Wednesday, 9 August 2023

आम्ही कोण!


आम्ही कोण म्हणोनि काय पुसता, आम्ही रिकाम्टेकडे
कॉमेंटी फेबु इंस्टावरी न तुम्ही का आमुच्या पाहिल्या?
विश्वाच्या समाज माध्यमी विचरतो आम्ही सदा लीलया
परनेत्रीचे कुसळ सूक्ष्म अमुची दृष्टी पहाया शके ||

ते आम्ही - प्रतिपक्षातले नित शोधून की थोरले
ते आम्ही - चव्हाट्यावरी धुवतो तयांची धुणी
सत्य शिव विसरोनी चघळतो केवळ उणी नि दुणी
गलिच्छतेचे इंधन भारी, पसरती सर्वदूर लक्तरे ||

शून्यामाजी झुंजतात पहा, परजूनी शस्त्रे, नखे
भंगती पुतळे, कधी टोप्या, कुणी फेडती धोतरे
दर्जा, लायकी कोण पुसे माकडा, कोलीत असता करे
नामानिराळे राहू, गंमत पाहू, बघ्येच आम्ही बरे ||

आम्हाला वगळा होतील सुनी सारी जन माध्यमे
आम्हाला वगळा होतील हतबल साऱ्यांची राजकारणे


(केशवसुत व केशवकुमार यांची क्षमा मागून..)

Thursday, 4 May 2023

बुद्धिबळ - स्वतःचे स्वतःशीच!


लेखक लोकांना बऱ्याच वेळेला एक प्रश्न विचारला जातो; तुम्हाला सुचतं कसं बुवा! काही वेळा अंतःस्फुर्तीने काही गोष्टी लिहिल्या जातात. डोक्यातले विचार आणि लिहिण्याचा वेग यांचा उत्तम ताळमेळ जमतो आणि बघता बघता एखादा लेख, एखादी कविता, कथा कागदावर उतरते. ही झाली आदर्श आणि लोकांच्या मनात असलेली लेखन क्रियेविषयीची प्रतिमा. प्रत्येक वेळी ही अवस्था अनुभवणारे लेखक भाग्यवान! आम्ही बाकीचे मात्र कधीतरी अनुभवलेल्या या अवस्थेची आराधना करत राहतो. कारण आमच्या बाबतीत बरेचदा होते ते असे..
शेंडा बुडखा नसलेली एखादी कल्पना मनात रुंजी घालत असते. पण ती कागदावर उतरायची तर तिला मूर्त रूप द्यायला हवं. ते देण्यासाठी आधी तिला काय कोंदण शोभेल याचा विचार करायला हवा. म्हणजे कविता, ललित असं काही नाजूक, की लेख, कथा असं काही भक्कम. किंवा आत्मविश्वासाचं पाकीट बऱ्यापैकी फुगलेले असेल तर कादंबरी, नाटकासारखं काही भारी! एकदा कोंदणाची निवड झाली की मग त्या हिशोबाने जमवाजमव सुरू होते. तुम्ही म्हणाल, विषय आहे, कोंदण ठरलं आहे; आता नुसतं भराभरा लिहून काढायचं. हाय काय अन् नाय काय!
पण नाही ना..! लिहायला सुरुवात होते आणि एक दिवस मध्येच गाडं अडतं. सुरुवातीपासून एकमेकांत छान विणले जाणारे पात्रांचे, कथानकाचे दोरे एकमेकांत गुंतू लागतात. दुभंगू लागतात किंवा चक्क हट्टीपणा करत पोतच बदलू लागतात. अचानक पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अश्या वेळी फिरून पुन्हा मागे जाणे हा एक उपाय असतो. पण आम्ही पडलो हट्टी! मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा अंगात संचारतो. काही केल्या मागे जाणार नाही. यातूनच मार्ग काढून पुढे जाईन तरच खरी! अशी भीष्म प्रतिज्ञा केली जाते आणि मग सुरू होतो एक रोमांचक खेळ!
माझ्या लहानपणी आमच्या घरी नेहमी बुद्धिबळाचा पट एका टेबलावर मांडून ठेवलेला असायचा. ज्या बाजूची चाल असेल त्या बाजूला खूण असायची. जाता येता माझे वडील, भाऊ पुढची चाल खेळायचे. असा हा डाव कित्येक दिवस सुरू असायचा. घरातल्या खेळाडूंच्या या निःपक्षपाती खेळाविषयी मला नेहमी कुतूहल वाटायचे. एका संघाला झुकते माप न देता दोन्ही बाजूंनी खेळणे कसे शक्य आहे असे वाटायचे. पण त्यांचा तो खेळ खूपच रंगायचा कारण तो अत्यंत प्रामाणिकपणे खेळला जायचा.
आज वाटले, लेखनाच्या बाबतीतही असेच आहे की! स्वतःच निर्माण केलेल्या व्यूहरचनेतून मागे न वळता पुढे जायचे तर सर्व संबंधित बाबींचा विचार हा नि:पक्षपातीपणे करता यायला हवा. पळवाट काढणे कितीही सोयीचे वाटले तरी दोन्ही बाजूंना योग्य न्याय मिळेल याची काळजी घेता यायला हवी आणि त्यासाठी स्वतःच स्वतःशी असे प्रामाणिकपणे बुद्धिबळ खेळता यायला हवे. डाव पूर्ण व्हायला कितीही दिवस लागले तरीही! तो आपल्याला अपेक्षित असाच पूर्ण होईल याची खात्री नसली तरीही! आणि पूर्ण झाल्यावर तो कुणाच्या पसंतीस उतरेल की नाही याची शंका मनात असली तरीही! हा झगडा म्हणजेच कदाचित लेखकाचे प्राक्तन असावे. कारण सर्जनाची उर्मी जोवर आहे तोवर तिला प्रामाणिकपणे वाट करून देणे हेच त्याचे कर्तव्य नाही का!
© स्वरा
All reactions:
Swati Bhanage Joshi, Pranav Joshi and 19 others

