Thursday, 31 December 2015

पाडगावकर,

'सांग सांग भोलानाथ' ऐकून वाटलं - यांना कसं गुपित कळलं?
एवढ्या मोठ्ठ्या माणसात नक्की, लहान मूल आहे दडलं.

आवाजांचे केलेत शब्द 'अडम तडम' - ट्रिंग ट्रिंग
ब्याड म्यानर्स आजोबांना करायला लावलंत 'ढेकरिंग'

बोललात तुम्ही - झाली गाणी, चांदोबा नि फूल परी,
हसत खेळत आणून सोडलंत नव्याच एका वाटेवरी

मग दिलात 'तुमचं आमचं सेम असतं' चा दिलासा
'तुमचं काय गेलं' विचारताना होताच आधार हवासा

फुलपाखरे, पाउस, फुलांसंगे मनांना कुरवाळलत
व्यापक करून प्रेम तुमचं, साऱ्यांनाच सामावलंत

पटलं तुमचं, दार उघडलं रुसलेल्या 'चिऊताईन्नी'
'शतदा प्रेम' करायला शिकवलं, 'जगण्यावरती' कवितांनी

निघून गेलात स्वप्नांच्या राज्ज्यात, आमच्यासाठी ठेवून 'धुकं'
तुमच्याविना आज खरंच आमचं जग झालंय 'मुकं'

शिकवलंय तुम्हीच ना? शेवटी जन्म मरण एक गेम आहे,
पाडगावकर, म्हणूनच तुमच्यावरचं आजही 'प्रेम - सेम' आहे.




Friday, 18 December 2015

आनंदाची श्रीखंडगोळी

रोज पाहतो सारे, 'मोठ्या' सुखाची वाट
थोडे नसते पुरेसे, हवा पेला काठोकाठ
वाट पाहता हरवतो छोटे छोटे क्षण
निराशेने आपलेच मरगळते मन
रोज मागतो का कुणी पुरणपोळी? शोधू छोट्याशा आनंदाची श्रीखंडगोळी

रोज मोठे यश नाही चालून येत,
रोज उठून नाही कुणी डोक्यावर घेत
पण जमते कधी मैफिल कधी गप्पांचे सत्र,
फारा दिवसांनी भेटतो कधी हरवला मित्र
थोडी का होईना, पण खुलते न कळी? शोधू छोट्याशा आनंदाची श्रीखंडगोळी

नृत्य, काव्य, लेख - दाद जाते आपोआप,
बोल चिमणे ऐकून कधी आठवतो बाप
गोळा करून रोजचे असे गंमत काजवे,
अंधारले मन, लक्ख उजळून घ्यावे
सुर्याचाच हट्ट कुणी पुरवेल का अवेळी? शोधू छोट्याशा आनंदाची श्रीखंडगोळी









Monday, 14 December 2015

गुजरते है रोज वो

गुजरते है रोज वो बिन देखे हमे एक भी नजर,
डरते है शायद के कत्ल कि सजा न सुना दे हम

रास्ते कई है मकान तक जो पहुचाये उन्हे लेकिन
हमारी आंखोंसे यही गली रौशन हुआ करती है

देखकर अनदेखा करनेकी आदत हमने नही है पाली,
जो हमारीही नजरोंसे खुदको देखना मंजूर है उन्हे 

Tuesday, 24 November 2015

पसारा

खरंच सांगतो, आमच्या आईला मुळीच नाही कळत
सतत आवरायची घाई, जरा टी पी नाही खपत

घरी आल्या आल्या म्हणते, इथे आयडी कार्ड टांगा
भिरकावून नेम साधण्यात मज्जा नाही का सांगा?

गणवेश लावा हेंगरला किंवा घाला नीट घडी,
राहिला समजा खुर्चीवरच, तर काय होईल जगबुडी?

दूधच आधी प्यायचे हे तीच का ठरवणार,
मग केक, बिस्कीट, लाडू चा नंबर कधी लागणार?

डबे म्हणे आल्या आल्या सिंक मध्ये हवे,
आम्ही काय उरल्या भाजीसाठी लगेच ओरडे खावे?

मागे लागून एक दिवस आवरून घेते टेबल, खण
दुसऱ्या दिवशी सापडत नाही, काहीच जुन्या जागेवर

आईचा चेहरा हसरा दिसतो; थोडे दिवसच- काय?
जागेवरच्या वस्तू हळूहळू पसरतात हात पाय 

मात्र कधीतरी एक दिवस, मलाही हुक्की येते,
बूट गणवेश जातो जागी, दूधही गट्ट होते.

गृहपाठ पूर्ण करायला, घेतो वही जरा वेळाने
मग जवळ घेऊन आई पापाच घेते लाडाने



Wednesday, 28 October 2015

न्याय

बाळ स्वागता उत्सुक सारे, स्त्री जन्माने पडले चेहरे
अवचित दोषी ठरल्या दोघी, कन्या आणिक माय
हा कोणता न्याय?

पूजता देवी वीरांगना ती, कर्तृत्वाची गाउन महती
पण पुत्रजन्म स्त्री-कर्तृत्वाचा मापदंड ठरलाय
हा कोणता न्याय?

वरती जपुनी आधुनिकता, अंतरात परी मूर्ख क्रूरता
धैर्य तरी हे कसे आणता? मरती बालिका, हाय!
हा कोणता न्याय?

मारून टाका अजात पुत्री, छाटून टाका वंश पालवी
षंढपणाचे याहून मोठे लक्षण दुसरे काय?
लक्षण दुसरे काय?

Sunday, 11 October 2015

आज लक्ष्यात येतंय …

तू गेलीस - सुटलीस, बरं वाटलं …
असहाय शरीरात कित्येक दिवस कोंडलेलं तुझ्यातलं चैतन्य
एकदाचं मुक्त झालं -
पण हसऱ्या चेहऱ्यानं वेदना सोसायला शिकणं राहून गेलं
हे मात्र आज लक्ष्यात येतंय …

संपलं तुझं परावलंबित्व, बरं वाटलं …
थकलेल्या गात्रांना उत्साहाच्या पंखांनी दिलेलं बळ
शेवटी ओसरलं -
पण त्या न आटणाऱ्या उत्साहाचा उगम विचारायचं राहून गेलं
हे मात्र आज लक्ष्यात येतंय …

प्रसन्न जगलीस, बरं वाटलं …
समोर येईल ते आपलं मानून केवळ प्रेमच करणं
तुलाच जमलं -
पण प्रेम करून घेता घेता, तुला काही सांगायचं राहून गेलं
हे मात्र आज लक्ष्यात येतंय …





Wednesday, 7 October 2015

लबाड कोल्हा

जंगलात रहात होता, एक लबाड कोल्हा,
शिकार शोधत एकदा गावामध्ये शिरला
मागे लागले कुत्रे - पडला पिंपात चुकून,
पिंपात निळा रंग - गेला तो माखून
कोल्होबांच्या डोक्यामध्ये आली एक युक्ती,
म्हणे, 'जंगलचा मी राजा, करा माझी भक्ती'
फसले साधे भोळे प्राणी, त्याच्या ढोंगाला,
सारे हजर - निळ्या कोल्ह्याच्या सेवेला
कोल्हेकुई ऐकली, कोल्होबांना राहवेना,
सूर त्यांनी लावला, शांत बसवेना
ओळखला चोर  - ढोंग पडले गळून,
हाकलले त्याला साऱ्या प्राण्यांनी मिळून


बदलला काळ - फक्त बदलले रंग,
लबाड कोल्होबा करतात सत्संग
इच्छा करतो पूर्ण म्हणतात, संकटही दूर,
नोकरी - संतान देतो - संपत्तीचा पूर
आश्रमाची दारे यांच्या होतात जेव्हा बंद,
कोणी नाच गाण्यात कोणी मद्यपानात धुंद
लबाडी नि लूट - भरतो पापाचा घडा,
कोणीतरी राहते उभे शिकवायला धडा
सारी पापे, सारे ढोंग येते उजेडात,
सारी बुवाबाजी गोळा होते तुरुंगात
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जगण्याचे मंत्र,
शिकायलाच हवे आज पुन्हा पंचतंत्र 

सांग सांग बाप्पा सांग …

सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
पंचतंत्र वाचून आम्ही शहाणे होऊ का?
सांग सांग बाप्पा सांग, आम्ही शिकू का?

नको तेव्हा बोलून - गेला कासवाचा जीव,
तरी गाडी चालवताना मोबाईलची हाव
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
गाडी चालवताना फोन बाजूला ठेवू का?

समाजात वावरती किती कोल्हे निळे,
आतली लबाडी कशी कुणाला न कळे?
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
ढोंग, बुवाबाजी आम्ही ओळखू शकू का?

क्रूर सिंह फसे - उडी मारे विहिरीत,
चतुर सश्याने केली त्याच्यावर मात,
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
दहशतवाद असा संपवू शकू का?

कबुतरे सारी जाळे घेऊन उडाली,
उंदीर मित्रांनी त्यांची मुक्तताही केली
सांग सांग बाप्पा सांग आम्ही शिकू का?
मदत करून एकमेकां, प्रगती करू का?

