल्या तिच्या अथर्वचा चेहरा
क्षणभर माझ्या डोळ्यासमोर तरळला. आणि आपण लेकीला फारच सैल सोडले आहे या विचाराचा
भुंगा डोक्यात घेऊन मी घरात प्रवेश केला. ‘खरंच! सगळी मुलं या न त्या क्लासमधून
आपापला सर्वांगीण विकास करून घेत आहेत. आपली मुलगी यात मागे पडली तर! छे! तिला
एखादी नवी भाषा यायला हवी, एखादा खेळ, एखादे वाद्य अगदीच नाही तर किमान आईच्या मैत्रिणीशी
धड बोलण्याची समज तरी! कोणी बोलत असताना सरळ निघून जाते म्हणजे काय? छे! कसं
व्हायचं हिचं!”
रात्री जेवणाच्या वेळी विषय
काढला. ह्यांच्या दिनक्रमात जोवर कसली बाधा येणार नसते तोवर त्यांचा कसल्याच नव्या
गोष्टीला, बदलाला विरोध नसतो. त्यात हा लेकीला आणखी हुशार बनवायचा, नवे शिकवण्याचा
मुद्दा असल्याने नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. तिच्या दादाला म्हणजे थोरल्या
वेदलाही जुईला कशाततरी गुंतवण्याची कल्पना मनापासून आवडली. तो अगदी हेल्थ फ्रीक
म्हणता येईल असा जिम प्रेमी. जुईने सेल्फ डिफेन्स शिकायला हवा हा त्याचा अजेंडा
त्याने लगेच समोर आणला. पण आमचं शेंडेफळ नितांत आळशी. त्यामुळे काही कारण नसताना
उगीच हातपाय हलवण्याचे श्रम स्वतःहून करायची कल्पना तिला सहन होईना. त्यातून
संध्याकाळचा मैत्रिणींसोबत खाली timepass करण्याचा वेळ त्यागण्याचीही तिची तयारी
नव्हती. मी अनेक पर्याय तिच्यासमोर ठेवून पाहिले. गाणं, नाच, चित्रकला, खेळ. पण
तिला काहीच पसंत पडत नव्हते. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे गोष्टीचं पुस्तक घेऊन ती
पसार झाली. छे! उशीरच केला आपण. लहान होती तेव्हाच काही एक्स्ट्रा करिक्युलर
शिकवलं असतं तर! मुलीचं नुकसान केलं का आपण? रात्री बराच वेळ झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी
बाहेरून घरी येत होते. अथर्व खालीच दिसला. जिन्याच्या खाली कोपऱ्यात हातात फोन घेऊन
काहीतरी गेम खेळण्यात रमला होता. ‘अरे असा अंधारात का बसला आहेस? घरी नाही का
कोणी? बाहेर मुलं खेळतायत बघ.’ सहज त्याला म्हटलं. त्याने मानेनेच नकार देऊन आपले
काम सुरु ठेवले. ‘आज क्लास नाही का तुला?’ मी उगीच भोचकपणे विचारले. ‘क्लास
कॅन्सल’ शक्य तेवढे मोजके शब्द वापरून त्याने उत्तर दिले. बाहेर बाकीची मुलं खेळत
होती त्यात आमची कन्यकाही दिसली. तिला बोलवून मी त्याला खेळायला घेण्याबद्दल
विचारले. ‘डोन्ट interfere आई. लेट हिम चिल. आणि आम्ही डब्बा ऐसपैस खेळतोय; त्याला
फक्त ऑलिम्पिक स्पोर्ट्स येतात. आणि लगेच जाऊन सांगू नकोस मंजूकाकूला.’ वर मलाच दम
देऊन लेक चालती झाली. अगदी सर्वांगीण नसला तरी, क्लासेसच्या गर्दीतून काही चुकार
क्षण हाती लागलेल्या आपल्या मित्राला थोडी मोकळीक मिळण्याची गरज ओळखण्याइतका विकास
बरोब्बर झाला होता तिचा. माझे लक्ष पुन्हा अथर्वच्या चेहऱ्याकडे गेले. इतके क्लास
करूनही मोकळा वेळ मिळाला तेव्हा त्याला इतर मुलांमध्ये मिसळावसं का वाटलं नसेल?
मोबाईलमधला खेळ मित्रांसोबतच्या खेळापेक्षा जवळचा का वाटला असेल? केवळ
ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे खेळ हेच खेळ असतात? डब्बा ऐसपैस, लगोरी, टायर काठीने
फिरवत नेणे, गोट्या, लपाछपी यातलं काहीच येत नसेल याला? की ते सगळं बिनमहत्वाचं? मित्रांमध्ये
सामावून खेळण्याची कला क्लासमधून थोडीच शिकता येते! म्हणूनच असा एकलकोंडा झाला
असेल का हा?
मोकळा वेळ असणं, तो हवा तसा
घालवता येणं ही बालपणातील मोठीच चैन. शिकण्याचं वयही बालवयच हे मान्य. पण शिक्षण
केवळ शाळा आणि क्लासमधूनच होतं का? न शिकवता अनुभवातून, आपलं आपणच नवीन काहीतरी
शिकण्याच्या क्षमतेचं महत्व आपण विसरत का बरं चाललो आहोत? मित्रमंडळीच्या सान्निध्यात गप्पाटप्पा
करणे, खेळ खेळणे, हरणे, जिंकणे इतकंच काय भांडणे देखील किती काय काय शिकवत असेल
मुलांना. हे सारे अनुभवण्यापासून आपण वंचित करायचे मुलांना? नवी भाषा, खेळ, संगीत,
अभ्यास हे शिकण्याला महत्व आहेच पण या शिक्षणाबरोबर आपलं आपण शिकण्यासाठी, शिकलेलं
पचवण्यासाठी पुरेसा वेळ मुलांना मिळायलाच नको? प्त्यांरत्नीयर्क नवे फड त्यांच्या माथी मारून त्यांना गुदमरून टाकले तर आपला स्वतःचा कल ओळखण्याची उमेद त्यांच्यात उरेल का? क्लासची झापडं इतकीही बंदिस्त नको की बाहेरचं जग बघणारी त्यांची नजरच झाकली जाईल. त्यांनी दोस्तांसोबत वेळ घालवायला
हवा तसेच काही करायला नाही म्हणून कंटाळायलाही हवं. कारण या कंटाळ्यातूनच त्यांची
सर्जनशीलता जागी होत असते. बुद्धी नवा मार्ग शोधत असते. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची
कल्पना सुचली तेव्हा तो बागेत निवांत बसला होता, आर्किमिडीज पाण्यात पहुडला होता.
मेंदूतील माहितीचे मनन करण्यासाठी निवांतपणा हवाच. आज आपण मुलांना दिवसभराच्या
वेळापत्रकात घट्ट बांधून त्यांच्यापासून तो हिरावून घेत आहोत. शिकवण्याचा जोरदार
मारा आपण एकतर्फीच करत आहोत. पण मुलांना स्वतः शिकण्यासाठी वेळ आणि संधीही आपणच
द्यायला हवी तरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला आपण खरा हातभार लावू शकू नाही का?