आज जागतिक पुस्तक दिन! 23 April 2023


पुण्यात ज्या भागात आम्ही राहतो तिथे जवळपास ग्रंथालय नाही. जी आहेत तिथे मराठी पुस्तकांचा पुरेसा साठा नाही त्यामुळे वाचन काही काळ मागे पडले होते. पण गेल्या वर्षी विनया चल ग्रंथालय या फिरत्या ग्रंथालयाबद्दल कळले आणि लगेच त्याचे सभासदत्व घेतले. श्री व सौ डोईफोडे पुण्यात हे ग्रंथालय चालवतात. दर महिन्याला आपल्या आवडीची पाच पुस्तके घरपोच वाचायला मिळतात. हा उपक्रम विनया चल ग्रंथालय गेली सात वर्षे चालवत आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याला जाण्याचा योग आला आणि समानशील पुस्तकप्रेमिंना भेटून हरवलेले काहीतरी सापडल्याची जाणीव झाली.
आज कितीही नाही म्हटले तरी काही प्रमाणात आपण सर्वच फोन या तुलनेने नवीन असलेल्या खेळण्याच्या कह्यात जाऊ लागलो आहोत. तो सतत आवाज करतो, गाणी ऐकवतो, रंगीबेरंगी चित्रे, मजेदार व्हिडिओ दाखवतो, आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्याची खबरबात देतो. त्यामुळे या एकाच खेळण्यात आपण तासनतास रमून जातो. पण ते बाजूला ठेवले की लक्षात येते अरे! आपण एवढा वेळ घालवून मिळवले काय? जेमतेम दहा वीस सेकंद पाहून बोटाने चित्र बदलत राहणारे आपण केवळ बाह्यतः रमलेलो असतो. पण आत काही मुरावे इतका वेळ आपण त्यातील एकाही गोष्टीला दिलेला नसतो त्यामुळे बरेचदा मिळकत शून्य असते.
याउलट पुस्तक ना आवाज करते, ना गाणी ऐकवते, ना व्हिडिओ दाखवते ना काही खास खबर देते. मग करते काय? तर एक चांगले पुस्तक एकेका शब्दागणिक आपल्या मनात उतरत असते. बाकी कुणालाही ऐकू न येणारा लेखकाचा आवाज फक्त आपल्या कानांना ऐकू येतो. लेखिकेने वर्णन केलेली दृश्ये फक्त आपल्या डोळ्यांसमोर उलगडू लागतात. समोर साकारू लागलेले ते नवे विश्व कधी विचारांना चालना देते तर कधी भावनेला हात घालते. म्हणाल तर समोर असतात पांढऱ्या कागदावर छापलेले काळे शब्द; मग आपल्या मन:चक्षुंपुढे असे अद्भुत, बहु मितीय काहीतरी उभे करण्याची ताकद त्यांच्यात येते कुठून?
पुस्तकातले शब्द हे लेखकाच्या अनुभवाचा, वाचनाचा, कल्पनेचा आणि कलेचा अर्क किंवा परिपाक असतत. नवनिर्मितीच्या वेणा भोगून ते जन्माला आलेले असतात. लेखक नावाच्या सर्जकाचा अनुभव त्याच्या शब्दांतून प्रवाही तर होतो पण तो पूर्णत्वास जाण्यासाठी वाचक नावाच्या माणसाची गरज असते. वाचणारा वाचकही तितकाच सावध असावा लागतो. त्यामुळे आपण जरी केवळ मनोरंजनासाठी वाचत असलो तरी पुस्तक हे आपल्या मेंदूला कार्यमग्न ठेवत असते. वाचकाचा मेंदू लेखकाच्या शब्दांत आपले स्वतःचे असे काहीतरी मिसळून स्वतःचा नवा अर्थ निर्माण करत असतो. म्हणूनच एकच पुस्तक प्रत्येक वाचकाला निराळे भासू शकते. विचारांना चालना आणि सर्जनाला प्रोत्साहन देणारी ही क्रिया आहे. आणि म्हणूनच फोनवरच्या निष्क्रिय रंजनापेक्षा ती कैक पटींनी श्रेष्ठ आहे.
आजच्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने हेच सांगणे की आपल्या मनाचेही आरोग्य जपुया आणि आपल्या मेंदूला निष्क्रिय रंजनापेक्षा सक्रिय रंजनाकडे वळवायचा प्रयत्न करूया!
© स्वरा