Thursday, 10 September 2015

तारण

सुकली शेते, आटली तळी, अंगाची लाही लाही
मुदत संपली - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

फोडले डोंगर, तोडले वृक्ष, सिमेंट जंगल ठाई ठाई
balance नाही - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

धन्यानेच गिळल्या विहिरी, धरणांनाही कागद खाई
package नाही - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

आपल्यापुरतेच पहिले फक्त, न करता विचार काही
विश्वास नाही - निसर्ग म्हणतो, आता खात्री देत नाही

हिरवेगार डोंगर- झाडी, नद्या स्वच्छ आणि प्रवाही
तारण ठेवा - निसर्ग म्हणतो, नाहीतर पुन्हा पाऊस नाही


Tuesday, 8 September 2015

संशयाचे बोट

आजोबांचा मित्र एकदा आला होता घरी,
आजोबाच समजून मी रेलले अंगावरी
फाजितीने माझ्या झाला हास्याचा स्फोट
पण मित्राकडे नव्हते कधीच संशयाचे बोट

होतो पाचसहा जण, पण एकच मिळाली रिक्षा
मग मांडीवरच बसण्याची आम्हा मुलांना शिक्षा
दंडावरच्या पकडीत सुद्धा नव्हती कसली खोट
काका मामांकडे नव्हते कधीच संशयाचे बोट

खेळायला घेऊन जात शेजार पाजारचे काका,
कुठल्या कुठे असायचो आम्ही, मैदाने नि बागा
आई बाबांच्या परवानगीची लागत नव्हती नोट
शेजारच्यांकडेही कधीच नव्हते संशयाचे बोट

शाळा, बस, घरातही आज, कुणी शोधत असतो संधी
विकृत नजरेला बालक दिसते - नर किंवा मादी
वासनेनी वात्सल्याचा घेतला आहे का घोट ?
प्रत्येकावरच रोखलेले संशयाचे बोट 

Friday, 14 August 2015

फू बाई फू

फू बाई फू, फुगडी फू
थकला ग जीव कशी सिरियल पाहू ग सिरियल पाहू?

बाळंतीणी झाल्या, गर्भारशी होतकरू,
तरीसुद्धा जान्हवीचे डोहाळेच सुरु - आता फुगडी फू

लाड बायकोचे श्रीही वहावत गेला,
डोहाळे पुरवी, घरी पाणीपुरी ठेला - आता फुगडी फू

एक वाक्य बोलती त्या चार चार वेळा,
दाबावे वाटतो तेव्हा एकेकीचा गळा - आता फुगडी फू

रहस्य, गैरसमज आणि लपवा छपवी,
गोष्ट लांबवण्यासाठी रोज युक्ती नवनवी - आता फुगडी फू

जान्हवी, इच्छा म्हातारीची, जरा ध्यानी ठेवी,
वाटते बाळ दिसो डोळे मिटण्यापुरवी - आता फुगडी फू 

Tuesday, 11 August 2015

माणुसकी

मुसळधार पावसात सर्रकन पाणी फवारत जात होत्या
लांबलचक गाडया
आणि विरळ झाडाखाली उभं राहून
मी जपत होते माझा कोरडेपणा
पागोळ्यांखाली लावलेली पातेली चुकवत बाहेर येउन
तिने एक छत्री दिली मला … मी अनोळखीच
मग पाऊस वाढतच गेला
त्या छत्रीनेही थोडे भिजवलेच मला
मी…  पावसाच्या माऱ्यापुढे हतबल
मग तिने चक्क आतच बोलावले
धरले माझ्या डोक्यावर ओलसर, गळके छप्पर तिच्या झोपडीचे
'अच्छा! माणुसकी इथे लपून बसली आहे तर… '
चिंब झालेले माझे मन म्हणाले 

Monday, 10 August 2015

जाहिरात

नेमलेलेच काम पण त्याला नाव लोकसेवा
केलेल्या प्रत्येक कामाचा फोटो पेपरमध्ये हवा
योजनांच्या घोषणाच फक्त कानांवर आदळतात
कामकाजापेक्षा महत्वाची झालीये त्याची जाहिरात

समाजसेवेसाठी हल्ली लागतो युनिफोर्म
लोगोवाली टोपी, टी शर्ट चा इंतजाम
कार्यकर्त्यांपेक्षा, मिडीयावालेच दिसतात जोमात
कष्टांपेक्षा महत्वाची झालीये त्यांची जाहिरात

असो स्वच्छता अभियान वा स्वास्थ्यासाठी रेली,
एका चौरस मीटरमध्येच गर्दी करिती सारी
झाडू सोडून, चटकन घेतात माईकच हातात
कामापेक्षा महत्वाची झालीये त्याची जाहिरात

वाढदिवसाच्या शुभेच्छा हि तर सोन्यासारखी संधी 
मोठ्या मोठ्या फ्लेक्स मध्ये शुभेछुकांची गर्दी
श्रद्धांजलीचे दुःखहि झळकते चौकाचौकात
भावनांपेक्षा महत्वाची झालीये त्यांची जाहिरात

छोट्या गोष्टी जगभर पोहोचवतात माध्यमे
तोच मोठा ज्याला प्रसिद्धी बरोब्बर जमे,
कारण करण्यापेक्षा दाखवण्याचा आज आहे प्रघात,
कामापेक्षा महत्वाची झालीये त्याची जाहिरात








Thursday, 6 August 2015

मृत्यू

एक मृत्यू जन्माला घालतो,
अचानक…. एकटेपणा
आणि कुणी शोधत राहते
अस्तित्वाच्या पाऊलखुणा
एक मृत्यू उडवून टाकतो,
छप्परच - दुष्टपणे
आणि हरवतात अकालीच
कुठेतरी बालपणे
एक मृत्यू लावतो ओढ
अज्ञाताच्या वाटेची
पण कुणालाच चुकत नसते,
वाटचाल त्या आधीची
मग म्हणावे त्या मृत्यूला,
तू एक दगड मैलाचा
गाठणं आहे टप्पा मजला
पुढच्या अवघड वळणाचा
त्यांची आठवण, त्यांची शिकवण
गाठी आहे बरंच काही,
कारण काही गोष्टी हिरावून
तू ही घेऊ शकत नाहीस

Saturday, 1 August 2015

एखादाच शब्द

एखादाच शब्द
खेचून आणतो जुने वादळ शमलेले
एखादाच शब्द
हिंदकळवतो तळे काठोकाठ भरलेले
जिभेला तर नसतेच माहित
ताकद त्या एका शब्दाची
कानही बेपर्वा ऐकून घेतात
ती ठिणगी अकल्पित परिणामांची
शब्द काळजात टोचल्यानंतर
जन्म होतो अर्थाचा
आतल्या आत मन करते
मग आकांत व्यर्थाचा
चूक नसते शब्दाची
नसतो दोषही जिभेचा
मनच वेडे पुन्हा अडकते
नस्ता घोळ भावनांचा 

Friday, 10 July 2015

आमचा diet plan

'आजपासून ठरलं ' यांनी घरात शिरता शिरताच घोषणा केली. 'हं ' मी मनात म्हटलं, आज काय नवीन? 'ऐकलंस का वैशु, मला कोमट पाणी आण जरा लिंबू आणि मध घालून.' 'काय?' मी जवळ जवळ ओरडलेच. आज गरमागरम चहाच्या ऐवजी चक्क लिंबू पाणी आणि तेही कोमट? 'काय हो, बरे आहात न?' 'येस, बरा आहे, आजपासून ठरलंय माझं- मी diet चा एक प्लान फॉलो करणार आहे. वैशु, आपली आजकालची जीवनपद्धती, राहणीमान यांचा विचार करता आपण गरजेपेक्षा खूप जास्त खातो, असं नाही तुला वाटत?' ' तुमचं आजकालचं वजन पाहता नक्कीच वाटतं' मी मनात म्हटलं. 'हा सगळा चुकीच्या आहाराचा परिणाम आहे. पूर्वीची माणस अशी सुटलेली दिसायची नाहीत कारण सात्विक आहार. आपण हल्ली सारखा चहा पितो, त्यातून किती साखर पोटात जातेय याची कल्पनाही नसेल तुला.' हि कल्पना यांना आल्याची कल्पना मला खरोखरच न आल्यामुळे मी नकळत पुढे केलेला चहा तितक्याच नकळत संपवून यांनी कप खाली ठेवला. 'तू पण तुझी कॉफी जर कमीच कर. आमच्या ऑफिसातला तो नायर ५किमीची marathon  पळाला. गेल्या महिन्यापर्यंत केवळ गाडी ते लिफ्ट आणि लिफ्ट ते त्याचं टेबल एवढंच चालायचा. त्याने रेस पूर्ण केली, विचार कशी?' 'कशी?' माझी दिवसभरातील एकमेव विसावा असलेली कॉफी काढल्यामुळे आलेला राग न दाखवता मी आज्ञाधारकपणे विचारले.  'diet plan, हे बघ मी त्याची एक कॉपी काढून आणली आहे तुला दाखवायला. 'बापरे' मी जरा घाबरतच ती लिस्ट हातात घेतली.

'ते बघ' लिस्ट मधील एक एक गोष्ट समजावून सांगत हे बोलू लागले, 'सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी, मग केवळ एक फळ. पण कोणतेही नाही हं, वजन वाढवणारी फळे वर्ज. आंबे, केळी, सीताफळ, सफरचंद चालणार नाहीत.' 'अहो पण मग आणखी कुठली फळे असतात?' मी न राहवून विचारले. मुंबईत लहानाची मोठी झाल्यामुळे फळवाल्याच्या गाडीवर सामान्यतः जी फळे दिसतात तेवढीच माहित. 'डाळिंब फार चांगलं तब्येतीला. तू असं करत जा, सकाळी चहाच्या ऐवजी डाळींबाचा ज्यूस पीत जाईन मी.' 'अहो पण मग दाणेच खा न डाळिंबाचे.' मी म्हणत होते, पण तो पर्यंत यांचा उत्साह लिस्ट मधील पुढच्या गोष्टीकडे वळला होता. ' मग नाश्ता बरं का वैशु …. ' 'म्हणजे? अजून नाश्ता आहे?' मी बोलून गेले. 'अग, शरीराला कॅल्शियम नको का मिळायला? हे बघ नाश्त्याला गाईच्या दुधाबरोबर कोर्नफ्लेक्स, साखर नाही, वाटल्यास थोडा मध. नो पोहे, उपमा. बघ, तुझं सकाळचं काम किती कमी करतोय मी.' 'खरंच ' मी म्हणाले, माझ्या डोळ्यासमोर गाळण्यात डाळिंबाचे दाणे चिरडून खाली ग्लासात थेंब थेंब पडणारा रसाभिषेक भक्तिभावाने पाहणारी मी दिसू लागले. 'पुढे?' मी विचारले, ' जेवणाचे काय?' 'थांब, हे पहा, सकाळी अकराच्या सुमारास थोडी भूक लागते आपल्याला, तेव्हा मिड मोर्निंग नाश्ता म्हणून गाजर, काकडी असं काहीतरी देत जा डब्यात. आणि मग नेहमीसारखी पोळी भाजी. संध्याकाळी आल्यावर मोड आलेली कडधान्य खात जाईन आणि मग रात्री फक्त भाकरी आणि पालेभाजी नो भात.'  संध्याकाळी चिवडा, लाडू, कचोरी, बाकरवडी, बटाटेवडा किंवा अगदीच काही नाही तर चिप्स, वेफर्स यांची जागा चक्क मोड आलेल्या कडधान्यांनी घेतलेली पाहून गहिवरूनच आले मला. 'एवढ्याने भागेल का तुमचं?' मी न राहवून विचारले, ' आणि अक्ख्या दिवसात चहा नाही? असं एकदम सगळं बंद करण्यापेक्षा हळूहळू कमी करत आणलत तर?' 'हेच हेच, तुम्ही बायका पाय मागेच खेचा. आता मी ठरवलंय, त्यात बदल नाही.' हे निश्चयाने म्हणाले, 'उद्यापासून लिफ्ट सुद्धा वापरणार नाहीये मी, रोज पाच वाजता उठून मोर्निंग वॉक. तू सुद्धा यायचं आहेस माझ्याबरोबर.' 'पाच? नको हो' माझा स्वर फारच केविलवाणा झाला असावा कारण नंतर यांनी फार ताणून धरले नाही. तेवढ्यात कन्यारत्न क्लासमधून आणि चिरंजीव फुटबॉल खेळून वर आले. आणि मग जिम लावावी कि घरीच व्यायाम करावा यावर तिघांचा परिसंवाद सुरु झाला.

माझ्या डोक्यात गृहिणी सुलभ calculations सुरु झाली होती. डाळींबाचा ज्यूस नाही का, किलो दोन किलो डाळिंब आणून ठेवायला हवीत. गाजर, काकड्या आणि हो जास्तीची कडधान्य सुद्धा. दुधवाल्याला उद्यापासून गाईचे दुध सांगायला हवे. या निमित्ताने कोर्नफ्लेक्स ची हि खरेदी होणार. पालेभाज्या आणून निवडून ठेवायला हव्यात. आणि रात्री भाकरी म्हणजे तेही पीठ दळून आणायला हवं. भाकरीला हल्ली फारच चांगले दिवस आलेत म्हणायचे. पूर्वी भाकरी म्हणजे गरिबांचं अन्न म्हणून नाकं मुरडायचे लोक. लगेच पिशव्या घेऊन बाहेर निघाले. आईबरोबर बाहेर पडायचे आणि तेही भाजी आणायला म्हणजे चिरंजीवांना मोठेच संकट, त्यामुळे ते जिम मध्ये वेट लिफ्टिंग करायला पळाले. कन्यारत्नाला खूप म्हणजे खूपच अभ्यास होता त्यामुळे त्या स्मार्ट फोनवरूनच रिसर्च करण्यात बिझी होत्या. तास झाला असला तरी आत्ताच ऑफिसमधून आल्याचे अहोंचे कारण ताजेच होते, शिवाय मुलांबरोबरची चर्चा झाल्यावर आता टीव्ही वर योग आणि योग्य आहारविषयक कार्यक्रम बघणे त्यांना क्रमप्राप्तच होते. त्यामुळे राहता राहिले मीच, मी जिम मधेही जात नाही, अभ्यासही करत नाही आणि टीव्ही बघायला मला अक्खा दिवस मोकळाच असतो त्यामुळे पिशव्या घेऊन मीच बाहेर पडले. यामुळे माझा वॉक तर होईलच पण वेट उचलल्यामुळे स्नायूही बळकट होतील याचीही यांनी आठवण करून दिली.

दुसरा दिवस उजाडला, नेहमीपेक्षा थोडा लवकरच. यांच्या पाचच्या गजराने मला जाग आली. आमच्याकडे सर्वांनाच कानाचा थोडा त्रास आहे. सिलेक्टेड गोष्टीच त्यांना ऐकू येतात. त्यामुळे गजर ऐकून उठून मग यांना उठवणे या कामावरही माझीच नेमणूक झाली होती. तेवढ्यात आठवले, उठल्यावर लिंबू पाणी. यांच्या चेहऱ्यावर 'चहा … चहा …. ' असे स्पष्ट लिहिलेले मला दिसत होते पण ठरल्याप्रमाणे लिंबू पाणी घेऊन बूट घालून ते बाहेर पडले. चला आता डाळींबाचा ज्यूस. मी स्वयंपाकघराकडे वळले. अर्धवट पेंगलेल्या डोळ्यांनी डाळिंब सोलणे, दाणे काढणे आणि मग ज्यूस, हे काही सोपे नाही. गरजूंनी खात्री करून घ्यावी. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत असतो. दुध तापवणे, डब्यासाठी भाजी चिरणे, फोडणीला टाकणे, कणिक भिजवणे आणि पोळ्या या फास्ट ट्रेनच्या आड असे वेळखाऊ मालगाडी काम आले कि सगळा तालच बिघडतो. हे येईपर्यंत ओट्यावर दोन डाळींबाची कत्तल होऊन अर्धा ग्लास ज्यूस तयार झाला होता. त्याचबरोबर माझा मार्बलचा ओटा, शेगडी, भिंत यावर लाल शिंतोड्यांची  कलाकृती आणि माझ्या हातावर चिकट राप हे साईड इफेक्ट्स सुद्धा प्रेक्षणीय होते. ज्यूस पिउन झाल्यावर हे अंघोळीला गेले.

तोवर कन्यारत्न उठले. तिची सकाळची शाळा, त्यातून आज शुक्रवार म्हणजे डब्यात काहीतरी खास हवे. 'आई, सगळ्याजणी किती छान काय काय आणतात, नुडल्स, पास्ता, पिझा'. असे बरेच वेळा ऐकून झाल्यामुळे मी इडलीचे पीठ आणून ठेवले होते. गरम गरम वाफाळत्या इडल्या काढत असतानाच हे आवरून आले. एक क्षण इडलीचा मोह नक्कीच झाला असणार पण दुधात बेचव कोर्नफ्लेक्स खाणेच आज नशिबी होते न. आजच तुला इडली करायची होती, अश्या नजरेने माझ्याकडे पाहून अनिच्छेने कोर्नफ्लेक्सचा चमचा यांनी तोंडात घेतला. तोवर चिरंजीवही उठून आले. त्याचे तंत्र यांच्या उलट. 'माझ्या उंचीच्या मानाने अजून थोडे वजन वाढले पाहिजे असे काल सांगत होते सर, माझ्या प्रोटीन शेक मध्ये एक बनाना पण घाल आज' अशी सूचना देऊन ते बाथरूम मध्ये घुसले. गरजेप्रमाणे वजन वाढवणे, कमी करणे, पौष्टिक असूनही चविष्ट असणे, नवीन वेगळे असणे आणि तरीही पटकन बनणे हे सारे गुणधर्म असणाऱ्या पदार्थाचा शोध कोणी लावला तर कित्ती छान होईल असा विचार सकाळ भर माझ्या मनात घोळत होता. डाळिंब सोलताना, ज्यूस काढताना, ओटा पुसताना, इडली बनवताना, कोर्नफ्लेक्स दुधात ओतताना आणि प्रोटीन शेक घुसळतानाही. हे सर्व होईपर्यंत सात वाजून गेले आणि तरीही पोळीभाजीचा पत्ताच नव्हता. शिवाय गाजर, काकडीचे काप करणे बाकीच होतेच. मुरारबाजीच्या आवेशाने या विरांगनेने मग साऱ्या कामांचा फडशा पडला. भरभर डबे भरून वेळेवर सगळ्यांना बाहेर धाडले. आणि मग सकाळपासून खुणावत असलेला कॉफीचा मग आणि वर्तमानपत्र हातात घेऊन निवांत बसले. सकाळचे सत्र तरी छान पार पडल्याचे समाधान होते. पण कॉफी संपवून आत गेल्यावर तेही संपुष्टात आले. बाई यायच्या आत स्वयंपाकाची सारी भांडी मोकळी करून द्यायला हवी. घरातल्या बाईला मोलकरीण बाईपेक्षा मोठा धाक कोणाचाच असत नाही. मुकाट्याने तिथली आवराआवरी करून जरा थकूनच बाहेर सोफ्यावर येउन बसले आणि तिची बेल वाजलीच.