Monday, 13 March 2023

आपण तरी..

 आपण तरी..

8 march 2023

आपण तरी नको बघुया आज
तिचा रंग, तिचं दिसणं..
ओठावरची लव नाही पडणार दृष्टीला
असं आहे तिचं मनमुराद हसणं!
आपण तरी नको करूया थट्टा
तिच्या हातचा स्वयंपाकाची, तिच्या अस्ताव्यस्त घराची.
प्रत्येक गोष्टीत प्रवीण असणारी
फक्त नायिकाच असते मालिकेची!
आपण तरी नको हसुया पाहून
लादी पुसणाऱ्या पुरुषाचे व्यंगचित्र.
घरचे काम वाटून घेणारा प्रत्येकजण
असतो माणुसकी जपणारा खरा मित्र
आपण तरी नको करूया कानगोष्टी
ऑफिसातून ती घरचे फोन करताना.
ऑफिसप्रमाणे तिची गरज
लागत असेलच की घरच्यांना.
आपण तरी नको पाहूया आज
भुवया उंचावून तिच्या कपड्यांकडे.
स्वतंत्र व्यक्ती म्हणून निवडीचे सुकाणू
असायला हवे ना तिच्याचकडे?
किमान आज तरी होऊया पुढे
'बाईच शत्रू बाईची' ची प्रथा मोडण्यासाठी.
तिच्याप्रमाणे करतच असतो ना आपणही कसरत,
तारेवरचा तोल सांभाळण्यासाठी?