संध्याकाळी हे घरी आले, तेव्हा कालचा उत्साह जरा मंदावलेलाच वाटला. पण निश्चय कायम होता त्यामुळे मोड आलेले मुग मीठ आणि लिंबू घालून पोटात गेले. 'वैशु, आज जास्त फिट वाटतोय का ग मी? एकदम हलकं हलकं वाटतंय. त्या मूर्ख देशपांडेबाईमुळे थोडे कुपथ्य झाले. मुलाला नोकरी लागल्याचे पेढे घेऊन आली होती. मी नको म्हणून बघितलं पण चार चौघात वाईट दिसत न, त्यामुळे खावा लागला पेढा.' 'पण संयम ठेवायचा न थोडा, घरी घेऊन यायचा पेढा. पहिल्याच दिवशी नियम मोडलात.' मी म्हटलं पण पेढा समोर दिसल्यावर असं काही सुचणं यांना शक्यच नव्हतं हे मी हि जाणून होते. मी रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. हे फक्त भाजी भाकरी खाणार असले तरी बाकी सर्वांसाठी बाकीचं जेवण करणं भाग होतं.

त्या दिवसापासून आमच्या घरी रोज नवे ज्यूस बनु लागले, रोज नव्या कडधन्यांना मोड येऊ लागले. भाज्यांच्या तेल विरहित, कमी गुळ, कमी मिठाच्या पाककृती सुचवल्या जाऊ लागल्या. कच्च, शिजेलेलं, भाजलेलं सर्व पदार्थातील क्यालरीज मोजल्या जाऊ लागल्या. पदार्थ पौष्टिक, चविष्ट आणि लो क्यालरी कसा बनेल यावर चर्चासत्रे घडू लागली. घरात दोन तरुण वाढती मुलं असल्यामुळे त्यांच्या भुकेला खाद्य देणे हे मातृकर्तव्य पार पाडणं हि तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत माझं किचन काही सुटेना. दुधवाल्याने गायीऐवजी म्हशीचे दुध टाकलेय, मटकी ला मोडच आले नाहीयेत, भाकरीचं पीठच संपलंय अशी भीतीदायक स्वप्न मला पडू लागली. पण हळूहळू लक्षात आलं, हा diet plan मी जेवढा मनावर घेतला होता तेवढा आणखी कुणीच घेतला नव्हता.

सकाळचा पाचचा गजर पूर्वीसारखा सहाचा झाला होता, पाऊस सुरु झाल्याचे कारण देऊन जॉगिंग चे बूट खणात गायब झाले होते. सकाळी मला दोन दोन नाश्ते बनवायचा त्रास नको च्या नावाखाली बेचव कोर्नफ्लेक्स बंद झाले होते. मुलांसाठी म्हणून केलेला भरपूर क्यालरीयुक्त पदार्थ 'बघू जरा चव' असं म्हणून चापला जाऊ लागला. चहा तर दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा सुरु झाला होता. येउन जाऊन 'तू कशी diet plan फॉलो करत नाहीस, तुला कशी प्रकृतीची काळजीच नाही, तुला कसा व्यायामाचा आळसच आहे' हे ऐकवणं मात्र चालू होतं. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं, diet हा मुख्यत्वे पाळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. सर्व खातात ते अन्न न खाता, वेगळे पदार्थ खाणे किमानपक्षी त्याच्यावर बोलणे जमले कि झाले. घरात खाद्यपदार्थ बनवणारी व्यक्ती दुसरी असेल तर आणखीच छान. मग व्यायाम हि एकच जबाबदारी उरते, आणि तोही रोज करणे सहज टाळता येते. वेळच नाही, पाऊसच आहे, पायच दुखतायत, व्यायामाचे कपडेच वाळले नाहीत अशी अनेक कारणे अभ्यासुंनी शोधून काढली आहेत. मग असं diet करून वजन कमी झालं तरच नवल.

त्यामुळे एका संध्याकाळी हे बरोबर दोन मित्र आणि वडापावचे पार्सल घेऊन आले तेव्हा मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. 'अग ऐकलंस का वैशु, आज माझं diet सुरु होऊन एक आठवडा पूर्ण झाला, त्याबद्दल बक्षीस म्हणून आज वडापाव पार्टी करू आपण. तू जरा चहा ठेव बघू' यांनी पार्सल माझ्या हातात देत म्हटलं. 'वाहिनी, diet याचं चालू आहे म्हणतोय पण तुम्ही जास्त स्लिम दिसताय. इसका राज क्या है?' यांच्या मित्राने विचारलं. सकाळी लवकर उठून धावपळ, भाजीपाला फळे यासाठी झालेल्या जास्तीच्या फेऱ्या, दळण, सामानाच्या पिशव्यांचे वेट लिफ्टिंग सारे माझ्या डोळ्यासमोर चमकून गेले. आणि स्लिम दिसण्याचा राज म्हणून 'यांचा diet plan' असे अतिशय खरेखुरे उत्तर माझ्या सस्मित मुखातून बाहेर पडले.








Monday, 6 July 2015

कबुली

मी डॉ. नरेश काळे. मानसोपचारतज्ञ. दवाखान्याची वेळ संपतच आली होती. मी नंदिताला फोन करून शेवटच्या पेशंटला आत पाठवायला सांगितले. 'बोला, काय करू शकतो मी तुमच्यासाठी?' मी त्या बाईंना विचारले. 'डॉक्टर, मी माझ्या मुलाची केस घेऊन तुमच्याकडे आले आहे. मी डॉ. वसुंधरा सबनीस.' नाव नक्कीच ओळखीचे होते. 'ओह! मी म्हटले,' म्हणजे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. वसुंधरा सबनीस तुम्हीच का?' 'होय मीच. मला तुमची मदत हवी आहे. माझा मुलगा भास्कर, भास्कर सबनीस हा देखील एक हुशार जीवशास्त्रज्ञ आहे. लंडन मध्ये शिक्षण पूर्ण करून चार महिन्यांपूर्वी इथेच माझ्याबरोबर काम सुरु केलय त्याने. आम्ही दोघ मिळून एक अत्यंत महत्वाचं, जीवशास्त्रात क्रांती करेल असं संशोधन करत आहोत. दोन महिन्यापूर्वी अदिती आली. तीही जीवशास्त्राची एक हुशार विद्यार्थिनी आहे. तिची मेहनत आणि हुशारी पाहूनच मी तिला आमच्या मुख्य संशोधनात सहभागी करून घेतलं. काम करता करता ती भास्करच्या खूप जवळ आली. भास्करने एक दिवस मला सर्व सांगितलं. माझी परवानगी नसण्याचं काही कारणच नव्हतं. मी आनंदाने दोघांचा साखरपुडा करून टाकला. पण हळूहळू सगळं बदलत गेलं. एक दिवस त्याने अदितीला त्याच्या नकळत काही नोट्स घेताना पाहिलं. मला वाटतं तेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली.' इथे त्या जरा थांबल्या. मग पुन्हा बोलू लागल्या, ' गेले काही दिवस भास्कर खूप विचित्र वागतोय. संशयी झालाय, त्याच्या प्रयोगशाळेत कुणीच गेलेलं त्याला चालत नाही. पूर्वी आमच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल आमची अनेकदा चर्चा व्हायची. तो त्याचे अंदाज, निरीक्षणे सांगायचा, माझं मत विचारायचा. पण आता असं काहीच होत नाही. तो विषय निघाला कि तो एकदम सावध होतो. कालचा त्याचा चेहरा, आवाज आठवला कि अजूनही काटा येतो अंगावर. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. अदिती बाजूला उभी होती. बराच वेळ शब्दही बोलला नव्हता, पण मग एकदम कर्कश आवाजात ओरडला, 'माझा विश्वास नाही तुम्हा कोणावरच. तुम्ही सारे माझं संशोधन चोरायला टपला आहात. पण मी माझं मोलाचं काम तुमच्या हाती नाही लागू देणार ..... कधीच नाही.' अजून आठवतोय तो चेहरा- डोळ्यात संशय, भीती आणि राग. अदिती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा मला पहिल्यांदा तिचा संशय आला. ही तर अस काही करत नसेल न? भास्करनी एकदा तिला कागद चाळताना पाहिलेलं होतं. पण मी? माझ्यावरही संशय? कि तिने विश्वासघात केल्यामुळे तो मनःशांती हरवून बसला? काही कळेनास झालंय मला. मला मदत करा आणि माझ्या भास्करला यातून बाहेर काढा.' त्या थांबल्या. डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. 'मी नक्की भेटेन भास्करला' मी त्यांना धीर दिला. त्यांच्या विनंतीवरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या घरी जाण्याचे मी कबुल केले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर पाच वाजता मी डॉ. सबनिसांच्या बंगल्याशी पोचलो. बंगल्याला लागुनच प्रयोगशाळेची बैठी इमारत होती. डॉ. वसुंधरा स्वतः दार उघडायला आल्या, आम्ही आत आलो. भास्कर मला भेटायला तयार नव्हता. मला याचा अंदाज होताच. मी म्हणालो, ' काही हरकत नाही, आपण असे करू, त्तुम्ही त्याला सांगा, मी काहीही प्रश्न विचारणार नाही. त्याने केवळ बाहेर यावे. माझ्यामुळे त्याला त्रास होतोय असे वाटले तर खुशाल निघून जावे, मला काही वाटणार नाही'.

माझा निरोप आत गेल्यानंतर दहा मिनिटांनी भास्कर बाहेर आला. त्याची संशयी नजर सगळीकडे भिरभिरत होती. 'काळजी करू नकोस भास्कर, यांना सांग सगळं.' डॉ. वसुंधरा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या. त्याबरोबर तो दचकला. त्याने खांद्यावरचा हात झटकून टाकला. खुर्ची मागे करून झटकन उभा राहिला. ' हात लाऊ नकोस मला, तू लांब जा, कुणी जवळ यायचं  नाही माझ्या. का जाऊ मी?' भास्कर जवळ जवळ किंचाळून बोलला. ' नाही नाही, तू जाऊ नकोस, मीच जाते हव तर' एवढे बोलून त्या आत निघून गेल्या.

'हेल्लो, मी डॉ. नरेश काळे. प्रथम तुमचं अभिनंदन भास्कर' मी हात पुढे करत म्हटल. 'परदेशात उच्च शिक्षण घेऊनही तुम्ही इथे काम करायचा निर्णय घेतलात. सोपं नाही ते.' भास्कर चा चेहरा थोडा निवळला. 'डॉक्टर मला माहित आहे ममीने तुम्हाला का बोलावलंय ते. तिला वाटतंय मला भास होतायत. पण तसं नाहीये, मला पक्की खात्री आहे. माझं संशोधन चोरण्याचा प्रयत्न चालू आहे.' तो इकडे तिकडे पाहत घाईघाईने बोलू लागला, ' मी बघितलंय, मी नसताना माझं काम, माझी निरीक्षणे, माझे निष्कर्ष पहायचा प्रयत्न करतेय ती. माझं श्रेय लाटायचंय तिला.' 'पण कोणाला?' मी न राहवून विचारलं. त्याने ऐकलं कि नाही कुणास ठाऊक पण स्वतःशीच बोलल्यासारखा तो हळू पण घाईघाईने बोलत राहीला, 'डॉक्टर विश्वास ठेवा माझ्यावर, मला होताहेत ते भास नाहीयेत. माणसाच्या मेमरीमधील ज्ञान अमर ठेवण्यासाठी संशोधन करतोय मी. मेंदूच्या मज्जासंस्थेमध्ये साठवलेले ज्ञान दुसरीकडे स्थलांतरित कसे करता येईल यावर काम चालू आहे माझे. माझा क्रांतिकारक शोध तिला आयता हवा आहे आणि तोही स्वतःच्या नावावर. मी ते कधीच होऊ देणार नाही. कोणावरच आता विश्वास नाहीये माझा. कोणावरच.' तेवढ्यात डॉ. वसुंधरा परत आल्या, मग पुढे काही बोलणे झाले नाही.

त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. भास्कर सांगतोय त्यात तथ्य असेल का? एकदा आदितीशी बोलायला हवं, पण कसं ? पण त्याचीही वाट पहावी लागली नाही. मी क्लिनिक वर पोचतोय तो अदितीच माझी वाट पाहत होती.
मी आत येताच तिने बोलायला सुरुवात केली. ' डॉक्टर, मी अदिती. मी डॉ. वसुंधरा सबनिसांच्या प्रयोगशाळेत सहायक म्हणून काम करते. तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मला- नोकरी मिळाल्यावर खूप खुश होते मी. माझं आणि भास्करच ट्युनिंग हि छान जमलं होतं. भास्कर माझ्याबरोबर जास्त वेळ घालवतोय, त्याच्या प्रयोगांबद्दल ममींपेक्षा जास्त माझ्याशी चर्चा करतोय हे हळूहळू ममींना जाणवायला लागलं आणि ते त्यांना आवडत नव्हतं. संशोधनात त्याने त्यांच्यापेक्षा माझ्यावर विश्वास दाखवावा हे त्यांना सहन झालं नसावं, आणि मग त्यांनी भास्करचे कान माझ्याविरुद्ध फुंकण्यास सुरुवात केली. माझ्यावर संशोधन-चोरीचे खोटे आरोप केले. सुरुवातीला भास्करला ते पटले आणि त्याने मला प्रयोगशाळेत यायची बंदी केली. एक दिवस मी माझं सामान न्यायला गेले तेव्हा ममी त्याची कागदपत्रे पाहत होत्या. मी त्यांच्या नकळत ते भास्करला दाखवल तेव्हा मात्र भास्कर चमकला. मी समजावले त्याला, त्याचं संशोधन चोरण्याचा प्रयत्न करणारी त्याची आईच आहे. तुम्हाला माहित नसेल कदाचित पण गेल्या बऱ्याच वर्षात त्यांच्या नावावर कोणतेही नवीन संशोधन नाहीये. या शोधाची नितांत गरज आहे त्यांना. त्यांना पक्के माहित आहे, भास्कर त्याचे संशोधन दुसऱ्या कोणाच्याही नावाने प्रसिद्ध होऊ देणार नाही. कधीच नाही. म्हणून अश्या मार्गाने त्या प्रयत्न करतायत. सख्ख्या आईचा विश्वासघात फार लागला त्याच्या मनाला. खूप त्रास झाला त्याला आणि त्यानंतर त्याचे विचित्र वागणे सुरु झाले. फक्त अविश्वास आणि संशय… असेच चालू राहिले तर तो कामच करू शकणार नाही आणि सारे काही डॉ. वसुंधरांच्या हातात आयते जाईल. डॉ. वसुंधरांची हि दुसरी बाजूहि तुम्हाला माहित असावी म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. प्लीज आम्हाला मदत करा.'

ती निघून गेली पण मी मात्र पुरता चक्रावून गेलो. आतून जाणवत होते, कोणीतरी काहीतरी चुकीच करण्याचा प्रयत्न करतंय. मी फोन करून भास्करला बोलावून घेतले. माझ्यावर विश्वास ठेवून तो आला. आम्ही दोघांनी बराच वेळ चर्चा केली. माझी आता पूर्ण खात्री पटली कि भास्करला होणारे भास हे डॉ. वसुंधरानी शोधलेलं एक निमित्त होतं, त्याला त्याच्या संशोधनापासून बाजूला ठेवण्यासाठी. पण मी असं होऊ देणार नव्हतो. मी भास्करला समजावलं, कि त्याने डॉ. वसुंधरांशी स्पष्ट बोलावं आणि पुन्हा असं न करण्याची समज द्यावी अन्यथा मानहानीची किंवा अखेर पोलिसांची भीती घालावी. याने काम झालं नाही तर मी होतोच. पण तशी वेळच आली नाही.

२-३ वर्षे झाली असतील या गोष्टीला. आज सकाळीच मेडिकल जर्नल मध्ये मी भास्करचा फोटो पहिला आणि त्याच्या यशस्वी संशोधनाबद्दलही वाचलं. अखेर ज्याचे श्रेय त्याला मिळाले. मग माझी नजर आलेल्या पत्रांकडे गेली. एक पत्र अदितीकडून आले होते. माझ्या मदतीबद्दल आठवणीने पत्र पाठवलेय बहुदा. पत्र उघडून मी वाचू लागलो.