संदीप, वैभव आणि कविता

 संदीप, वैभव आणि कविता

26 feb 2023

आज 'संदीप, वैभव आणि कविता' हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला. काही न ठरवता अचानक रविवारी सकाळी हा कार्यक्रम असल्याची आठवण व्हावी, दिवस मोकळा असावा आणि चक्क नवऱ्यानेही सोबत यायला होकार द्यावा असं सगळं जुळून आलं.
संदीप खरे आणि वैभव जोशी दोघेही आवडते कवी. त्यांच्या कवितांचे विषयही ओळखीचे; एकतर अनुभवविश्वातले किंवा (प्रेमाबिमाच्या बाबतीत) कल्पनेची झेप पोहोचू शकेल इतपत आवाक्यातले. शब्द आणि मांडणीही उगीच दुर्बोध (म्हणजे अर्थवाही शब्दांच्या दोन दोन तीन तीन पायऱ्या वगळून उगीच उड्या मारणारी) नाही. अर्थापर्यंत चढताना कवीने एखादी पायरी वगळली तर आम्हा प्राथमिक श्रेणीतल्या रसिकांना कवितेतली सूचकता कळून अर्थापर्यंत अचूक उडी मारल्याचा आनंद मिळतो पण दोन तीन वगळल्या तर मात्र तोंडघशी पडायला होतं. कवितेबद्दल उगीच एक भीती मनात बसते. पण या दोघांची शैली कविता आम्हालाच कळलीये असा आव न आणणारी; परभाषिक शब्दांचा विटाळ न मानता थेट समोरच्याला जाऊन भिडणारी. आणि सुलभ तरीही अर्थगर्भ असणारी. विशेष उल्लेख करायचा तर वैभव जोशींची ' काहीपण / तरीपण?' (sorry, नक्की शीर्षक आठवत नाही) , ग्रेसांवरील कविता आणि संदीप खरे यांची ' मी आणि माझा आवाज ', ' सायकल ' अतिशय भावल्या.
सलग दोन तास समोर सादर होणाऱ्या एकाहून एक सुरेख कविता, अधूनमधून त्यावरील खुसखुशीत भाष्य, दोघांनी एकमेकांना दिलेले काव्याचे झब्बू (हा त्यांचाच शब्द बरं का..) अश्या मैफिलीचा आनंद मनसोक्त लुटला. अगदी *खरे* सांगायचे तर आज दोघांच्याही रचनांतून मराठी भाषेचे *वैभव* रसिकांनी मनः पूत अनुभवले आणि मराठी भाषा गौरव दिन सुरेख साजरा झाला.

10. बाई ग!