'नमस्कार डॉक्टर, मी अदिती, मिसेस अदिती भास्कर सबनीस. तुम्हाला कदाचित कळले असेल, आमचे संशोधन पूर्ण झालेय. भास्करच्या पेपरला मेडिकल जर्नल मध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. आमच्या शोधामुळे मेंदूच्या मज्जासंस्थेतील ज्ञान स्थलांतरित करता येईल अशी शक्यता निर्माण झालीये. उंदारांवरील प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवलाय.…  हो, पण माणसावरचा मात्र कुणाला माहीतही नाही … काही गोष्टी तुम्हाला सांगायला हव्यात, मी तुमच्याकडे भास्करची बाजू मांडायला आले होते, तेव्हा जे काही बोलले ते खरेच होते. पण नंतर हळूहळू मला त्यातील फोलपणा जाणवायला लागला. तुमचे ठरल्याप्रमाणे भास्कर ममींशी स्पष्ट बोलला. त्यांच्या तोंडावर तो त्यांना चोर म्हणाला. ते ऐकून ममी कोसळल्याच. त्यानंतर ममींनी अंथरूण धरलं ते कायमचंच. मी आणि भास्कर पुन्हा एकत्र काम करू लागलो. हळूहळू भास्करच्या बुद्धिमत्तेचा तोकडेपणा माझ्या लक्ष्यात येऊ लागला. तो जरी लंडनला जाऊन शिकून आला होता, तरी नवीन विचार मांडण्याची त्याची क्षमता नव्हती. सर्व प्रयोग माझ्या हुशारीने मी पुढे चालवत होते. आता तुम्ही म्हणाल कि तो हुशार नसता, तर मुळात हा शोध कसा लावू शकला? तर आता नीट ऐका- हे संशोधन त्याचं नव्हतं, कधीच नव्हतं. ते सुरु केलं होतं डॉ. वसुंधरांनी. भास्कर इतक्या बुद्धिमान जीवशास्त्रज्ञाचा मुलगा, पण भरीव असं काहीच करू शकला नव्हता आणि नसता त्यामुळे ममींनी त्याला आपल्याबरोबर कामाला घेतलं. ममींचे प्रयोग पहात असताना एक विकृत विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला. ममींचं संशोधन त्याला हवं होतंच पण त्यांच्या मेंदूतील सारं ज्ञानच घेता आलं तर? कितीतरी कीर्ती, प्रतिष्ठा त्याला एकट्याला मिळाली असती, पुढेही. त्याच्या मनात योजना तयार होऊ लागली. आधी स्वतःला भास होत आहेत असा समज त्याने करून दिला. आम्ही दोघीही त्याच्या नाटकाला फसलो. पण तुम्हीही फसलात तेव्हा तो खरा जिंकला. तुमचा सल्ला त्याच्यासाठी विनिंग शॉट ठरला. तुमच्या सल्ल्याप्रमाणे तो ममींशी बोलला आणि त्या अंथरुणाला खिळल्या, बाजूला झाल्या. सर्व त्याच्या मनासारखं होत होतं. त्यांच्या जिवंतपणीच प्रयोग पूर्ण होणं गरजेचं होतं कारण मृत्युनंतर त्यांचा मेंदू निकामी झाला असता. वैज्ञानिक, सामाजिक नियमांच्या विरुद्ध माझ्या मदतीने ममींच्या मेमरीतील ज्ञान त्याने स्वतःच्या मेंदूत स्थलांतरित केले. या प्रयोगानेच डॉ. वसुंधरांचा बळी घेतला. ममींची सारी बुद्धी, सारं ज्ञान आता त्याचं झालं. त्याने संशोधन पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. पुढचं सगळं तुम्हाला माहित असेलच. आता त्याच्या मेंदूत दोन व्यक्तींच्या आठवणी आहेत, त्याचा त्रास हळूहळू वाढतोच आहे. कदाचित हीच त्याची शिक्षा आहे. पण माझं मन मला आतल्या आत खातंय. या खोटेपणात माझाही सहभाग आहे हे मी विसरू शकत नाही. हे सारं सिद्ध करण्यासाठी पुरावा काहीच नाही पण तरीही तुमच्याजवळ कबुली द्यायचीये मला. त्यानेतरी शांत वाटेल मला, thanks - अदिती.'
पत्र संपल. अदितीने मला हे सांगून तिच्या मनाची शांतता थोडीतरी परत मिळवली असेल, पण आता मी काय करू? माझ्या चुकीची कबुली मी कोणाकडे देऊ?

Sunday, 8 March 2015

Happy Women's Day!!!


स्त्री एव्हरेस्ट वर, स्त्री अंतराळात 
स्त्रीची जागा स्वयंपाकघरात?
स्त्री शेतकरी, स्त्री इंजिनियर
 स्त्री ने परतावे अंधार झाल्यावर?
स्त्री समाजसेवक, स्त्री पत्रकार 
स्त्री ने सांभाळावे फक्त घरदार?
स्त्री स्वातंत्र्य, स्त्री चे खूळ 
स्त्रीच साऱ्या कलहाचे मूळ?
स्त्री पालक, स्त्रीचाच संग,
स्त्री जन्माने अपेक्षाभंग?
स्त्री खेळाडू, स्त्री नृत्यांगना 
स्त्रीच चाळवते पुरुष वासना?
स्त्री आधुनिक, ती स्त्री चवचाल,
स्त्रीच ओढवून घेते अत्याचार?
स्त्रीलाच नियम, स्त्रीलाच बंध
मोकाट समाज अंदाधुंद?
स्त्री हो निर्भय, स्त्री हो सक्षम 
निर्धाराने कर मन भक्कम 
बदल योग्य ते करून अवश्य,
तूच घडव तुझं भविष्य 
शक्ती आंतरिक जाणुनी स्त्री दिनी,
समर्थ हो तू आजपासुनी 

Wednesday, 4 March 2015

Happy Holi


तनु आणि कृष्ण

तनुला पडतात खूप सारे प्रश्न
सारे बाप्पा मोठे मग छोटा कसा कृष्ण?

कृष्णाच्या घरात खूप सार्या हम्मा
भूभू आणू म्हटलं तर ओरडते मम्मा

कृष्णाची मुरली गोड गोड वाजे
आम्ही वाजवली कि बंद दरवाजे

दुध लोणी खाणारा कृष्ण गुड बोय
कित्ती वेळा सांगू मला नाही आवडत साय

कृष्णाला मिळतं सुंदर मोराचं पीस
दिसत नाही मोर इथे कबुतरंच तीस

कृष्णाला नव्हता अभ्यास, नुसतीच मज्जा
अरे, तुझ्या घरी मला स्वप्नात तरी घेऊन जा

Tuesday, 3 March 2015

Problem of plenty

एकाच कपाटात मावत पाच जणांचे कपडे
भिंतीवरच्या मांडणीत डबे, पातेली, कुंडे
हल्ली मात्र सामानाने भरून वाहताहेत घरटी
आवरता आवरता प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty

फार पूर्वी नव्हतीच म्हणे चपला घालायची पद्धत
नंतर घरात जेवढी माणसे, तेवढेच जोड दिसत
घेतो नवे जोड हल्ली प्रत्येक ऑकेजन साठी
घालू कुठले ठरवताना प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty

ज्याच्या घरी फोन, त्याला नसे आराम 
लेंडलाईन एक, करी सार्यांचे काम 
हल्ली एका मोबाईल मध्ये तीन सीम ची घंटी 
घेऊ? नको? ठरवताना प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty

घरी एक टीव्ही, एकच फक्त दिसे दूरदर्शन
मोजकेच कार्यक्रम पण त्यांचे मोठे आकर्षण
विश्वरूपदर्शन होते आज सर्व चैनल वरती
काय पाहू ठरवताना प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty

उंचावतो राहणीमान आपण वाढता मिळकत
थोडीही गैरसोय मग मुळीच नाही खपत
चिडचिड नि ताण तणावच त्याने वाढतात शेवटी
समाधान शोधता शोधता प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty

कमी असतानाही घरात होते समाधान
नवे काही मिळता आनंदाला येई उधाण
भूतकाळाच्या आठवणींनी आपण होतो senti
कालचक्राची चाके आता फिरतील का उलटी? - आपल्या घरात आता problem च plenty 

Friday, 27 February 2015

परमार्थातला स्वार्थ

आजकाल दानी म्हणवणार्यांची मुळीच नाही कमी
परमार्थात त्यांच्या, स्वार्थाचीही असते हमी.

भुकेल्याला पाहून त्यांचे मन होते सुन्न
फ्रीज रिकामा करती, देती शिळ पाक अन्न

होते दुख्ख पाहती जेव्हा, पोर अनाथ उघडे
दातृत्वाचा बुरख्याआडून, देती फाटके कपडे

देवदर्शनाला जाती, कारण भक्ती त्यांची अलोट
मनात दानाच पुण्य आणि पेटीत फाटकी नोट

संस्था, मंदिरे, आश्रमांना, देती देणगी हवीशी
मात्र अपेक्षा करती, हवी नावाची फरशी

का म्हणावे दान? जेव्हा देती, काही नको असलेले,
मागती मोबदला, जसे काही विकलेले,
ते असते 'स्व' चे समाधान विकत घेतलेले. 

Thursday, 26 February 2015

करतेय accept मी

करतेय accept मी तुझ्या नजरेचं
माझी नजर चुकवणं
पण तरी नजर शोधत राहते नजरेतलं बोलणं

करतेय accept मी तुझ्या
आवाजातला कोरडेपणा
पण डोळ्यातला ओलावा का होत नाही उणा?

करतेय accept मी तुझ्या दृष्टीतलं
माझं अदृश्यपण
लपवून टाकते मीही मग माझं हरवलेपण

करतेय accept मी तुझं
माझ्याशिवायचं जग
पण तरी का होतेय जीवाची अशी तगमग?

करतेय accept मी तुझं
दुखावलेपण
पण माझ्या मनावरचाही अजून ओलाच आहे व्रण

Wednesday, 25 February 2015

किटी पार्टी

परवाच घडली मला एक किटी पार्टी
भेटल्या काही बायका ज्यांचं status high society

एकेकीची भारी पर्स, ड्रेस, hairstyle
प्रत्येकीचीच personality वाटे versatile

कोणाला छंद शॉपिंग चा तर कुणाला लागते जिम
प्रत्येकीलाच व्हायचय slim आणि trim

Imported crockery मध्ये आल्या सुंदर refreshments
diet विसरून सुरु झाल्या हळूहळू comments

हिचा मेकप, तिचे कपडे, gosh did you see ?
last पार्टीला खरच किती embarrass झाले मी

abroad हून परवाच आणलाय हा pearl set
designer आहे, लोकल jewellery, I just hate

प्रत्येकीच्या डोक्याला वेगळं वेगळं tension
AC बंद, मोलकरीण मंद किती करू mention

भाषा यांची मिंग्लिश, हिंग्लिश, मानो या न मानो
पूर्ण मराठी म्हणजे so middle क्लास you know

थोड्या वेळाने मलाच होऊ लागलं suffocate
होता येत नव्हतं मला कशाशीच relate

बाहेर पडले, म्हटलं असो high society
एवढं पुरे, पाहून झाली हीही एक variety

Sunday, 22 February 2015

अळीच होतंय फुलपाखरू

ती शाळेतून येता घरी, लगेच गप्पा फोनवरी
गंमत बघू कि कान धरू? अळीच होतंय फुलपाखरू

उलट उत्तरे, वाद घालणे, कारण नसता चिडणे, रुसणे
आवर म्हणू कि गृहीत धरू? अळीच होतंय फुलपाखरू

दोस्त मंडळी अवतीभवती, गंमत, खोड्या, दंगा करिती
सामील होऊ कि बंदी करू? अळीच होतंय फुलपाखरू

आधी दिसत नसे फारसा, आता सतत हवा आरसा
दटावू कि कौतुक करू? अळीच होतंय फुलपाखरू

बालपणातच असता पाऊल, मुग्धपणाची लागे चाहूल
लहान म्हणू कि मोठी धरू? अळीच होतंय फुलपाखरू

मैत्रिणीच्या कुजबुज कानी, असेल काही गुपित मनी?
सोडून देऊ कि विचारू? अळीच होतंय फुलपाखरू

छोटासा पण कोष सुरक्षित, जग नसेल तसे कदाचित
भीती घालू कि सक्षम करू? अळीच होतंय फुलपाखरू

बाहेर पडता या कोषातून, हुरहूर वाटे फार मनातून
काळजी करू का धीर धरू? अळीच होतंय फुलपाखरू

तयार व्हावे तिने मनाने, पेलण्यास नवी आव्हाने
मोकळ सोडू कि पकडून धरू? अळीच होतंय फुलपाखरू 

Friday, 20 February 2015

आमचे आय टी वाले

शर्ट इस्त्रीचा, टाय चकाचक
बुटांवरती मस्त चमक
id कार्ड कोणी बरं ते 
गळ्यात घातलेले? - हे आमचे आय टी वाले

मस्त भांग अन सेंट भारी
कुणी नाकातून धूर काढी
फोन मात्र कानावरती
सदा चिकटलेले - हे आमचे आय टी वाले

निघतात हे उठून लवकर
हाती मोठा टिफिन केरियर
पण जेवण यांचे कधीच नसते
वेळेवर झालेले - हे आमचे आय टी वाले

हट्ट मुलांचा, तिचीही चिडचिड
inbox मध्ये वाढती गिचमिड
प्रवास, घाई, गर्दी यांनी
डोके भणभणलेले - हे आमचे आय टी वाले

दमून भागून घरी परतती
रटाळ काही tv वरती
बोलायाला कोणीच नाही
सारे घर झोपलेले - हे आमचे आय टी वाले

आज इथे तर उद्या तिथे
airport वर यांचेच जथे
laptop ने बिर्हाड यांच्या
पाठीवर थाटलेले - हे आमचे आय टी वाले

पगार मोठा खोटा खोटा
डोक्यावर टार्गेट चा सोटा
घर, गाडीचे हप्ते सारे
बँकेतच कटलेले - हे आमचे आय टी वाले

लग्नकार्याला सर्व हॉल वर
कर्मयोगी हे असती कॉल वर
सण समारंभही कायम यांच्या
नशिबातून हुकलेले - हे आमचे आय टी वाले

घर, गाडी सर्व काही
उपभोगायला वेळच नाही
तुरुंगातूनही सुट्टी मिळते,
कैदी हे असले कसले? - हे आमचे आय टी वाले







Tuesday, 17 February 2015

माझी कविता

ये रे ये रे पावसा हे लहानपणीचे गाणे
म्हणती सारे, पण ते कोणी रचले? कोण जाणे
सर्वांनी ऐकलीच असेल, ससा कासवाची गोष्ट
कोणी लिहिली नाही ठाऊक पण आठवते स्पष्ट

सांगून पहा मुलांना, काढा देखाव्याचे चित्र
घर, डोंगर टोकेरी आणि डोकावणारा मित्र
हा चित्राचा आराखडा कोणी अमर केला?
अनाम चित्रकाराचे नाव त्या माहित नाही कोणाला

 नावात आहे काय? म्हणाला असेल शेक्सपियर
पण त्याची प्रत्येक कलाकृती आहे त्याच्याच नावावर
छोटा अथवा मोठा असो, त्याचीच असेल जर कला
त्याचे नाव कळले तर नक्कीच आवडेल मला

अजिंठ्याच्या शिल्पांखाली नसेल कुणाची सही
पण मला मात्र माझी कविता माझ्याच नावाने हवी. 

Monday, 16 February 2015

आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही हवं असेल का माहेरपण?

तिलाही असेलच ना ओढ माहेरपणाची
कारण तिथे नसते अपेक्षा वा सक्ती कश्याची
हवे असेल का तिलाहि हे मोकळेपण?
आईलाही हवं असेल का माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

उठू दे तिला कधी सर्वांच्या शेवटी
वाटून घ्यावी तिची काम सकाळची
कायम नको तिलाच जबाबदार्यांच दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

करु म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
तेवढीही जाणीव तिला होईल पुरेशी
लक्षात ठेवू तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई आपल्या लेकीला मायेचे माहेर देते
पण त्याचे मोल लेकीच्या लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेलच ना कधी विसावा;
वाटेल समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण








Sunday, 15 February 2015

valentine साठी

घेऊन गेलो आईसाठी
मोगर्याची सुंदर वेणी
आई म्हणाली काय हवय ?
मोबाईल रिचार्ज कि पोकेट मनी?

ताईसाठी घेऊन गेलो
चोकालेटचा मोठा डबा
म्हणे सूर्य उगवलाय कुठे?
काढा मला एक चिमटा

बाबांच्या हातात दिले
एक जोडी कफलींक
हरवलीस वाटत? बाबा म्हणे
टाय डे ला टाय पिन

आजोबांच्या हातात दिली
चष्म्यासाठी नवी दोरी
म्हणे, खोटं बोलायला सांगू नकोस
वेळेवरच यायचंय घरी

आजी दिसताच हातात दिला
गुलाबांचा लाल गुच्छ
म्हणाली, नाटक नकोय, दे तिलाच
आणि सांगून टाक सारं स्वच्छ

valentine साठी आणल्या होत्या
प्रेमाच्या या खास भेटी
घरातल्यांच उलटंच सारं
वाटे सर्व मतलबा पोटी

पोकेट मनीतून टायपिन घेतली,
ताईला पटवलं उशिरा साठी
आजीकडचा गुच्छ घेऊन
मग धावत गेलो तिच्याचपाठी 

Thursday, 12 February 2015

'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

आलास का शाळेतून, आता आवरून घे पाहू
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

पेपर कोणते मिळाले आणि किती मिळाले मार्क्स?
अरे दहा मिनिटात आहे तुझा गणिताचा क्लास
आत्ताच आलो ना ग, थोडा टीव्ही दे न पाहू
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

कपडे बदल लवकर नि घे अभ्यासाची वही 
हात दुखतायत वगैरे काही चालायचे नाही 
थोडा वेळ मित्रां बरोबर सायकल चालवून येऊ?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

डबा का रे नाही संपला? तशीच आहे पोळी 
गेला असशील ना खेळायला सुट्टीच्या वेळी?
संध्याकाळी असतात क्लास मग कधी ग मी खेळू?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

अरे टेनिसच्या क्लास मध्ये खेळायचंच आहे 
आणि तबल्याला कोण तुला अभ्यास विचारणारे?
अगं सारखं काय शाळा नाहीतर क्लास मधेच राहू?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

अष्टपैलू व्हायला हवं, तुला माहित नाही जग 
मेहनत घेशील आत्ता तरच धरशील तग 
सगळे धावतायत म्हणून मी हि धावतच राहू?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

मान्य आई वाटतंय तुला, मी व्हाव अष्टपैलू 
पण तुम्हा सार्यांच्या अपेक्षा मी एकटा कसा पेलू?
मन कश्यात रमतं माझं ते मलाच द्या न शोधू
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'

बांधलेला दिवस माझा, आखलेला वेळ 
एकदा तरी सांग मला, आज मनसोक्त खेळ 
नाहीतर मोकळा श्वास मी तरी केव्हा कसा घेऊ?
'आई, मी थोडा वेळ खेळायला जाऊ?'


Wednesday, 11 February 2015

चाकवाल्या चारोळ्या

सायकल बालपण
एसटी वणवण
बस चणचण
आणि लोकल मरण

ट्रकटर कष्ट
ट्रक ओढग्रस्त
जीप गस्त
पण घोडागाडी मस्त

रिक्षा त्रास
कार प्रवास
एक्सप्रेस सहवास
आणि बाइक रोमान्स

विमान भ्रांत
जहाज शांत
बैलगाडी निवांत
आणि पायी एकांत 

Friday, 6 February 2015

माणसांचे साचे

प्रत्येकाला साच्यात बसवायची
आपण का करतो घाई?
हो आहे शांत पण
म्हणून काय कधी बोलणारच नाही?

एखाद्यावर ठेवतो आपण
समजूतदारापणाचे ओझे
वहातच राहायचे?
मनातच ठेवायचे का कायम  प्रश्न अडचणीचे?

 स्वभाव विनोदी आहे त्याचा
आपण लावतो लेबल
दाखवायचे नेहमी हसूच त्याने?
आणि अश्रू गिळायचेच का केवळ?

भोळा असेल तो
असेल त्याचा सार्या जगावर विश्वास
म्हणून फसतच राहायचे कायम?
विचारायच्या नाहीत कधीच शंका, वाटून अविश्वास?

कष्टाळू आहे म्हणून एखाद्याने फक्त
राबायचे राब राब,
सहन करायची मनमानी?
आणि विचारायचा नाही कधीच जाब?