 # ललित

बाई ग!
17 feb 2023

माझे work from home वाढू लागले तसे स्वयंपाकाला 'आता बाई लाव..' चे सल्लेही वाढू लागले. शिवाय कामासाठी काही दिवस मला बाहेरगावी जावे लागणार होते त्यामुळे हा सल्ला एकदाचा मी स्वीकारला. आजवरच्या आयुष्यात स्वयंपाकाला बाई हा प्रकार माहेरी किंवा सासरीही कधी पाहिला नव्हता त्यामुळे माझ्यासाठी ही नवलाईची गोष्ट होती.
'उद्या ती येणार.. उद्या ती येणार ' आदल्या रात्री तिच्यासाठी नेहमीपेक्षा जास्त लक्ष घालून मी गॅस, ओटा स्वच्छ केला. (कितीही झालं तरी 'दुसरीच्या' नजरेला आपलं घर स्वच्छ दिसायला हवं हा नको तेवढा अट्टाहास बायकांना असतोच नाहीतरी, मग ती पाहुणी असो की कामवाली) पावणेसातला ती येणार म्हटल्यावर साडेसहाला उठून दूध तापवणे, चहा करणे.. (हो! उगीच तिच्या मध्येमध्ये नको ना!) भाजी फ्रिजमधून काढून ठेवणे, तिला लागणारी भांडी ओट्यावर ठेवणे इ. पूर्वतयारी मी करून ठेवली. पण तिने पावणेसात सांगून सात वाजवले. तेवढ्या पंधरा मिनिटात ' छे! आधी माहीत असतं तर आणखी थोडा वेळ झोप झाली असती' हा विचार किमान तीस वेळा तरी माझ्या मनात येऊन गेला असेल. (मी वेळेची अति काटेकोर आहे आणि मला झोप अंमळ जास्तच प्रिय आहे हा आरोप मी नाकारत नाहीच्चे)
ती आली. माझा रोजचा तवा काही तिला पसंत पडेना. मी तत्परतेने घरातले लोखंडाचा, नॉन स्टिकचा, हॅण्डलवाला असे तीन तवे तिच्यासमोर ठेवले. शिवाय माळ्यावर एक मातीचा (हो! एका प्रदर्शनातून तो घेऊन मी माती खाल्ली आहे) आणि खाली एक ऑमलेटचा असे आणखी ऑप्शन तिच्यासमोर ठेवले. शेवटी एका सगळ्यात लहान तव्यावर तिने compromise केला. हुश्श!
भाजीसाठी तिखट, मीठ, गूळ, खोबरे वगैरेचे प्रमाण दाखवून दिले. रोजचे काम करताना कोणी बघत उभे असेल तर माझ्याकडून हमखास काहीतरी गडबड होते. तिला असा काही त्रास नको म्हणून (समंजसपणे) मी बाहेरच्या खोलीत आले. पण तिला अशी काही performance anxiety नसावी. वेळोवेळी भाजी कशी चिरायची, फोडी किती लहान, मोठ्या, लसूण, कांदा, टोमॅटो हवा, नको इ. प्रश्नांची उत्तरे द्यायला मला सात वेळा आतबाहेर करावे लागले. त्यामुळे बाईच्या कामाच्या वेळात नुसतं बसण्यापेक्षा थोडाफार व्यायाम करावा हा सद्विचार पहिल्या दिवशी तरी प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
भाजी फोडणीला टाकून तिने पोळपाटाखाली घालायला एक टॉवेल (पोळपाट हलू नये म्हणून) आणि पोळ्यांसाठी सुती कपडा मागितला. मला या दोन्ही गोष्टी लागत नसल्याने त्या पूर्वतयारीत नव्हत्या. (पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी नेमका तयारीत नसलेला बुक्का किंवा कापूस वस्त्र मागावे त्याची आठवण झाली) उद्यापासून त्या काढून ठेवायची नोंद मनात करून मी पुन्हा पद्मासनातून उठले तेव्हा मीच इथे वरकामाला आहे की काय अशी भावना मनात आली होती.
आज लेकीला लवकर कॉलेज असल्याने एकीकडे तिला उठवण्याचा कार्यक्रम सुरू होताच. ती आपल्या पायावर उभी राहून बाथरूम मध्ये शिरली आणि नाश्त्याला उपमा करायला म्हणून मी मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. एका गॅसवर भाजी, दुसऱ्यावर पोळ्या आणि गॅस समोर पोळ्यांचा पसारा होता. दहा वर्षांपूर्वी मी तीन बर्नरची शेगडी घेण्याचे चातुर्य दाखवल्याबद्दल स्वतःचेच अभिनंदन केले आणि तिसऱ्या गॅसवर कढई ठेवली. एका बाजूला थोडी जागा करून माझा कटिंग बोर्ड तिथे बसवला आणि कांदा चिरायला सुरुवात केली. पोळी भाजी उरकून ती बाहेर पडली. माझा उपमाही बनला. पण घड्याळ मात्र रोजच्यापेक्षा उशीरच झाल्याचे दाखवत होते.
कित्येक वर्ष आपण स्वतः करत असलेले काम एखाद दिवस दुसऱ्या कुणी केले तर त्यात आपण शंभर खोडी काढू शकतो. पोळ्या जाड राहिल्या, भाजी तिखट वाटली असे मुद्दे होतेच पण त्याहीपेक्षा मला लवकर उठून बसावं लागलं आणि वेळ काही वाचला नाही हे जरा जास्तच मनाला लागलं होतं. पण हळूहळू सगळं सुरळीत किंवा सवयीचं होईल अशी मी मनाची समजूत घातली. कारण पुढचे काही दिवस मला तिची गरज निश्चितच लागणार होती. शिवाय तिच्या जीवावर 'आता मी पोळी बंद करून रोज भाकरी खाणार आहे' या इकडच्या निश्चयाची परीक्षाही मला घेता येणार होती. रोजची गरज नसली तरी वेळेला उपलब्ध असणे हा तिचा सर्वात महत्त्वाचा गुण असणार होता आणि त्याच गुणाने इतर बारीक सारीक मुद्द्यांवर मात केली.
काहीजणी करणाऱ्या असतात तर काही करून घेणाऱ्या. मी पहिल्या प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाण्याची कधीच शक्यता नाही असा घरचाच अहेर मला या बायांच्या बाबतीत अनेक वेळा मिळाला आहे. कारण त्यांना जास्तीचे काम सांगण्यापेक्षा सुटी देणे मला सहज जमते. त्यांचे काम सुलभ व्हावे याकरता मी झटत राहते. मग माझ्या लक्षात येतं, व्यवस्थापकीय स्किल ही एक वेगळी कला आहे. ती साध्य करणे सोपे नाही. कधी जमेल कोण जाणे!
उद्या महाशिवरात्र, उपासाचा दिवस. आज बाहेर पडताना उद्या आमचा उपास असतो, पोळीभाजी नको, तुला सुट्टी असे तिला सांगितले. (उपासाची भाजी करून घ्यायची न असा घरचा अहेर मिळालाच!) सुटी मिळाल्याने तिला आनंद झाला की नाही माहीत नाही पण उद्या सकाळी मनसोक्त झोप काढायच्या कल्पनेने मलाच गुदगुल्या झाल्या तेव्हा लक्षात आले, दिल्ली अभी बहुत दूर है.