कणखर म्हणून उभे राहायचे
आला जरी भूकंप,
वाट पहायची मोडायची?
मात्र त्याला वाकायचा नाही का विकल्प?

यंत्र नाही ते, जे करील मान्य
सार्या अपेक्षा आणि साचे,
वागावे कि कधी स्वछंदपणे
मोडून बंध अपेक्षांचे

देव नाही, माणूस आहोत आपण
गुण दोष वाही
आणि देवालाही देवपण काही
नेहमी झेपलेले नाही



Wednesday, 4 February 2015

देउळिचा देव

देउळिचा देव, मोठाची गोजिरा
पायीच्या खडावा, सोनियाच्या

तलम ती वस्त्रे आणि आभूषणे
मूर्ती ती झळाळे, पाषाणाची

तयाच्या देउळी, रोज रोषणाई
पूजाअर्चा घाई, रात्रंदिन

परी तो का दिसे, कावराबावरा?
कुठल्या विचारा करितसे?

देव म्हणे मला दिसे विसंगती
ऐकती, वागती विपरीत

देव म्हणे लोका सांगे मी विरक्ती
रास दक्षिणेची, माझ्यापुढे

देव म्हणे द्यावा भुकेल्यासी घास
पक्वान्नांचे ताट नैवेद्याला

कष्ट हाच देव सांगे तरी दारी
उभे भिक्षेकरी कायमचे

देव म्हणे मनी, नका धरू लोभा
नवसाने देवा मोहविती

स्वच्छ मन हेच सोवळे पुरेसे
मन काळे, अंगी पितांबर

देव म्हणे सेवा करा शोषितांची
माया जमविती तीर्थक्षेत्रे

देव हाच धंदा, देव व्यवसाय
अर्थाचा अनर्थ कोणी केला?

दुर्दैवच सारे आपण करंटे
देव काय सांगे समजेना

Friday, 30 January 2015

मुळांना थोडीतरी माती राहू द्या

चेहरा उत्सुक, डोळे मोठे मोठे
दूरदेशी वाढणारे इथलेच रोपटे
या जमिनीशी नाते त्याला माहित तर होऊ द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या

मोठ्ठ जग त्यांचं, भाषा अनेक
हेल काढून बोलातीही सुरेख
आपलीही भाषा त्यांना बोलता येऊ द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या

sound of music आहेच मस्त
harry potter तर त्यांचाच दोस्त
कधीतरी गोट्या नि चिंटू हि पाहू द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या

पिझ्झे पास्ते काही वाईट नाहीत
ब्रौनि बरिटो तर आहेतच माहित
कधीतरी मेतकुट भातही खाऊ द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या

xmas new year हवेच हवे
रोषणाई अन दिवेच दिवे
दिवाळीच्या किल्ल्यात पणती हि लाउ द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या

sweety , poppet , darling त्यांनी ऐकलय खूप
सोन्या, पिल्या, चिमणे हे त्याचंच तर रूप
आजोबांचे लाडही समजून घेऊ द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या

स्वतःची रूम, बेड नि कपडे
मऊ मऊ उशी नि कार्टून चे पडदे
आजीच्या गोधडीची ऊबहि घेऊ द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या

स्वावलंबन, स्वतंत्र वृत्ती
सगळेच थोड्या अंतरावरती
कधीतरी आईच्या कुशीतही येऊ द्या
मुळांना थोडीतरी माती राहू द्या 

Wednesday, 28 January 2015

माझे वाहनचालक प्रशिक्षण

माझे वाहनचालक प्रशिक्षण (मार्च २०१३)

भारतात परत आल्यावर वाहनचालक परवाना घ्यायचे ठरवले . इंग्लंडमध्ये तो घेण्यासाठी एक वर्ष, बराच पैसा असा खर्च आणि टोमणे, ओरडा आणि भांडणे अशी बरीच जमा करून झाली होती . तिकडे nongear कार चालावलीही होती पण इकडे गियर ची गाडी चालविण्यासाठी पुन्हा एकदा ते सर्व करणे भाग होते. त्यामुळे एका driving school मध्ये रीतसर पैसे भरून नोंदणी केली . गाडी चालवता येत असल्याचा आत्मविश्वास होता पण gear शी दोस्ती करणे आणि रस्त्यावरील गर्दी, वाहने यांच्याशी सामना करणे याचे प्रशिक्षण आवश्यक होते.
शिकाऊ परवाना काढण्यासाठी rto मध्ये एक दिवस घालवावा लागला, काही कल्पना नसताना एक थियरी परीक्षा घेण्यात आली . परीक्षा हॉल मध्ये जाण्या आधी भिंतीवरील पोस्टर वाचत केलेला टाईमपास कामी आला . स्क्रीन वर दहा प्रश्न आणि त्यांचे पर्याय दाखवण्यात आले . खुर्चीवरून बरोबर पर्यायाचे बटण दाबायचे होते . नंतर लगेचच निकालही प्रदर्शित केला गेला . तो सुद्धा स्क्रीन वर सार्वजनिक. पास झाल्यामुळे ते काम झाले .
पहिला दिवस उजाडला , इकडे एक बरे होते, रोज लेसन शक्य होते, त्यामुळे दिवस वाया जाणार नव्हते . शिवाय uk च्या दोन तीन लेसनच्य खर्चात इथे सर्व प्रशिक्षण आणि परवानाही मिळणार होता . माझ्या प्रशिक्षकाने मला अनेक गोष्टी शिकवल्या, त्यातील काही खाली देत आहे-
. गाडी चालवताना नेहमी मधल्या लेन मध्ये राहावे . ज्यांना पुढे जायचे असेल ते त्यांच्या सोयीने दोन्ही बाजूंनी पुढे जाऊ शकतात .
. सारखा सारखा आरसा बघू नये त्यामुळे रस्त्यावरील concentration कमी होत आणि भीती वाटते .
. गियर आणि automatic गाडीमध्ये फरक असा कि automatic गाडीत एका पायाला ब्रेक आणि दुसऱ्याला accelerater असतो पण गियर च्या गाडीत ते दोन्ही एकाच पायाने सांभाळावे लागतात .
. होर्न हा वाजवण्यासाठीच असतो
असे नवीन गोष्टी शिकत आणि जुन्या विसरत माझे प्रशिक्षण चालू होते. परीक्षेचा दिवस आला . माझ्यासारख्या आणखी चार उमेदवारांसह आमची गाडी ठरवल्यापेक्षा केवळ एक तास उशिरा rto कडे निघाली . तिकडे पोहोचल्यावर आणखी काही उमेदवार येउन मिळाले . आमच्या एजंट लोकांची धावपळ सुरु होती . काही लोकांना दुचाकीचा परवाना हवा होता तर काहींना चारचाकीचा तर काहींना दोन्हीचा . एकमेका साहाय्य करू या भावनेने एकमेकांच्या गाड्या परीक्षेसाठी वापरण्यासाठी देणे घेणे सुरु होते. चारचाकीच्या परीक्षा केंद्रावर आम्ही पोहोचलो. परीक्षक दोन खुर्च्या टाकून कडेला बसले होते. एकेकाचा नंबर येत होता, lunchtime हि जवळ येत होता . माझी वेळ येईपर्यंत परीक्षकांना फारच भूक लागली असावी . माझे प्रशिक्षक जवळ आले, त्यांनी घाईने मला गाडीत बसायला सांगितले, ते शेजारी बसले . मी बेल्ट लावत होते पण त्याची काही गरज नाही लवकर गाडी स्टार्ट करा असे त्यांचे म्हणणे पडले . मी गाडी सुरु केली, खिडकीतून ओरडून माझे नाव परीक्षकांना सांगितले, एक राउंड मारून गाडी परत आणून थांबवली . झाले, परीक्षा संपली , आणि यथावकाश वाहनचालक परवाना घरी आला .

दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी असा परवाना काढला होता तेव्हा मला गाडीत बसायचीही गरज पडली नव्हती त्यामानाने या वेळची परीक्षा बरीच खरी वाटली . आपल्याकडील परीक्षा पद्धत परदेशातही प्रसिद्ध झाल्याचे अलीकडे लक्षात येऊ लागले आहे. परवाच कोणीतरी सांगत होते, काही देशांमध्ये भाड्याने गाडी घेऊन आपल्या original license वर ती काही काळ चालवता येते . पण आता काही देशांत भारतीय license अशा वेळी चालत नाही. का तर इथे केवळ पैसे देऊन सुद्धा license मिळवता येते, परीक्षा हवी तेवढी कठीण नाही, वाहतुकीची शिस्त सांभाळली जात नाही, या गोष्टी सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत . अशी मानहानी टाळायची असेल तर वाहन परवांना प्रक्रिया सुधारणे आणि अधिक कठीण करणे आवश्यक आहे . त्याशिवाय वाहतुकीची शिस्त सांभाळली गेली पाहिजे, नियम मोडणाऱ्यांना कडक शासन होणे गरजेचे आहे. वाटतो तेवढा हा प्रश्न साधा सोपा नाही . परवाना प्रक्रिया, नियमांची अंमलबजावणी, रस्ते, सूचनाफलक, सिग्नल, ट्राफिक,पोलिस, शिस्त,माणुसकी, लाचलुचपत असे अनेक कंगोरे या प्रश्नाला आहेत . त्यामुळे सुधारणांची सुरुवात कुठून करावी लागेल हाच एक मोठा प्रश्न आहे