आमने सामने - चौकट मोडणारे नाटक

 आमने सामने - चौकट मोडणारे नाटक

5 dec 2022

बघायच्या यादीत खूप दिवस असलेलं हे नाटक बघायचा अखेर काल योग आला. नवीन लेखक दिग्दर्शकाचे पारितोषिक विजेते नाटक म्हणून मनात खूप कुतूहल होतं. नाटक सुरू झालं आणि सुरुवातच इतकी वेगळी, मजेदार आणि प्रेक्षकांना सामावून घेणारी वाटली की ज्यामच आवडली.
पारंपरिक नाटकांत सूत्रधार आणि नटीची जोडी जशी प्रेक्षकांशी संवाद साधत पात्रांची ओळख करून देते तशीच, आजच्या भाषेत आणि आजच्या संदर्भात लीना भागवत मजेशीरपणे ती करून देतात. आणि सगळ्या प्रेक्षकवर्गावर सहज ताबा मिळवतात. त्यांनी लावलेला विशिष्ट आवाज भारीच!
हळूहळू नाटकाचा विषय, पात्रे संवादातून उलगडू लागली. ज्येष्ठ जोडी पारंपरिक पद्धतीने ३८ वर्षे संसार करणारी तर दुसरी तरुण जोडी live in मधून compatibility जोखण्याचा प्रयत्न करणारी. एक गंभीर विषय अत्यंत हसत खेळत मांडत नाटक पुढे जाऊ लागतं. कधीकधी विनोदाचा डोस गरजेपेक्षा जास्त होऊन आशय पातळ होईल की काय अशी भीती वाटते. एखादे गंभीर वाक्य sink in होते आहे तोवरच एखादी मिश्किल टिप्पणी गरजेपेक्षा घाईने येते आहे असेही वाटते. पण तरीही ते विषयाच्या भोज्याला सोडून फारसे भरकटत नाही. चौथी भिंत भेदून प्रेक्षकांशी सतत संवाद साधण्यातले नावीन्य अतिशय आवडले पण त्याची वारंवारिता थोडी आटोक्यात ठेवून ते अधिक परिणामकारक झाले असते असेही वाटले. मात्र एवढी तक्रार वगळली तर नाटक उत्तम रंगते.
जागोजागी येणारे हशे आणि टाळ्या प्रेक्षकांना नाटक आवडल्याची पावती देत होत्या. विषयही आजचा काळातला आहे आणि तो कोणाचीही बाजू न घेता उत्तम रीतीने मांडला जातो. आधीचे आणि नंतरचे बाजू बदललेले नेपथ्य आवडले. विशेषतः लिफ्टचा वापर अत्यंत नावीन्यपूर्ण.
अभिनेत्यांचा अभिनय यथायोग्य. मंगेश कदम यांचा चढलेला आवाज कधीकधी कृत्रिम वाटतो पण निरागस विनोदी शैली नेहमीप्रमाणे खूप छान. लीना भागवत आपल्या अभिनयाने सर्वच प्रसंगांत बाजी मारतात. रोहन, मधुरा ही तरुण जोडीही सहजपणे वावरते. Property वाल्याला रंगमंचावर आणण्याच्या कल्पनेलाच सलाम! पहिल्याच नाटकात लेखक, दिग्दर्शक नीरज शिरवईकरांनी एक आधुनिक विषय सादरीकरणाच्या नेहमीच्या चौकटी मोडून रंगतदार पद्धतीने रंगमंचावर आणला आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि समीक्षकांकडून गौरव पुढेही या नाटकाला मिळत राहो. पाहिले नसेल तर जरूर पहावे असे नाटक - आमने सामने.

9. एक कप कॉफी..

 #ललित

9 एक कप कॉफी..
13 oct 2022

आजची माझी सकाळ प्रसन्न केली ती नव्या पाउचमधल्या आवडत्या कॉफीच्या सुगंधी चवीने. हा कॉफीचा पुडा घरात येऊन खरंतर कितीतरी दिवस, नाही महिने झाले होते. आमच्या इंग्लंडच्या लाडक्या मित्रांनी खास माझ्या आवडीची ही कॉफी सालाबादप्रमाणे त्यांच्या भारत दौऱ्यात आणली होती. पण आधीची कॉफी बरणीत आहे, सध्या पाहुणे रावणे जास्त आहेत, हा पुडा उघडावा की.. ( शेवटी स्वार्थ कुणाला चुकलाय, नाही का! शिवाय Joee doesn't share food असं म्हणून ठेवलेलंच आहे! 😜) नंतरही चुकून वेगळी कॉफीची पुडी उघडली जाणे वगैरे कारणांमुळे हा पुडा मागे राहिला होता. आज मात्र आठवणीने तो उघडला आणि सकाळच्या गारव्यात बाल्कनीत बसून समोरची टेकडी पाहत हळूहळू घुटके घेत तिचा मनापासून आस्वाद घेतला. काय सांगू, पहिल्या घोटातच चेहऱ्यावर आपोआप स्मित उमटले. सगळा शीण जाऊन मनही अगदी ताजे तवाने झाले.
तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी कसला शीण! आता दिवाळी तोंडावर आलीय म्हटल्यावर घरोघरी साफसफाई, रंगरंगोटी, यादी, खरेदी अशी असंख्य कामे सुरू असणारच ना! आधीची तयारी जितकी नेमकी तितकी दिवाळी सुरळीत आणि आनंदात साजरी होण्याची खात्री. घर सुंदर सजवणे, फराळाचे पदार्थ मनासारखे होणे, कपडेलत्ते, भेटवस्तू, भेटीगाठी सगळे कसे यथास्थित करता येणे यावर कितीही नाही म्हटले तरी घरातल्या बाईच्या मनाची प्रसन्नता अवलंबून असतेच असते. आणि त्यासाठी आधीपासूनच ती सारा अटापिटा करत असते. मग कधीतरी ती घरातल्या इतरांवर थोडी चिडचिड करते, कधी आरडाओरडाही करते. मीही काही वेगळी नाही. पण आजच्या नव्या कॉफीने म्हणा, सकाळच्या निवांत गारव्याने म्हणा दिवसाची सुरुवात छान प्रसन्न झाली आणि अंगात नवा उत्साह आला हे मात्र खरं.
त्यामुळे एक सल्ला - तुमच्या बायकोने / नवऱ्याने (समानतेचा काळ आहे बाबा, त्याचंही नाव घ्यायला हवं😛) कामाच्या व्यापात जरी थोडी चिडचिड केली, तरी तिला / त्याला मिनिटभर बसवून आवडीचा कप हातात द्या, पता नही शायद उनका भी दिल खुश हो जाएगा!
... आणि हो, दिवाळीच्या तयारीला शुभेच्छा!

चारचौघी - एक milestone नाटक!

 चारचौघी - एक milestone नाटक!

3 ऑक्टोबर २०२२

आम्ही शाळा कॉलेजात असताना ज्या नाटकाने समाजाला मुळापासून ढवळून टाकले होते, स्वतःशी विचार करायला भाग पाडले होते, वर्तमानपत्रांतून चर्चा घडवल्या होत्या, ज्याचे प्रचंड कौतुक झाले होते असे माझ्या आठवणीतले पहिले नाटक. त्यामुळे ते परत पाहायला मिळणार याचा आनंद अवर्णनीय होता. काल चारचौघी पाहून तो दुणावला.
पडदा उघडतो आणि पुढच्या काही मिनिटांतच प्रेक्षक नाटकाशी घट्ट बांधले जातात. प्रत्येक पात्राच्या पहिल्या दोन चार वाक्यांतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आराखडा समोर उभा राहतो आणि हळूहळू तो अधिक ठळक, अधिक दमदार होऊ लागतो अशी प्रशांत दळवी या सिद्धहस्त लेखकाची तयारी; आणि पात्रांचा वावर, हावभाव किंवा माहीत नाही कशातून पण त्यांचे एकमेकांशी असलेले नाते खुलत जाते, पात्रांची खरीखुरी माणसे बनतात आणि रंगमंचावरच्या त्या घराला घरपण येते ही चंकु सरांच्या दिग्दर्शकाची मातब्बरी! रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे सारख्या अभिनेत्री असल्यावर अभिनयाची नवी नवी क्षितिजे पादाक्रांत होणार ही सार्थ अपेक्षा पूर्ण होतेच होते. इतर पात्रेही आपली कामगिरी चोख बजावतात. आपण एक अजोड कलाकृती पाहत आहोत हे पदोपदी जाणवत असते आणि तरीही आई, विद्या, वैजू आणि विनीच्या आयुष्यात आपण सहजपणे प्रवेश करतो. सुखदुःखाच्या, आशा निराशेच्या तर कधी धाडकन समोर उभ्या ठाकणाऱ्या वास्तवाच्या लाटांत भिजून जातो.
माणूस म्हणून चारचौघीन्सारख्या स्त्रीसुलभ भावभावना असणाऱ्या, आशा अपेक्षा असणाऱ्या पण तरीही आपल्या स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना स्वतंत्र विचार करणाऱ्या आणि घेतलेला निर्णय संपूर्ण जबाबदारीने निभावणाऱ्या या चारचौघी. अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत ठाम! त्यांना साथ देणारे, न देणारे जोडीदार किंवा मित्र यांच्यात घडणाऱ्या अनेक प्रसंगातून हे नाटक आपल्यासमोर सतत प्रश्न उभे करते. काय बरोबर काय चूक यापेक्षा विचारपूर्वक घेतलेल्या प्रत्येक निर्णयाशी, त्याच्या परिणामांची जबाबदारी घेऊन ठाम उभे राहण्यासाठी लागणारी वैचारिक बैठक आणि धैर्य यांचे महत्त्व विशद करते. समाजाच्या दृष्टीने बंडखोर आहात? जरूर असा पण मग त्या बंडखोरीचे परिणामही स्वीकारायची तयारी ठेवा असे जबाबदारीचे भान हे नाटक देते.
चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी या दिग्दर्शक लेखक जोडीची कमाल ही की दोघेजण दुसऱ्याचे कौतुक करताना दिसतात. पण माझ्यासारखी प्रेक्षक मात्र या दोघांच्या आणि साऱ्या कलाकारांच्या एकत्रित कामगिरीमुळे अवाक होऊन गेलेली असते. शंभर नंबरी सोनं आणि त्याला कुशल सोनाराने दिलेले तास आणि झळाळी यातून घडणारा दागिना जसा आपण वेगप्पवेगळा काढू शकत नाही तशीच ही कलाकृती. मुक्ता बर्वे ची विद्या अप्रतिम. कधीतरी हातून काहीतरी असं लिहून व्हावं ज्याला या साऱ्यांचा परीस स्पर्श लाभावा हे नेहमीचं हावरट स्वप्न!
आज ३१ वर्षांनंतरही यातील विषय जुना झालेला नाही. शुभारंभापासून प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल करत एक नवा इतिहास हे नाटक घडवत आहे. आणि त्याचे साक्षीदार होण्याची संधी आपल्या हातात आहे. मराठी नाटकांच्या इतिहासात ज्याचा कायम उल्लेख करावा लागेल असे आणि आपल्यासाठी पुन्हा रंगमंचावर आलेले हे नाटक नक्की पहा.